सुधीर जोशी
भारतातील किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहनशील मर्यादेच्या खाली ५.८८ टक्क्यांच्या पातळीवर आला आहे. त्या पाठोपाठ अमेरिकेतील महागाईदेखील आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली. देशांतर्गत आघाडीवर आणखी दिलासादायक बाब म्हणजे घाऊक दरांवर आधारित महागाईचा दरदेखील गेल्या २१ महिन्यांच्या तळाला पोहोचला. मात्र रिझर्व्ह बँकेप्रमाणे अमेरिकी मध्यवर्ती बँक असणाऱ्या फेडरल रिझर्व्हचा (फेड) पवित्रा सावध होता. ज्यामुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त झाली. फेडने पतधोरण जाहीर केल्यानंतर बाजारातील घसरण तीव्र झाली. गेले काही दिवस तेजीच्या वाटेवर आरूढ झालेल्या बँकांच्या समभागातदेखील विक्रीचा मारा झाला. साप्ताहिक तुलनेत बाजाराने पुन्हा एकदा एक टक्क्याहून जास्त घसरण अनुभवली.
ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया लिमिटेड :
गेली १२२ वर्षे जुनी मुरुगप्पा समूहातील ही कंपनी आहे. उच्च गुणवत्तेच्या स्टील ट्यूब आणि पट्ट्या बनविणारी ही कंपनी अनेक वाहन उद्योगांना लागणाऱ्या ट्यूब आणि स्टीलचा सांगाडा (फ्रेम) पुरविते. तसेच सायकल निर्मितीमध्ये या कंपनीचा मोठा वाटा आहे. हर्क्युलस व बीएसए या नाममुद्रेच्या सायकल लोकप्रिय आहेत. कंपनीच्या उप-कंपन्यांमध्ये प्रामुख्याने सीजी पॉवर आणि शांती गिअर्स या कंपन्या आहेत. लहान कंपन्यांचे अधिग्रहण करून ही कंपनी बॅटरीवर चालणारी मोठी वाणिज्य वाहतूक वाहने आणि मोबाइल फोनमधील कॅमेऱ्याचे भाग बनविण्याच्या व्यवसायात विस्तार करत आहे. कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीची कामगिरी उल्लेखनीय होती. कंपनीने उत्पन्नात ५३ टक्के तर नफ्यात २६ टक्के वाढ नोंदवली आहे. विविध क्षेत्रांतील कंपनीचा विस्तार आणि अनेक वर्षांची परंपरा लक्षात घेता समभागातील सध्याच्या २,८०० ते २,९०० रुपयांच्या पातळीवर समभागात गुंतवणूक करता येईल.
हॅवेल्स :
हॅवेल्स इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी विद्युत आणि वीज वितरण उपकरणांची उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादनात औद्योगिक आणि घरगुती सर्किट संरक्षण स्विचगिअर, केबल आणि वायर, वॉटर हिटर, पंखे, पॉवर कपॅसिटर, सीएफएल दिवे, ल्युमिनेअर्स यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. क्रॅबट्री, सिल्व्हेनिया, कॉन्कॉर्ड, ल्युमिअन्स आणि लिनोलाइट सारख्या काही प्रतिष्ठित जागतिक नाममुद्रांची मालकी कंपनीकडे आहे. ‘हॅव्हल्स गॅलेक्सी’ दालनांद्वारे ग्राहकांना सर्व विद्युत आणि रोषणाई (लाइटिंग) संबधित वस्तूंची खरेदी एकाच छताखाली करता येते. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात १४ टक्के वाढ झाली. मात्र आधीच्या महागाईच्या काळातील जास्त किमतीच्या उत्पादनामुळे नफ्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी घसरून नफा १८७ कोटींवर आला. कंपनीच्या समभागात त्यामुळे घसरण होऊन आता ते पुन्हा गुंतवणूक योग्य पातळीवर आले आहेत. कंपनीला आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांच्या किमती आता स्थिर झाल्या आहेत. तसेच गृहनिर्माण क्षेत्राकडून येणाऱ्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या कामगिरीत पुन्हा सुधारणा होईल. समभागाच्या १,१५० रुपयांच्या पातळीवरील गुंतवणूक वर्षभरात चांगला नफा मिळवून देऊ शकते
