डीसीबी बँक लिमिटेड (बीएसई कोड ५३२७७२)
प्रवर्तक: आगाखान फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट/ प्लॅटिनम ज्युबिली इन्व्हेस्टमेंट्स
बाजारभाव: रु. १०५/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बँकिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३११.२१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक – १४.८५
परदेशी गुंतवणूकदार – १२.४४
बँकस्/ म्युच्युअल फंडस्/ सरकार ३९.३८
इतर/ जनता ३३.३३
पुस्तकी मूल्य: रु. १३०
दर्शनी मूल्य: रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश: १०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १४.०४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७.५
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३
कॅपिटल ॲडिक्वेसी गुणोत्तर: १६.२६%
नक्त अनुत्पादित कर्ज: १.३७%
प्रोव्हिजन कव्हरेज गुणोत्तर: ७४.६८%
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड: ६.३०
बीटा: ०.९३
बाजार भांडवल: रु. ३३०० कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १४१/६८
शेअर बाजाराची भीती कधी वाटते का? असा प्रश्न काही महिन्यांपूर्वी विचारला असता तर तुमचं उत्तर काय असतं आणि आज काय आहे?
शेअर बाजाराला जोखमीची गुंतवणूक का म्हणतात हे एव्हाना बऱ्याच गुंतवणूकदारांना कळून चुकलं असेल. नक्की गुंतवणुकीची वेळ कुठली, या संभ्रमात सगळेच आहेत. एक समूह सोडला तरी इतर लार्ज कॅप शेअर्सची स्थिती बरी असल्याने जाणत्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असेल. त्यामुळेच केवळ फंडामेंटल शेअर्स खरेदी करण्याचे धोरण फायद्याचे ठरेल.
अर्थसंकल्पात शेअर बाजारासाठी काही ठोस घोषणा नसल्या तरी काही वाईट बातमी नाही हीच सुखद गोष्ट आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सूतोवाच केल्याप्रमाणे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, तसेच रिझर्व्ह बँक कायद्यात काळानुसार बदल अपेक्षित आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेने नुकतेच म्हणजे २५ जानेवारीला एक परिपत्रक काढून सिक्युरिटायझेशन, तसेच अनुत्पादित कर्जासंबंधी नवीन धोरण आखत असल्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा बँकिंग क्षेत्राला निश्चितच होईल.
वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली डीसीबी बँक लिमिटेड ही २० राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४१८ शाखा असलेली नवीन पिढीची खासगी क्षेत्रातील बँक आहे. बँक प्रामुख्याने पगारदार वर्गापेक्षा एमएसएमई, तसेच लहान व्यावसायिकांना कर्ज वितरण करते. बँकेच्या कर्जदारांपैकी ९६ टक्के सोल प्रोप्रायटर असून ३१ टक्के उत्पादन क्षेत्रात, तर ३६ टक्के वस्तू व्यापारात (ट्रेडिंग) कार्यरत आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत बँकेने ३२,९६६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा मुख्य भर तारणकर्ज देण्याकडे आहे.
आपल्या व्यवसायवृद्धीसाठी फी उत्पन्नाचा एक घटक म्हणून बँकेने एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, आदित्य बिर्ला सन लाइफ, आदित्य बिर्ला हेल्थ इत्यादींसारख्या अनेक विमा कंपन्यांशी त्यांच्या उत्पादनांचे वितरण करण्यासाठी धोरणात्मक युती केली आहे. पतविषयक जोखीम मूल्यांकनात बँकेने काळानुरूप बदल केले असून डेटा विश्लेषणाचा वापर केला जातो.
डीसीबीचे डिसेंबर २०२२ साठीच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी १,१६७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११३.८५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ५१ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीची तिसऱ्या तिमाहीची निव्वळ व्याजापोटी नफ्याचे मार्जिन (निम) ४.०२ टक्के असून क्रेडिट कॉस्ट केवळ ०.३४ टक्के आहे. बँकेची अनुत्पादित कर्ज अर्थात नेट एनपीएचे प्रमाण १.३७ टक्क्यांवर उतरले असून नजीकच्या काळात ते अजून कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या १०६ रुपयांचा आसपास असलेला (पुस्तकी मूल्याहून कमी) हा शेअर १८ महिन्यांत २५ टक्के परतावा देऊ शकेल.
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत, तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
- अजय वाळिंबे / stocksandwealth@gmail.com