ऐतिहासिक उच्चांकी पातळीला सर करणाऱ्या दोन दिवसांच्या तेजीनंतर काहीशी विश्रांती म्हणून आणि अमेरिकेतील आणि युरोपीय बाजाराचा नकारात्मक कल पाहता भाव वधारलेल्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीने गुरुवारच्या अस्थिर व्यवहाराची अखेर मुख्य निर्देशांकांच्या घसरणीने झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स गुरुवारचे बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा २८४.२६ अंश (०.४५ टक्के) घसरणीसह ६३,२३८.८९ वर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २० समभाग घसरणीत राहिले. दिवसअखेर जरी घसरणीने झाली असली तरी सत्रारंभीच्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्सने ६३,६०१.७१ अशा दिवसांतर्गत व्यवहारातील नवीन विक्रमी शिखराला गवसणी घातली.
हेही वाचाः अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेने सुरू केली नवी सेवा; तुम्हालाही फायदा होणार
निर्देशांकाला पुढे अस्थिर व्यापाराचा सामना करावा लागला आणि दिवसाच्या उत्तरार्धात कमावलेले त्याने सारे गमावले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८५.८० अंश (०.४५ टक्के) नुकसानीसह १८,७७१.२५ वर बंद झाला. बुधवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून झालेल्या (४,०१३.१० कोटी रुपयांच्या) समभाग खरेदीमुळे या निर्देशांकाने १८,८५६.८५ या सार्वकालिक उच्च पातळीवर बंद नोंदविला होता. निर्देशांकात सामील आघाडीच्या समभागांपेक्षा, गुरुवारच्या व्यवहारात मिड व स्मॉल कॅप समभागांमधील घसरणीची मात्रा मोठी होती. परिणामी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १.०७ टक्के आणि ०.६४ टक्के असे अधिक घसरणीसह बंद झाले.
हेही वाचाः बँकांच्या ‘या’ स्पेशल एफडीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कोणत्या योजनेची अंतिम मुदत कधी संपणार?