Vijay Kedia On Stock Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना लवकरात लवकर कमाई मिळणारा स्टॉक हवा असतो. आता शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कसा कमावला जाऊ शकतो? यामागचं गणित प्रसिद्ध शेअर बाजार गुंतवणूकदार विजय केडिया यांनी सांगितलं आहे. या विषयी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. विजय केडिया यांनी असं सूचवलं आहे की जर योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर वार्षिक ५०,००० रुपयांची बचत होते आणि कालांतराने ५ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते.
विजय केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांना काही गुंतवणुकीच्या संदर्भात टीप्स दिल्या आहेत. तसेच त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की, “तुमचा लाखोंचा पगार तुम्हाला करोडपती बनवत नाही, तर तुमची लाखोंची सेविंग तुम्हाला करोडपती बनवते.” या संदर्भातील वृत्त ‘ईटीनाऊ’ने दिलं आहे.
विजय केडिया यांनी काय म्हटलं?
संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली फक्त तुमच्या मोठ्या पगार मिळवण्यात नाही तर त्या पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे शिस्तबद्ध बचतीच्या सवयीची. तसेच बचतीची सवय, अनावश्यक खर्च टाळणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्वाविषयी त्यांनी सांगितलं. या बरोबरच भविष्यात पैसा कमावण्यासाठी तुम्हाला बचतीवर लक्ष केंद्रित करावं लागले, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी आजच्या तरुणांना केलं आहे.
विजय केडिया यांनी म्हटलं की, ‘तुमचा लाखोंचा पगार तुम्हाला करोडपती बनवत नाही पण तुमची लाखोंची बचत तुम्हाला करोडपती बनवते. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे.’ तसेच विजय केडिया यांनी पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेत प्रचलित असलेल्या विचारसरणीवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आजसाठी जगा, उद्या कधीच येत नाही’ हा जो काही विचार आहे तो चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील सुमारे ४० टक्के लोकांकडे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी १,००० डॉलर्सही नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरूनच त्यांनी टीका करत ही परिस्थिती किंवा हा विचार तुम्हाला आर्थिक असुरक्षिततेकडे नेत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच अमेरिकेतील मुलांना बचत करायला शिकवलं जात नाही. त्यामुळे तिथले बरेच लोक आर्थिकदृष्ट्या असुरक्षित होत चालले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केडिया यांच्या मते ४० टक्के अमेरिकन लोकांकडे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी १००० डॉलर्सही नाहीत. तर सरकार त्यांना अनेक गोष्टी पुरवत असून तेथे सुरक्षा म्हणता येईल असं काहीही नाही, असं शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार केडिया यांनी म्हटलं.
It’s not your salary in lakhs that makes you a millionaire — it’s your savings in lakhs that do.. ✌️ pic.twitter.com/yM6cdm8yv9
— Vijay Kedia (@VijayKedia1) April 20, 2025
तसेच त्यांनी तरुणांना एक सल्ला दिला. फॅशन ट्रेंड आणि ब्रँडेड वस्तूंवर जास्त खर्च न करण्याचं आवाहन त्यांनी तरुणांना केलं. तसेच त्याऐवजी त्यांनी तो पैसा बचत करावा आणि गुंतवणुकीत वळवण्याचा सल्लाही केडिया यांनी दिला. पहिली गोष्ट म्हणजे पार्ट्या कमी करणे, फॅशन आणि ब्रँडवर कमी खर्च करणे आणि शक्य तितके पैसे वाचवण्याला महत्व देण्याचंही त्यांनी म्हटलं.
गुंतवणुकीबाबात काय सल्ला दिला?
दरम्यान, विजय केडिया यांनी म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणुकीचं उदाहरणह दिलं. ते म्हणाले की, “जर एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंडात दरवर्षी ५०,००० रुपये गुंतवले आणि १२ टक्के चक्रवाढ वाढ मिळवलं तर २० वर्षांत ही रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते”, असा सल्ला केडिया यांनी दिला. तसेच शेवटी ते म्हणाले की, “आज जर तुम्ही ५०,००० रुपये खर्च करत असाल तर याचा अर्थ भविष्यात तुम्हाला ५ कोटी रुपये तोटा होणार आहे.”