अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी आणि समभागांच्या वाजवी मूल्यांकनामुळे भारतीय भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत. परिणामी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मे महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात ३७,३१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली ही गेल्या सहा महिन्यांतील मोठी गुंतवणूक आहे. याआधी त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये समभागांमध्ये ३६,२३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती.
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी २ ते २६ मेदरम्यान भांडवली बाजारात ३७,३१६ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. तर त्याआधीच्या एप्रिल महिन्यात ११,६३० कोटी रुपये आणि मार्चमध्ये ७,९३६ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक झाली होती. मात्र मार्चमधील गुंतवणूक प्रवाह प्रामुख्याने अमेरिकेतील जीक्यूजी समूहाने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने सकारात्मक राहिला. विद्यमान वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी ३४,००० कोटी रुपये काढून घेतले होते.
समभागांव्यतिरिक्त परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात रोखे बाजारात १,४३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विद्यमान २०२३ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत २२,७३७ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक केली आहे. जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती असताना भारतीय अर्थव्यवस्थेची समाधानकारक वाटचाल, देशांतर्गत पातळीवर महागाई आटोक्यात आल्याने रिझर्व्ह बँकेने व्याज दरवाढीला विराम आणि सरलेल्या मार्च तिमाहीत कंपन्यांच्या दमदार आर्थिक कामगिरीमुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण झाला आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण खरेदीमुळे निफ्टी मे महिन्यात २.४ टक्क्यांनी वधारला आहे आणि वरच्या दिशेने आगेकूच कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे येस सिक्युरिटीजच्या भांडवली बाजार विश्लेषक निताशा शंकर यांनी सांगितले.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या व्ही. के. विजयकुमार यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त केलंय. जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि ब्राझील यासारख्या सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश आहे, तर विकसित आणि उदयोन्मुख बाजारांना सध्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. क्षेत्रीय पातळीवर परदेशी गुंतवणूकदार वाहन निर्मिती, भांडवली वस्तू, आरोग्य सेवा, तेल आणि वायू आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. शिवाय, वित्तीय सेवा, विशेषतः बँकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी निदर्शनास आली, असंही जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस मुख्य रणनीतीकर व्ही. के. विजयकुमार म्हणालेत.