Indian Share Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरक्त व्यापार शुल्कामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता निर्माण जाझी आहे. अशात मुंबई शेअर बाजार यातून सावरल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी शेअर बाजारातील जवळपास सर्वच निर्देशांक तेजीत पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारी (१५ एप्रिल) २ टक्क्यांहून अधिक वधरले.

दरम्यान बाजारातील आजच्या तेजीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी अतिरिक्त व्यापार शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या सर्व नुकसान प्रभावीपणे भरून निघाले आहे. आज निफ्टी५० इंट्राडे २.४% पर्यंत वधारला, तर सेन्सेक्स १,६०० पेक्षा जास्त अंकांनी वाढल्याचे पाहायला मिळाले.

शेअर बाजारात आज (मंगळवारी) आलेली उसळी ही केवळ तांत्रिक सुधारणांमुळे नव्हती. तर जगभरातील अस्थिर वातावरणात अनेकांना भारत ही सुरक्षित बाजरपेठ वाटत आहे. त्यामुळे हे सुद्धा भारतीय बाजारात तेजी येण्यामागिल एक कारण होते.

“आमच्या पोर्टफोलिओमध्ये भारताला जास्त महत्त्व आहे. चांगल्या देशांतर्गत वाढीमुळे आणि चीनपेक्षा वेगळ्या असलेल्या पुरवठा साखळ्यांच्या विविधीकरणामुळे भारतीय इक्विटीकडे मध्यम कालावधीत एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे, असे द ग्लोबल सीआयओ ऑफिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी दुगन म्हणाले.

भारतीय बाजारात जरी आज मोठी तेजी आली असली तरी, ही नव्या तेजीची सुरुवात आहे असे म्हणण्याची घाई कोणीही करेना झाले आहे.

“अमेरिकेचा निर्देशांक एस अँड पी ५०० एप्रिलच्या नीचांकी पातळीपेक्षा ९% वर आहे. तर, निफ्टी निर्देशांक जेमतेम ३% वर आला आहे. आम्ही अजूनही नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दिसत असलेले शॉर्ट-कव्हरिंग आणखी नफा वाढवू शकतो, परंतु ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांभोवतीची अनिश्चितता कमी झालेली नाही. त्यामुळे विशेषतः औषधनिर्माण क्षेत्राला नुकसान होऊ शकते”, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले.

आशियाई बाजारांची स्थिती

काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय शेअर बाजार बंद होते. मात्र, आशियाई बाजारात, हाँगकाँगचा हँग सेंग, जपानचा निक्केई २२५, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नफ्यात होते. सोमवारी अमेरिकन बाजारही सकारात्मक ट्रेंडसह बंद झाले.

आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.०९ टक्क्यांनी वाढून ६४.९४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ २,५१९.०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.