आमच्या व्यवसायातल्या एका परिचित व्यक्तीने अलीकडे एक प्रश्न विचारला – “तुमच्या लेखमालेत तुम्ही हर्षद मेहतावर लिहिणार का?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा प्रश्न येईल असा कधी विचार केला नव्हता. १९८२ ला, हर्षद मेहताच्या आधी सुमती जमना नावाचा सटोडिया होता. त्याने दोन कोटी रुपयांचा सट्टा बिर्ला कंपन्यांच्या शेअर्समध्ये केला होता. आज दोन कोटी रुपये फार किरकोळ वाटतात. कारण आता घोटाळेसुद्धा मोठ्या रकमांचे करोडो रुपयांचे होऊ लागले आहे. सुमती जमना चौपाटीवर वाळूत फिरत असताना त्याच्या पाठीमागे त्यांचा कारकून छोटी डायरी आणि पेन घेऊन मागे मागे चालत असे. सुमती जमना फिरताना जी बडबड करे त्या कंपनीची नावे त्याचा कारकून डायरीत लिहायचा आणि मग त्या शेअर्सवर सुमती जमना सट्टा खेळायचा.

आपण १९८२ वरून एकदम दहा वर्षे पुढे जाऊ. हर्षद मेहता घोटाळा प्रकरण इतके मोठे होऊन गेले की, त्यानंतर आज एकतीस वर्ष होऊनसुद्धा हे प्रकरण लोकांच्या डोक्यातून गेलेले नाही आणि त्यात पुन्हा वेब-सीरियल आणि चित्रपटाने भर घातली.

हर्षद मेहता जर तेजीचा बादशहा होता, तर मनू माणेक हा बाजारातला ‘किंग कोब्रा’ होता. तो मंदीवाला होता. प्रादेशिक शेअर बाजार त्या काळात सटोडियांना मोठी संधी देत होते. एका बाजारातून खरेदी दुसऱ्या बाजारात विक्री किंवा याच्या उलटसुद्धा चालू असायचे. त्याच्या ऑफिसमध्ये एकाच वेळेस तीस तीस चाळीस चाळीस फोन बसवलेले होते. मनू माणेक गँगचे अनेक सभासद होते. त्या सर्वांची नावे प्रसिद्ध करता येणे शक्य नाही. परंतु प्रचंड मोठा पैसा आणि शेअर्स अत्यंत कमी वेळेत उभा करण्याची ताकद या मंडळींकडे होती आणि मंदी करून उंधा बदला ही मंडळी कमावत होती.

हेही वाचा… माझा पोर्टफोलियो: ‘प्रेस्टिज’ला कसे नाकारता येईल?

शेअर बाजाराचा अध्यक्ष कोण असावा हे ठरवण्याची ताकद या मंडळीकडे होती. महेंद्र कम्पानी यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत बाजारात तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले त्यामुळे आपल्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकेल असा विचार करून या गँगने महेंद्र कम्पानी यांचा पराभव केला.

मनू माणेक गँगला मात्र एक खेळ अंगाशी आला तो म्हणजे रिलायन्सचा ५० कोटी रुपयांचा कन्व्हर्टिबल डिबेंचर्स इश्यू या वेळेस त्यांनी कंपनीला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा पराभव झाला धीरूभाई अंबानी ही काय ताकद आहे त्यांना त्या वेळी समजले. बाजाराने नंतर मग केतन पारेख या व्यक्तीचा उदय आणि अस्त पाहिला ‘के १०’ या कंपन्या संपल्या.

वित्त संस्था, वित्त संस्थांचे अध्यक्ष आणि शेअर बाजार या संस्थांचा बाजारावरील प्रभाव हे पुन्हा एक स्वतंत्र मोठे प्रकरण होईल. खूप मागे जायचे ठरवले तर एलआयसी आणि हरदास मुंदडा हे प्रकरण आता काळाच्या ओघात विसर पडलेले प्रकरण आहे.

कंपन्यांचे संचालक हेसुद्धा अनेक करामती करत. एका मोठ्या जहाज कंपनीने काय केले तर लाभांश वाटप घोषित करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक अशी बातमी प्रसिद्ध केली. या बातमीने कंपनी तोट्यातून नफ्यात आली. बाजाराला असा संदेश गेला की, शेअर्समध्ये चढ उतार झाले आणि प्रत्यक्षात लाभांश वाटपाचा निर्णय झाला नाही म्हणून शेअर पुन्हा खाली आला.

डुप्लिकेट शेअर छापायचे ते बँकांकडे गहाण ठेवले जायचे आणि लाभांश वाटपाच्या अगोदर शेअर्स बँकेतून सोडून घेतले जायचे किंवा शेअर्समध्ये बदल करायचा कारण डुप्लिकेट शेअर्सवर लाभांश वाटप कसे करणार ?

वाटा असल्या की पळवाटा असतात. गंगा असली की गटारगंगा असते. कंपनी कायद्यातसुद्धा बदल होण्यास काही वर्षे गेली. डिमॅट संकल्पना आपल्याकडे अमेरिकेपेक्षाही जास्त वेगाने यशस्वी झाली.

आणखी अनेक घोटाळ्यांचे घोटाळे करणाऱ्यांची नावे प्रसिद्ध करता येतील. परंतु घोटाळे मागे टाकून बाजार प्रगती करीत राहिला. आणखी कोणते कोणते घोटाळे होऊ शकतील? सत्यम कम्प्युटर घोटाळा परत नव्या रूपात येईल का? कोणत्या बँका घोटाळ्यामुळे बुडतील या प्रश्नांना उत्तरे नाहीत. परंतु हा बाजार आणखी पुढे जात राहील त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, त्यासाठी आपण काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे. भोवरा या नाटकात मधुकर तोरडमल यांनी सुरेख वाक्य लिहिले आहे – “भोवरा हा प्रवाह नाही ती प्रवाहातील विकृती आहे.” त्यामुळे अशा भोवऱ्यात अडकून पडायचे की आपला प्रवास पुढे चालू ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवायचे. अन्यथा मागाल ते मिळेल, देणारा हा कल्पवृक्ष आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshad mehta scam manu manek ketan parekh scam in share market print eco news dvr
Show comments