लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी घोडदौड कायम असून सेन्सेक्स ८१,००० अंश पातळीच्या नजीक पोहोचला आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीने प्रमुख निर्देशांक उच्चांकी शिखरावर स्थिरावले. या जोडीला परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांकडून बाजाराकडे अखंड निधी ओघ सुरू आहे.

मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५१.६९ अंशांनी वधारून ८०,७१६.५५ या नव्या उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३३.४४ अंशांची कमाई करत ८१,००० अंशांच्या नजीक म्हणजेच ८०,८९८.३० या नवीन विक्रमी उच्चांकापर्यंत मजल मारली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २६.३० अंशांची भर घातली आणि तो २४,६१३ च्या सार्वकालिक उच्च पातळीवर स्थिरावला. सत्रात त्याने २४,६६१.२५ हे नवीन विक्रमी शिखराला स्पर्श केला.

हेही वाचा >>>Anant Ambani Wedding Cost : अनंत अंबानीच्या शाही लग्नात ५००० कोटींचा खर्च, मुकेश अंबानींची संपत्तीवर किती फरक पडणार?

आर्थिक वर्ष २०२४-२५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी परदेशी गुंतवणूकदारांची सक्रियता आणि ते भांडवली बाजारामध्ये निव्वळ खरेदीदार बनल्यामुळे शुक्रवारपासून सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी धाव घेत आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, उच्च मूल्यांकनाबाबत चिंता कायम असूनही लार्ज कॅप क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे सुरुवातीलाच आलेले उत्साहवर्धक तिमाही निकालांनी बाजाराला चैतन्य मिळवून दिले आहे.

विद्यमान परिस्थितीत गुंतवणूकदार हे काही समभागांच्या मूल्यांकनाविषयी चिंतेत असल्यामुळे सकाळच्या सत्रातील तेजी टिकवून ठेवण्यास बाजार अपयशी ठरले. येत्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प आणि बहुतांश कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होणार असल्याने, गुंतवणूकदारांना ठोस दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, टेक महिंद्र, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि एशियन पेंट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे, कोटक महिंद्र बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली. ताज्या शिरस्त्याप्रमाणे, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारच्या सत्रात २,६८४.७८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

बुधवारी बाजार बंद

मोहरमनिमित्त बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने, राष्ट्रीय शेअर बाजारासह मुंबई शेअर बाजारातील समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे बाजारातील व्यवहार सुरू राहतील.

सेन्सेक्स ८०,७१६.५५ ५१.६९ ०.०६ %

निफ्टी २४,६१३ २६.३० ०.११%

डॉलर ८३.५८ -३

तेल ८४.१३ -०.८० %