देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेचा गेल्या लेखात उल्लेख केला होता. मात्र जगात बँकांची सुरुवात कुठून आणि कधी झाली याचा इतिहास अतिशय रंजक आहे. बँकिंगचे मूळ खरे तर भारतात होते, असेदेखील म्हणता येईल. भारतीय संस्कृती ही नक्कीच सर्वात जुनी आणि प्राचीन आहे. मात्र सद्य:स्थितीप्रमाणे त्यावेळी बँका कार्यरत नव्हत्या. त्यावेळी पिके, अन्नधान्य, खाद्य आणि बियाणे देणाऱ्या बँका होत्या. पुरातन भारतात असे उल्लेख आढळतात की, ज्यात ठेवी घेतल्या जायच्या आणि पैसे उधारदेखील दिले जायचे. अर्थात हे करणारी एक व्यक्ती होती ती म्हणजे धनको किंवा सावकार. पुढे कधीतरी त्याची माहिती आपण घेऊ.
सध्याच्या बँकिंग स्वरुपाचे श्रेय जाते ते इटलीला. जगाला माहीत असणारी सगळ्यात जुनी बँक म्हणजे मेडीची (Medici) बँक आहे. जिने १३९७ ला जन्म घेतला आणि १४९४ ला दिवाळखोरी जाहीर केली. दुसरी अशीच बँक म्हणजे बँका मोंन्टे दाय पसाची दि सियीना (बीएमपीएस) जिची स्थापना १४७२ मध्ये झाली आणि ती आजही त्याच नावाने कार्यरत आहे. अर्थात एवढ्या प्रचंड प्रवासात बरेच धक्के बसले आणि तिची मालकीदेखील बदलली, पण बँक आणि तिचे नाव कायम राहिले. अशीच एक बँक होती बॅन्को दि नापोली जी तशी सगळ्यात जुनी बँक म्हणजे जिची स्थापना १४६३ मध्ये इटलीला झाली, पण २००२ मध्ये सॅनपोलो नावाच्या दुसऱ्या बँकेमध्ये तिचे विलीनीकरण करण्यात आले आणि मूळ नाव बदलले गेले. अशा प्रकारे इटलीमधून सुरू होऊन बँकिंग विश्वाने १४ व्या आणि १५ व्या शतकात हळूहळू पूर्ण युरोप आणि अमेरिकादेखील व्यापला.
हेही वाचा – माझा पोर्टफोलियो : संरक्षणसज्जतेतील स्वदेशी प्रबळता
पण बँकांच्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रगती केली ती आम्सटरडॅम शहरातील बँकेने, ती म्हणजे बँक ऑफ आम्सटरडॅमने. या बँकेने देशातील मध्यवर्ती बँकेची संकल्पना रुजवली. जरी ती स्वतः मध्यवर्ती बँक नव्हती. सुमारे ५०० वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांचा एकमेकांशी असणारा देवाणघेवाण दर या बँकेने ठरविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. यामुळे व्यापाऱ्यांच्या पैसे देण्याचा प्रश्न मिटला. ते सर्वच चलनात व्यापार सहज करू लागले. आंतरराष्ट्रीय चलनदेखील सोन्या किंवा चांदीच्या बदल्यात बँक घेत किंवा देत होती आणि त्याच बरोबरीने स्वतःकडील सोन्याचा साठादेखील ठेवण्याचे काम बँकेला करायला लागायचे. म्हणजे आज ज्या मध्यवर्ती बॅंका काम करतात ते ही बँक करायची. बँकांच्या कामाचा आणि वाढीचा रंजक इतिहास एका भागात पूर्ण होणार नाही. तेव्हा पुन्हा भेटू पुढील सोमवारी.