गेल्या आठवड्यातील लेखात आपण भारतातील वाहन निर्मिती क्षेत्राविषयी माहिती करून घेण्यास सुरुवात केली. वाहन निर्मिती क्षेत्रातील बदलते व्यावसायिक डावपेच, ग्राहकांच्या खरेदीच्या मानसिकतेत झालेला बदल आणि या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असलेली गुंतवणूक संधी याविषयी आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.
भारतातील उदारीकरणानंतर झालेल्या आर्थिक बदलांमुळे लोकांची नक्की कोणत्या वस्तू खरेदी करायच्या याबाबतची मानसिकता बदलली आहे. पूर्वी हॅचबॅक किंवा लहान आकाराच्या गाड्या विकत घेण्याकडे भारतीय ग्राहकांचा कल दिसत होता, तो बदलून आता सेदान आणि स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल्स अर्थात आकाराने मोठ्या व आलिशान गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढताना दिसतो आहे.
हेही वाचा – माझा पोर्टफोलियो: पोर्टफोलियोकडे ‘अर्थ’ वहनासाठी छोटा साथी
व्यावसायिक वाहन निर्मितीतील बदल
टाटा मोटर्स, अशोक लेलँड, आयशर मोटर्स यांच्या बरोबरीने महिंद्रा अँड महिंद्रा, भारतबेंझ यासारख्या कंपन्यांनी ट्रक आणि अवजड वाहतुकीसाठी लागणारी वाहने बनवण्यावर भर दिला. भारतातील व्यापारउद्योग वाढू लागला तसतसे अधिकाधिक चांगले रस्ते उपलब्ध झाले. वेगवान प्रवास आणि मालाची वाहतूक करणे आवश्यक झाले तसा या उद्योगाचा विकास व्हायला सुरुवात झाली. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान हस्तांतरणाचे प्रयत्न यशस्वी झाल्यावर युरोपीय कंपन्यांच्या तोडीस तोड वाहन निर्मिती भारतातील कंपन्या करू लागल्या. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत परदेशी कंपन्यांनी भारतात आपला व्यवसाय विस्तार करण्यास सुरुवात केली, अर्थात ही सुरुवात अत्यंत कूर्मगतीने झालेली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा देश
भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि लोकसंख्येचे एक जाणवण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनास कितीही उशीर झाला तरीही त्या तंत्रज्ञानाच्या विस्तारात आणि वापरात भारत कायमच जलद प्रगती करतो. अवघ्या काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहने हा शब्द भारतीयांसाठी नवीन होता. आता जगातील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने तयार करणारा आणि विकत घेणारा देश म्हणून भारताची वाटचाल सुरू झाली आहे. भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातर्फे अशा वाहनांच्या निर्मितीमध्ये उत्पादन संबंधित प्रोत्साहन योजना (पीएलआय) देण्यात येतात व याचा फायदा या उद्योगाला होताना दिसतो आहे. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक प्रस्तावित आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीच्या योजना जाहीर केल्या आहेत. टाटा मोटर्सने दोन अब्ज डॉलर, कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन या कंपनीने एक अब्ज डॉलर, मारुती सुझुकी (२०३० पर्यंत) साडेपाच अब्ज डॉलर, हिरो मोटोकॉर्पने दीड हजार कोटी रुपये एवढ्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूक या क्षेत्रात प्रस्तावित आहे. एप्रिल २०२३ मध्ये सरकारी क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीने प्रवासी वाहने आणि एक हजार अवजड वाहतुकीसाठी बांधली जाणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी साडेसहाशे कोटी रुपयाचे वित्तपुरवठ्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.
वाहन निर्यातीत भारत कुठे ?
