लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: सूक्ष्म, लघू व मध्यम अर्थात एसएमई कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. फोनबूक, डेलाप्लेक्स, डॉकमोड हेल्थ टेक्नॉलॉजीसह ब्रिस्क टेक्नोव्हिजन या कंपन्या ‘एनएसई इमर्ज’ तसेच ‘बीएसई एसएमई’ या विशेषरचित बाजारमंचावर समभागांना सूचिबद्ध करण्यासाठी गुंतवणूकदारांना आजमावत आहेत. ब्रिस्क टेक्नोव्हिजन या कंपनीच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी ३१ पट अधिक प्रतिसाद नोंदवला आहे.
फोनबॉक्स रिटेलच्या (फोनबूक) Fonebook ‘आयपीओ’साठी पहिल्या दिवशी आठ पट अधिक प्रतिसाद मिळविला. यात किरकोळ गुंतवणूकदारांनी ३३ पट अधिक मागणी नोंदवली. ६६ ते ७० रुपये किंमत पट्टा निश्चित केलेल्या या भागविक्रीतून २०.३७ कोटींचा निधी उभारला जाणार असून ‘आयपीओ’साठी येत्या ३० जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
हेही वाचा >>>शेअर बाजारात पुन्हा भूकंप; सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला, अवघ्या ३ तासांत गुंतवणूकदारांचे १.७७ लाख कोटींचे नुकसान
डेलाप्लेक्सच्या DelaPlex समभाग विक्रीने गुरुवारी पहिल्या दिवशी ८.५ पटीने अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविला. हा विक्रीत देखील गुंतवणूकदारांना ३० जानेवारीपर्यंत त्यात सहभागी होता येणार आहे. डॉकमोड हेल्थ टेक्नॉलॉजीजच्या Docmode Health Technologies समभागांठी किरकोळ गुंतवणूकदारांनी २.९४ पटीने अधिक मागणी नोंदवली.
दरम्यान, ब्रिस्क टेक्नोव्हिजन Brisk Technovision ‘आयपीओ’ला अखेरच्या दिवशी एकंदर ३१ पट अधिक प्रतिसाद लाभला. २३ जानेवारीला खुल्या झालेल्या या ‘आयपीओ’साठी १५६ रुपये प्रति समभाग किंमत निश्चित करण्यात आली होती. यातून कंपनीने १२.४८ कोटींचा निधी उभारणीचे लक्ष्य राखले होते.
नोव्हा ॲग्रीटेकसाठी १०९ पटीने भरणा
भांडवली बाजारात एकीकडे पडझड सुरू असली प्राथमिक बाजारात ‘आयपीओ’साठी गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. कृषी क्षेत्राशी निगडित सामग्रीची निर्माता असलेल्या नोव्हा ॲग्रीटेकच्या प्रारंभिक समभाग विक्रीला गुरुवारी अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांनी १०९ पटीने अधिक अर्ज भरणा करीत दमदार प्रतिसाद दिला. कंपनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून २.४५ कोटी समभागांची विक्री करणार आहे. मात्र अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांकडून २७७.९४ कोटी समभागांची मागणी करणारे अर्ज दाखल झाले.
हेही वाचा >>>सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटींचे नुकसान; ‘या’ ५ कारणांमुळे बाजार घसरला
मेगाथर्म इंडक्शनची भागविक्री सोमवारपासून
मेगाथर्म इंडक्शनची भागविक्री येत्या सोमवार २९ जानेवारीपासून खुली होणार असून, ३१ जानेवारीपर्यंत ‘आयपीओ’साठी अर्ज करता येईल. कंपनीने यासाठी १०० ते १०८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी असलेला हा ‘आयपीओ’ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १२०० समभाग आणि त्यानंतर १२०० समभागांच्या पटीत ‘आयपीओ’साठी अर्ज करता येईल. मेगाथर्म इंडक्शन लिमिटेड ही कंपनी इंडक्शन मेल्टिंग फर्नेस आणि इतर इंडक्शन हीटिंग उपकरणे तयार करते. हेम सिक्युरिटीज या भागविक्री प्रक्रियेची प्रधान व्यवस्थापक आहे. रेल्वे, स्टील, वाहनपूरक उद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगांतील नामांकित कंपन्यांसह, ऑर्डिनन्स फॅक्टरी, बीएचईएल, महिंद्र, टाटा मोटर्स आणि हिंडाल्को या कंपनीच्या सेवा-उत्पादनांची मुख्य ग्राहक आहे.