वर्ष १८६१ ते १९०६ या कालावधीत या माणसाने बाजारात धुमाकूळ घातला. ९ जुलै १८७५ रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. त्यावेळेस हे गृहस्थ ४४ वर्षांचे होते. मुंबई शेअर बाजाराची स्थापना करण्यात इतरांबरोबर प्रेमचंद रायचंद हेसुद्धा होते. राजाबाई आणि रायचंद दिपीचंद यांचे हे पुत्ररत्न. वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता. मुलाने चांगले शिकावे म्हणून वडिलांनी प्रेमचंदला सुरतहून मुंबईला आणले आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. वर्ष १८४९ मध्ये केवळ वयाच्या अठराव्या वर्षी प्रेमचंद यांनी शेअर दलालीचा व्यवसाय सुरू केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रतनचंद लाला नावाच्या एका श्रीमंत आणि यशस्वी शेअर दलालाबरोबर वर्ष १८५२ मध्ये प्रेमचंद यांनी साहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वर्ष १८६१ मध्ये अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झाले. ब्रिटनला अमेरिकेकडून कापसाचा पुरवठा व्हायचा. हा पुरवठा बंद झाला म्हणून इंग्लंडने कापसाची भारतातून खरेदी सुरू केली. अचानक निर्माण झालेल्या या मागणीमुळे कापसाचा प्रचंड साठा करायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग प्रेमचंद यांनी जेथे हात घातला तेथे पैसा कमावला. त्यानंतर बँक ऑफ बॉम्बेवरदेखील ताबा मिळविला.

हेही वाचा – फेड रिझर्व्हच्या विधानानंतर जागतिक बाजारात घसरण, सेन्सेक्स-निफ्टीही कोसळले, नेस्लेचे शेअर्स वधारले

अखेर बुडबुडा फुटला १ मे १९६५ ला अमेरिकी सिव्हिल वॉर संपुष्टात झाल्यानंतर ब्रिटनने पुन्हा अमेरिकेतून कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली. परिणामी भारतातील कापसाची खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले. त्यामुळे त्यापाठोपाठ बँक ऑफ बॉम्बे कोसळली. जेव्हा प्रेमचंद रायचंद यांचा व्यवसाय जोरात होता, त्या वेळी त्यांनी एकरकमी १७१.५ कोटी रुपये मोजले होते. त्या काळात जगातल्या कुठल्याही शेअर बाजारात एकरकमी एवढी मोठी रक्कम कोणीही मोजली नव्हती. वर्ष १९०६ मध्ये प्रेमचंदचा मृत्यू झाला. परंतु त्या अगोदर त्याने वर्ष १८६९ मध्ये २ लाख रुपये खर्च करून आपल्या आईच्या नावाने राजाबाई टॉवर बांधला. या टॉवरला असलेले घड्याळ कुठूनही बघता यायचे. त्यांचा स्वतःचा असलेल्या प्रमोद्यान या बंगल्यात प्रेमचंद यांनी निराधार मुलींसाठी शाळा सुरू केली. वर्ष २००६ मध्ये प्रेमचंद यांच्या निधनाला १०० वर्षे पूर्ण झाले. त्या वेळी त्यांचे चरित्र प्रकाशित झाले. त्यांच्याबद्दल माहिती देणारे पुस्तके, विविध वर्तमानपत्रांमध्ये आलेले लेख असे विपुल लेखन उपलब्ध आहे.

प्रेमचंद या माणसाने प्रचंड संपत्ती मिळवली आणि प्रचंड संपत्ती गमावलीदेखील. मुंबईला जमिनीची मागणी वाढू लागली म्हणून समुद्राच्या खाडीत भर घालून समुद्र मागे हटवण्याचे काम सुरू झाले. या कामी स्थापन झालेल्या कंपनीचा ५००० रुपये दर्शनी किमतीचा समभाग त्या वेळी भांडवली बाजारात एक कोटी सहा लाख रुपयांना विकला जात होता. अशा प्रकारची सूज म्हणजे बाजाराची भरभराट नाही. समभागाचे भाव जसे रॉकेटच्या वेगाने आकाशात पोहोचले तसेच ते खालीसुद्धा आले. परिणामी त्यावेळचे सर्वच मोठे उद्योगसमूह अडचणीत आले आणि अनेकांचे दिवाळे निघाले. अशा वेळेस इंग्लंडमध्ये फक्त एकाच उद्योग समूहावर त्या काळात विश्वास ठेवला गेला, तो म्हणजे टाटा उद्योग समूह. टाटा समूहदेखील अडचणीत आला होता. मात्र त्यांनी त्यांची कारणे स्पष्ट केली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावाच लागेल, असे सांगून त्यांनी कर्जदाराची समजूत घातली.

हेही वाचा – “ज्येष्ठ आणि चतुरस्र अर्थमंत्री”

बाजाराकडून वाजवी अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना बाजार कधीच नाराज करत नाही. सट्टा खेळणारी माणसे प्रचंड हुशार असतात, परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकणारी हुशारी उपयोगाची नाही. आता तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. परंतु हे तंत्रज्ञान जेव्हा नव्हते तेव्हा समुद्रात उभ्या असणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या मोठ्या जहाजांजवळ छोट्या होड्या पाठवून इतरांच्या अगोदर कापसाच्या भावाची माहिती मिळवणे. बाजारात शेअर दलालीचा व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारच्या नोंदी कागदावर प्रेमचंद ठेवत नव्हते. जैन समाजात इंग्रजी बोलणारा पहिला शेअर दलाल आणि शिक्षण चालू असताना इंग्रजांसोबत झालेल्या ओळखीचा शेअर दलालीचा व्यवसाय वाढविण्यासाठी फायदा करून घेतला. प्रेमचंद यांना बँक ऑफ बॉम्बेच्या संचालक मंडळात घ्यायला हवे अशी शिफारस थेट ब्रिटिश व्यक्तीने केली, यावरून त्यांचे काय कसब होते हे लक्षात येईल. शेवटी एका अमेरिकन चित्रपटाच्या आठवणीने या लेखाचा शेवट करता येईल तो म्हणजे ‘कॅच मी इफ यू कॅन’ हा चित्रपट.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the year 1849 at the age of only eighteen premchand started the stock brokerage business know who premchand is print eco news ssb