लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक भूमिकेत ‘तटस्थते’कडे वळण घेऊन, व्याजदर कपातीच्या शक्यतेचा मार्ग खुला केला. याचा परिणाम म्हणून गेल्या दोन आठवड्यांत अनुक्रमे ५.२ टक्के आणि ४.९ टक्क्यांनी घसरलेल्या वित्तीय क्षेत्र आणि बँकांच्या समभागांकडे गुंतवणूकदारांचा होरा वळला आहे.
माहिती-तंत्रज्ञान आणि बँकांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदीने भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात सोमवारी तेजी परतली. जागतिक भांडवली बाजारातील मजबूत कल गुंतवणूकदारांसाठी खरेदीपूरक ठरला. परिणामी सेन्सेक्स जवळपास सहा शतकांनी झेपावला, तर निफ्टी निर्देशांकाने २५ हजारांपुढील पातळी पुन्हा कमावली.
हेही वाचा >>>तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? हे बाकीचे पैसे जातात कुठे?
भारतीय बाजारात आशावादी कल कायम असून, विशेषतः कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीबाबत गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या घसरत्या किमतीही दिलासादायी ठरल्या आहेत. अलीकडील घसरणीनंतर आकर्षक भाव पातळीवर असलेल्या निवडक माहिती-तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांच्या खरेदीत गुंतवणूकदार विशेषकरून रस दाखवत आहेत, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदवले.
निफ्टी निर्देशांकात वजनदार स्थान असलेल्या एचडीएफसी बँकेने सोमवारच्या सत्रात २.३ टक्क्यांनी झेप घेतली आणि निर्देशांकातील सर्वाधिक वाढ करणारा तो समभाग ठरला. खासगी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेची सप्टेंबर तिमाहीतील कामगिरी या आठवड्यात जाहीर होणार आहे, ते चांगले येतील अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.