परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला गुंतवणूक ओघ आणि देशांतर्गत पातळीवरील सकारात्मक घडामोडींमुळे सरलेल्या पाच सत्रात निर्देशांकांची घोडदौड कायम आहे. पाच सत्रातील तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत ७.९० लाख कोटींची भर घातली आहे. सलग पाचव्या सत्रात उच्चांकी झेप कायम राखत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारच्या सत्रात २७४ अंशांनी वधारून ६५,४७९.०५ या विक्रमी ऐतिहासिक पातळीवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने ४६७.९२ अंशांची भर घालत ६५,६७२.९३ या उच्चांकी शिखराला स्पर्श केला.
परिणामी सरलेल्या पाच सत्रात सेन्सेक्सने २,५०० अंशांची कमाई केली आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल २९८.५७ या सर्वोच्च उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १९,३०० अंशांची पातळी ओलांडत १९,३८९ या सर्वोच्च पातळीवर स्थिरावला.
हेही वाचाः अनिल अंबानींपाठोपाठ आता टीना अंबानींचीही ईडीकडून चौकशी
बाजारातील आशावाद कायम आहे. मात्र निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सर्वोच्च पातळीपासून घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये घसरण झाली. मात्र परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली समभाग खरेदी आणि अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक घडामोडींमुळे तेजीवाल्यांचा जोर कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा समभाग सर्वाधिक तेजीत होता. त्याने ७.१७ टक्क्यांची वाढ नोंदवली, त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह टेक महिंद्र, सन फार्मा, एनटीपीसी, टायटन, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस, स्टेट बँक आणि आयटीसी या कंपन्यांचे समभाग वधारले. तर भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात घसरण झाली.
परदेशी गुंतवणूकदार सक्रिय
मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात २,१३४.३३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली. तर सरलेल्या जून महिन्यात एफआयआयने ४७,१४८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली, हा गेल्या दहा महिन्यातील उच्चांक आहे.
सेन्सेक्स ६५,४७९.०५ + २७४ +०.४२
निफ्टी १९,३८९ +६६.४५ +०.३४
डॉलर ८२.०२ +११
तेल ७५.७२ +१.४३