सक्रिय परदेशी गुंतवणूकदार आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील खरेदीने प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा नवीन उच्चांकी पातळीला गवसणी घातली आहे. जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरणाकडे दुर्लक्ष करत, गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३३९.६० अंशांनी वधारला. तो ६५,७८५.६४ या सर्वोच्च पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, सेन्सेक्सने ३८६.९४ अंशांची कमाई करत ६५,८३२.९८ या ऐतिहासिक उच्चांकी शिखर गाठले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९८.८० अंशांची भर पडली आणि तो १९,४९७.३० च्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

जागतिक पातळीवर कमकुवत संकेत असूनही परदेशी गुंतवणूकदारांनी लावलेल्या समभाग खरेदीच्या सपाट्यामुळे निर्देशांकांना चालना मिळाली आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक आणि अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावाने जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः बीएसईकडून शेअर बायबॅकची घोषणा; ८१६ रुपयांच्या दराने शेअर्स खरेदी करणार

सेन्सेक्समध्ये, महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ५ टक्क्यांच्या तेजीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, नेस्ले, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स आणि विप्रो या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तर मारुती, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि टाटा स्टीलच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात १,६०३.१५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

हेही वाचाः अदाणी समूहाला आणखी एक झटका; आधी शेअर्स घसरले, आता ‘या’ कंपनीचे मोठे नुकसान झाले

सेन्सेक्स ६५,७८५.६४ ३३९.६० ( ०.५२)

निफ्टी १९,४९७.३० ९८.८० ( ०.५१)

डॉलर ८२.४७ २२

तेल ७६.८६ ०.२७

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indices continue to surge to record highs to new highs vrd