मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २९२.१२ लाख कोटींच्या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. उल्लेखनीय म्हणजे बाजार निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १ डिसेंबर २०२२ रोजी ६३,५८३.०७ अंशांच्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर असताना, बीएसईच्या बाजार भांडवलाने २९१.३० लाख कोटींची या आधीची उच्चांकी पातळी नोंदवली होती. मार्च महिन्यापासून भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा जोर कायम आहे. त्या जोडीला महागाईने दिलासा दिल्याने रिझर्व्ह बँकेनेदेखील अपेक्षेनुरूप व्याज दरवाढीला विराम दिल्याने अर्थव्यवस्थेच्या विकासास अनुकूल भूमिका स्वीकारली आहे. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.

‘एनएसडीएल’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०२३ पासून परदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक बाजारात खरेदीला पुन्हा सुरुवात केली. चालू वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एकूण ३४,१४६ रुपये भारतीय भांडवली बाजारातून काढल्यानंतर, त्यांनी १ मार्च ते १४ जून २०२३ दरम्यान सुमारे ७४,६६६ कोटी रुपये नक्त गुंतवले आहेत. वर्ष २०२३ मध्ये जानेवारीपासून बुधवारपर्यंत (१४ जून) परदेशी गुंतवणूकदार ४०,५२० कोटी रुपयांचे नक्त खरेदीदार राहिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः ‘सॅट’कडून सुभाष चंद्रा, पुनित गोएंका यांना तूर्तास दिलासा नाहीच

या सर्वांचा परिणाम म्हणजे मार्च महिन्यापासून बीएसईवरील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ४० लाख कोटी रुपयांनी वधारले आहे. यात अग्रणी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात २ लाख कोटी रुपयांची भर पडली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स आणि अदानी एंटरप्रायझेसच्या बाजार भांडवलात एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर आयटीसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, टाटा मोटर्स आणि टीसीएस यांच्या बाजार भांडवलात प्रत्येकी सुमारे ५१,००० कोटी रुपये ते ८२,००० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

हेही वाचाः FD vs PPF : FD अन् PPF मधील गुंतवणुकीसाठी कोणती योजना बेस्ट? विचारपूर्वक निर्णय घ्या

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investor enthusiasm soared bse combined market capitalization surpasses record 292 lakh crores vrd