एलईडी दिवे तयार करणारी भारतातील आघाडीची कंपनी ‘आईकिओ लाइटिंग लिमिटेड’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या ८ जूनपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना ८ जूनपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग २७० रुपये ते २८५ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.
या भागविक्रीच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या माध्यमातून ९० लाख समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत, तर ३५० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. यातून कंपनीचा ६०७ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. या निधीचा उपयोग नवीन प्रकल्पाची उभारणी आणि त्याच्या भांडवली खर्चाच्या तरतुदीसाठी केला जाणार आहे.
वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ५२ आणि त्यानंतरच्या ५२ च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल.
‘आईकिओ लाइटिंग लिमिटेड’ प्रामुख्याने फिलिप्स इंडियासारखा नाममुद्रेला लाईट आणि सुटे भाग पुरविण्याचे कार्य करते. याशिवाय वाणिज्य उपयोगाचे शीतकपाटातील दिवे (रेफ्रिजरेशन लाईट), विद्युत दिव्यांशी संबंधित उपकरणे आणि प्रणाली जे मुख्यतः निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक उपयोगासाठी वापरली जातात. याचबरोबर फिलिप्स इंडिया, तनिष्क, ताज, हयात हे कंपनीचे मुख्य ग्राहक लाभार्थी आहेत.