लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: सरलेल्या एप्रिल आणि मे महिन्यांत भांडवली बाजाराचे कमालीच्या अस्थिरतेतून मार्गक्रमण सुरू असताना, समभागसंलग्न श्रेणीतील हायब्रिड आणि मल्टी-ॲसेट फंडांनी लक्षणीय गुंतवणूक आकर्षित केली. समभागसंलग्न (इक्विटी) गुंतवणुकीसारखी कर-कार्यक्षमता असलेले हे फंड असल्याने, नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असलेल्या गुंतवणूकदारांना एकरकमी अथवा ‘एसआयपी’साठी हा अस्थिरतेतून तरून जाऊन दीर्घकालीन संपत्ती निर्माणाचा चांगला मार्ग असल्याचेही सिद्ध झाले आहे.

विविध प्रकारची जोखीम क्षमता, आर्थिक उद्दिष्टांना साजेशा गुंतवणुकीची पूर्तता करणाऱ्या सध्या उपलब्ध हायब्रिड फंडांनी पाच वर्षांपर्यंत कालावधीत दिलेला सरासरी १५ टक्क्यांहून अधिक परतावा हा या श्रेणीकडील गुंतवणूकदारांच्या वाढत्या पसंतीच्या समर्पकतेला अधोरेखित करतो. या श्रेणीतील अग्रगण्य नावांपैकी एक म्हणजे ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी आणि डेट फंडा’ने तीन वर्षांच्या कालावधीत २५.८८ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत २०.६९ टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे. जो या श्रेणीतील इतर फंड आणि मानदंड निर्देशांकापेक्षा (बेंचमार्क) सरस आहे. फंडाच्या प्रारंभी म्हणजेच ३ नोव्हेंबर १९९९ रोजी केलेली १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक ३० एप्रिल २०२४ पर्यंत अंदाजे ३४.४ लाख रुपये झाली. याचा अर्थ १५.५४ टक्के चक्रवाढ दराने परतावा प्राप्त झाला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची आक्रमक हायब्रिड फंड योजना किमान ६५ टक्के इक्विटीमध्ये आणि उर्वरित २० ते ३५ टक्के डेटमध्ये गुंतवणूक करते. तुलनेने उच्च जोखीम सोसण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना उपयुक्त ठरते. याचप्रमाणे १७ वर्षे जुना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड हा दीर्घकालीन उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड असून, त्याने तीन वर्षांच्या कालावधीत १३.४९ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत १२.८३ टक्के चक्रवाढ परतावा दिला आहे.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : वर्तमानात भविष्याची वाट दाखवणारा – ख्रिस्तोफर वुड

मल्टी ॲसेट श्रेणी एकाच फंडामध्ये इक्विटी, डेट, सोने/चांदी, रिट्स, इनव्हिट इत्यादींचे मिश्रण देते. या श्रेणीतील सर्वात मोठा आणि जुना फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंडाने तीन वर्षांच्या कालावधीत २४.६९ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत १९.६५ टक्के चक्रवाढ परतावा दिला आहे. जो या श्रेणीतील इतर फंड आणि मानदंड निर्देशांकापेक्षा अधिक आहे. ३१ ऑक्टोबर २००२ रोजी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक ३० एप्रिल २०२४ पर्यंत अंदाजे ६५.४२ लाख रुपये झाली असेल म्हणजेच यात २१.४५ टक्के चक्रवाढ परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.