अल्ट्राटेक सिमेंट :
आगामी दोन वर्षे सिमेंट उत्पादक कंपन्यांसाठी अधिक लाभदायक राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या पायाभूत सोयी आणि पंतप्रधान आवास योजनेवर वाढणारा खर्च सिमेंटच्या मागणीत वाढ करेल. बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील चांगली मागणी अपेक्षित आहे. समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातूनही सिमेंटला मागणी वाढेल. मागील दोन तिमाहीत इंधनदर वाढीमुळे कमी झालेले नफ्याचे प्रमाण आता वाढेल. कोळशाच्या आणि डिझेलच्या किमती गेल्या दोन महिन्यांत खाली आल्या आहेत. कंपन्यांनी काही प्रमाणात सिमेंटच्या किमती वाढवल्याही आहेत. या व्यवसायात सुरू असलेल्या विविध कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा आणि अधिग्रहणाचा परिणाम किमतीवरचा ताण कमी करेल. अल्ट्राटेक सिमेंट आपली क्षमता सध्याच्या ११६ दशलक्ष टनांवरून वर्षभरात १३१ दशलक्ष टनांवर नेत आहे. डिसेंबर महिन्यात साडेपाच मेट्रीक टनांची भर घालून कंपनीने क्षमता १२१ दशलक्ष टनांवर नेली आहे. सध्याच्या ७,००० रुपयांच्या घसरलेल्या भावात गुंतवणुकीस वाव आहे.
व्ही-गार्ड :
एकेकाळी संगणक, वातानुकूलित यंत्र, शीतकपाट (फ्रिज) अशा महागड्या उपकरणांना लागणारे विद्युत दाब नियंत्रित आणि स्थिर करणारे यंत्र (व्होल्टेज स्टॅबिलायझर), यूपीएस अशा उत्पादनांसाठी ही कंपनी नावाजलेली होती. पण कंपनीने पुढे पाण्याचे पंप, हीटर, पीव्हीसी केबल, पंखे, सौर ऊर्जा जनित्रे, घरगुती दिव्यांची बटणे अशी उत्पादन व्याप्ती वाढवत स्वयंपाकघरातील उपकरणे बनविण्यासही सुरुवात केली. कंपनीने मिक्सर ग्राइंडर, गॅसच्या शेगड्या, इंडक्शन कुकिंग टॉप, टोस्टर, ग्रिल अशी आधुनिक उत्पादने सादर केली. आता सनफ्लेम या प्रसिद्ध कंपनीमध्ये हिस्सा खरेदी करून कंपनी आपल्या स्वयंपाक घरातील उपकरणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करत आहे. त्यामुळे कंपनीची विपणन क्षमता वाढेल तसेच दक्षिणेकडील राज्यांपलीकडे कंपनीला सुलभतेने विस्तार करता येईल. कंपनीच्या एकूण उत्पादनात उच्च किमती व नफा असणाऱ्या घटकांचा टक्का वाढेल. कंपनीच्या समभागात थोड्या घसरणीची वाट पाहून २५० रुपयांच्या पातळीत खरेदी फायद्याची ठरेल.
सरलेल्या सप्ताहात व्याजदरात झालेली वाढ शेवटची असण्याची बाजाराची अपेक्षा फोल ठरली. मध्यवर्ती बँकांनी महागाई नियंत्रणासाठी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. मात्र यापुढील व्याजदर वाढ सौम्य राहण्याचे संकेत मध्यवर्ती बँकांकडून मिळाले आहेत. सध्या भारतीय भांडवली बाजार परदेशी गुंतवणूकदारांना फारसा आकर्षित करणार नाही. यामुळे आगामी काळात बाजाराचा कल नरमाईचाच राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी घसरलेल्या बाजारात चोखंदळ राहून चांगली कामगिरी असणाऱ्या बचावात्मक कंपन्यांमध्ये वाजवी मूल्य मिळेल तेव्हाच खरेदी करावी.
सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com