Hexaware Sahre Mareket Listing : हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला शेअर बाजारातून ऑफर फॉर सेलद्वारे ९,९५० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. दरम्यान हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. यावेळी सेबीने हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजसह पीएमईए सोलर टेक सोल्युशन्स लिमिटेड, स्कोडा ट्यूब्स लिमिटेड, एजेक्स इंजिनिअरिंग लिमिटेड, ऑल टाइम प्लास्टिक्स लिमिटेड आणि विक्रण इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्या आयपीओलाही मान्यता दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान हेक्सावेअर ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रिप्शनसाठी आरक्षित कोट्याचाही समावोश आहे. या ऑफर फॉर सेलमध्ये अमेरिकेतील सीए मॅग्नमच्या होल्डिंग्जच्या इक्विटीच्या विक्रीचाही समावेश आहे. हेक्सावेअर आता ओला इलेक्ट्रिक नंतर या वर्षी भारतातील ही सर्वात मोठी सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी बनेल.

अतुल निशार यांनी स्थापन केलेली हेक्सावेअर कंपनी एआयसह वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि उत्पादन यासारख्या उद्योगांना सेवा पुरवते. आयपीओचा उद्देश शेअरहोल्डर्सचे मूल्य वाढवणे आणि प्रमोटर्सना तरलता प्रदान करणे आहे, ज्यामुळे कंपनीचा बाजारातील उपस्थिती भक्कम होईल.

कंपनीच्या तत्कालीन प्रमोटर्सनी प्रति शेअर ४७५ रुपयांची डिलिस्टिंग स्वीकारल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचे शेअर्स शेअर बाजारातून काढून टाकण्यात आले होते. डिलिस्टिंगच्या जवळजवळ एक वर्षानंतर, यूएस-स्थित खाजगी इक्विटी फर्म कार्लाइल ग्रुपने ऑक्टोबर २०२१ मध्ये बेरिंग प्रायव्हेट इक्विटी आशियाचा कंपनीतील ६२ टक्के हिस्सा जवळजवळ ३ अब्ज डॉलर्सला विकत घेतला होता.

३४ कंपन्यांना सेबीची मंजुरी, ५५ कंपन्या प्रतिक्षेत

दरम्यान गेल्या काही काळात ३४ कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीची मंजुरी मिळवली आहे. यातून एकूण ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा करण्यात येणार आहे. शिवाय, ५५ कंपन्या आयपीओसाठी सेबीच्या मंजुरीची वाट पाहत आहेत, ज्या सुमारे एक लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. सेबीच्या मंजुरीच्या तारखेपासून कंपनीला आयपीओ लाँच करण्यासाठी एक वर्षाची मुदत मिळते.

हेक्सावेअर कंपनी काय काम करते?

हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज ही कंपनी, आयटी सेवा, व्यवसाय आउटसोर्सिंग आणि सल्ला सेवा पुरवते. याचबरोबर हेक्सावेअरच्या उपकंपन्या बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रवास आणि वाहतूक, आरोग्यसेवा, विमा, आणि व्यावसायिक सेवा अशा विविध उद्योगांना सेवा पुरवते. ही कंपनी १९९० मध्ये अतुल आणि अलका निशार यांनी स्थापन केली होती आणि कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hexaware ipo sebi approval rs 9950 crore ipo hexaware technologies ipo approval stock market public listing aam