दक्षिण आणि आग्नेय आशिया, युरोप, जपान आणि कोरिया अशा सर्व बाजारपेठांपासून भारत मोक्याच्या ठिकाणी वसलेला असल्यामुळे भारताची वाहन निर्मिती क्षेत्रातील भविष्यकालीन वाटचाल निश्चितच चांगली असणार आहे. २०२३ या वर्षात भारतातील वाहन निर्मिती उद्योगाकडून केला जाणारा निर्यातीचा आकडा घटला आहे. अमेरिका, युरोपीय बाजारपेठा, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडातील अर्थव्यवस्थांमध्ये मागणी वाढू लागली तर येत्या काही वर्षात निर्यात पुन्हा मूळ स्थितीत जाऊन पोहोचेल. २०२२-२३ या वित्त वर्षाच्या अखेरीस सर्व एकूण निर्यातीचा आकडा ४७,६१,४८७ वाहने इतका होता. भारताची वाहन निर्मिती उद्योगातील निर्यात दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, चिली, पेरू, तुर्कस्तान, नायजेरिया, इंडोनेशिया या देशांशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबिया आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे व त्यासाठी लागणारी वाहने आणि त्या संबंधित यंत्रसामग्री यांची निर्यात वाढली आहे.
वाहन उद्योगातील कंपन्या
टाटा मोटर्स या कंपनीने जग्वार आणि लँड रोव्हर या ब्रिटिश कंपन्यांचे केलेले अधिग्रहण भारतीय वाहन निर्मिती उद्योगासाठी मैलाचा दगड ठरला. एका साचेबद्ध पद्धतीच्या गाड्या बनवणाऱ्या टाटा मोटर्सचा दृष्टिकोनच या अधिग्रहणाने बदलून गेला. गेल्या पाच वर्षात एकाहून एक अधिक सरस वाहनांची निर्मिती टाटा मोटर्सकडून केली जात आहे.
मारुती सुझुकी हा एकेकाळी भारत सरकारचा उपक्रम होता. हळूहळू सरकारने आपली गुंतवणूक कमी करत आणली आणि मारुती सुझुकीने भारतीय बाजारातील आपले स्थान अधिकच बळकट केले. फक्त किफायतशीर गाड्या बनवणारी कंपनी हा शिक्का पुसून टाकण्यासाठी कंपनी अधिकाधिक आधुनिक वाहनांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मारुती सुझुकीमुळे हरियाणातील अख्खे शहरच वाहनांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.
वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या या कायमच एका समूहासारख्या काम करतात. वाहनाचे सुटे भाग, टायर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अभियांत्रिकी उपकरणे बनवण्यासाठी एक मोठी उत्पादन फळीच राबते व यामध्ये मध्यम आणि लघु उद्योजकांचाही समावेश असतो. अलीकडील काळात संरक्षण क्षेत्रातील वाहन निर्मितीची नवीन संधी कंपन्यांना खुणावू लागली आहे. ती म्हणजे अवजड यंत्रसामग्री वाहून नेणारे ट्रक, तोफांचे गाडे, चिलखती गाड्या, तोफांचे ओतकाम यांचा यांत समावेश होतो.
हेही वाचा – बाजारातली माणसं – करून दाखविले… चंद्रशेखर भावे
आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे भारतातील व्यवसाय
विद्यमान आर्थिक वर्षात मर्सिडीज बेंझ या कंपनीने ८,५०० आलिशान वाहने विकून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. याच कालावधीत बीएमडब्ल्यू आणि ऑडी या कंपन्यांनी अनुक्रमे साडेपाच हजार आणि तीन हजार वाहने भारतात विकली. भविष्यात या कंपन्यांचे वाहन निर्मितीचे कारखाने मोठ्या प्रमाणावर भारतात सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. फेब्रुवारी २०२३ मध्ये निसान आणि रेनॉ या कंपन्यांनी ६० कोटी अमेरिकी डॉलर एवढी गुंतवणूक येत्या पाच वर्षात भारतात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मागच्या फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील ऑडी या कंपनीने ऑडी Q3 आणि ऑडी Q3 स्पोर्ट्स बॅक या दोन आलिशान गाड्यांची निर्मिती महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे असलेल्या कारखान्यामध्ये करण्यास सुरुवात केली.
गुंतवणूक संधी
वाहन निर्मिती आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांमध्ये अशोक लेलँड, बजाज ऑटो, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, भारत फोर्ज, बॉश, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, मदरसन सुमी, टाटा मोटर्स, टीव्हीएस, एमआरएफ, सुंदरम फास्टनर्स, अपोलो टायर, अमारा राजा एनर्जी, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, जेके टायर्स, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, एस्कॉर्ट, कुबोटा मोटर्स अशा कंपन्या गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. अर्थात शेअर बाजारात या कंपन्यांचा अभ्यास करून आणि आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.
- लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.
- joshikd282@gmail.com