कौस्तुभ जोशी
गेल्या आठवड्यातील लेखात आपण ‘एफएमसीजी’ हे क्षेत्र नेमके कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे याचा आढावा घेतला. आता या लेखातून या क्षेत्रात कोणकोणत्या गुंतवणूक संधी उपलब्ध आहेत हे समजून घेऊ या. विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये ‘एफएमसीजी’ निर्देशांक जवळपास पाच टक्क्यांनी पडला आहे, याचाच अर्थ निफ्टी ‘एफएमसीजी’ कंपन्या निफ्टी आणि सेन्सेक्सच्या तुलनेत चांगली कामगिरी करत नाहीत, यामागील कारणे काय असावी? याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यावसायिक आव्हाने

आपण वस्तू बनवली आणि विकायला ठेवली तर ती विकली जातेच, ही खात्री आता ‘एफएमसीजी’ व्यवसायात राहिलेली नाही. ग्राहकाचे मानसशास्त्र समजून त्यानुसार बाजारात वस्तू उत्पादन करून विकणे आणि स्पर्धेत टिकून राहणे हे ‘एफएमसीजी’ कंपन्यांपुढील मोठे आव्हान आहे. भारताची निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्था रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असल्याने कृषी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न कमी झाले तर ‘एफएमसीजी’ कंपन्यांना पाहिजे तसा विक्रीचा आकडा गाठता येत नाही. या वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात ‘एफएमसीजी’ कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला होता. मात्र या क्षेत्रातील कंपन्यांचा तीन ते पाच वर्षांचा अभ्यास केल्यास ‘बिझनेस सायकल’ समजून घेऊन शेअरमध्ये थेट गुंतवणूक करता येते. कोलगेट, हिंदुस्थान लिव्हर, ब्रिटानिया, नेस्ले यांसारख्या कंपन्या अल्पकाळात धबधब्यासारखे परतावे नक्कीच देत नाहीत पण त्यांची उत्पादन आणि विक्री साखळी, विक्रीतील कौशल्य आणि बाजारपेठेवरची पकड लक्षात घेता पुढील तीन ते पाच वर्षांत पुन्हा एकदा अपेक्षित परतावा मिळण्याची आशा आहे.

हेही वाचा >>>अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती

‘एफएमसीजी’ कंपन्यांना नफ्याचे प्रमाण (प्रॉफिट मार्जिन) सतत चढे किंवा कायम ठेवता आले पाहिजे, हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा आणि विक्रीत वाढ होणे हे एकत्र साध्य करणे म्हणजेच एकाच बाणात अर्जुनाने दोन माशांचे डोळे टिपण्यासारखे आहे. परिणामी काही कंपन्या गुंतवणूकदारांसाठी अल्पकाळात संपत्ती निर्मिती करू शकत नाहीत. मग अशा वेळी गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या व्यवसाय प्रारूपाचा अभ्यास करायला हवा. हिंदुस्थान लिव्हर या कंपनीचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. सौंदर्यप्रसाधने, खाद्य आणि अखाद्य वस्तू, आयुर्वेदिक उत्पादने अशा सर्व क्षेत्रांत कंपनीने नवनिर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. ‘एफएमसीजी’ प्रकारातील पन्नासहून अधिक नाममुद्रा या कंपनीकडे आहेत. ऑनलाइन-ऑफलाइन सर्व माध्यमांतून कंपनीची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचतात.

‘एफएमसीजी’ कंपन्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या कंपन्यांना हातात सतत रोकड पैसा येण्याची सवय असल्याने लाभांश देण्यात या कंपन्या आघाडीवर आहेत. अर्थातच लाभांश मिळवण्यासाठी ‘एफएमसीजी’ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी असे नाही. पण सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर हळूहळू जमा करून ठेवले आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपन्यांनी दिलेला लाभांश एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आत्ता तिशीत आणि चाळिशीत असलेल्यांनी निवृत्तीच्या गुंतवणुकीसाठी जो मुख्य ‘पोर्टफोलिओ’ उभारायचा आहे, त्यासाठी निफ्टीमधील ‘एफएमसीजी’ कंपन्यांचा विचार आवर्जून करावा. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एफएमसीजी फंडात दहा वर्षाच्या ‘एसआयपी’वर १३.६४ टक्के एवढा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे, यावरून दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे स्पष्ट होतात .

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन

आयटीसी या भारतातील आघाडीच्या कंपनीने सिगारेट या आपल्या मुख्य व्यवसायातून दूर होत किंवा त्यावरील अवलंबित्व कमी करत विविध क्षेत्रात आपला पाय रोवायला सुरुवात केली आहे. हॉटेल, पॅकेजिंग आणि छपाईसाठी लागणारे विशिष्ट दर्जाचे कागद, कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या खाद्य आणि पेय वस्तू, शालेय आणि कार्यालयीन कामकाजासाठी स्टेशनरी ते देव्हाऱ्यातील अगरबत्ती अशा अनेकविध क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गेल्या वीस वर्षांत तीन वेळा कंपनीने बक्षीस समभाग (बोनस शेअर) दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीची फळे मिळतात ती अशी!

‘निफ्टी एफएमसीजी’मधील डाबर, गोदरेज कन्झ्युमर, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट या मिडकॅप कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत आपले व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. या क्षेत्रात हळूहळू नावीन्यपूर्ण व्यवसाय असलेल्या कंपन्या शेअर बाजारात येत आहेत. डॉमिनोज या परदेशी नाममुद्रेचे स्वामित्व हक्क असलेली जुबिलन्ट फूड ही कंपनी अलीकडील काळात गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेली कंपनी आहे. मद्यार्क आणि मध्य निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या युनायटेड ब्रुअरी आणि युनायटेड स्पिरिट्स या कंपन्या कूर्मगतीने का होईना आपले व्यवसाय करत असतात.

बदलाचे लाभार्थी

लोकसंख्येचे क्रयशक्तीचे प्रमाण वाढेल, तसतसे या क्षेत्रात नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. त्याचबरोबर बदलते उत्पादन, पुरवठा साखळी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आंतरराष्ट्रीय ई कॉमर्स कंपन्यांचा भारतातील वाढता प्रभाव यामुळे हे क्षेत्र वाढणार आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण या क्षेत्राच्या पथ्यावर पडणारे आहे. भविष्यात भारतातील शेती यांत्रिक पद्धतीने व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील उद्योग अधिक वाढीस लागणार आहेत.

सर्व गोष्टींचा विचार करता तुमच्या पोर्टफोलिओचा एक हिस्सा म्हणून ‘एफएमसीजी’ क्षेत्र असायला अजिबात हरकत नाही.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment opportunities in fmcg print eco news amy
Show comments