Stock Market Updates: भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नकारात्मक कामगिरी करत आहे. यामध्ये आता आणखी भर पडली असून, गेल्या सहा ट्रेडिंग सेशन्समध्ये गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात सुमारे २४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामागे परदेशी निधी बाहेर पडणे आणि जागतिक व्यापाराच्या चिंता ही प्रमुख कारणे आहेत. याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मूल्यांकनाच्या चिंता नकारात्मक वातावरणात भर घालत आहेत. दरम्यान, विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, बाजार सध्या ओव्हर सोल्ड झोनमध्ये असून, येत्या काही काळात बाजार पुन्हा सावरताना दिसेल.
आज, दिवसाच्या सुरुवातीला, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर दोन्ही प्रमुख निर्देशांक सावरले असून, सध्या सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत.
लार्जकॅप शेअर्सकडे वळण्याची संधी
दरम्यान, शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणात जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी गुंतवणूकदारांनी त्यांचे लक्ष लार्ज-कॅप शेअर्सकडे वळवावे असे म्हटले आहे. ते म्हणाले, “बाजारातील सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांना मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सपासून, लार्जकॅप शेअर्सकडे वळण्याची संधी प्राप्त झाली आहे. दरम्यान बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता असली तरी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सतत होणारी विक्री याला मर्यादा घालू शकते.” याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा प्रचंड दबाव
रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, “निफ्टी २३,२०० च्या पातळीच्या खाली घसरल्यामुळे मजबूत बाउन्स-बॅकच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे २२,८०० ची पातळी पुन्हा रिटेस्ट होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी चिंता म्हणजे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे ट्रेडर्सनी सावध होत रिस्त मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करावे.” असेही मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटले आहे.
नकारात्मक सुरुवातीनंतर बाजार सावरला
भारतीय शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशीही घसरण सुरूच असल्याचे पाहायला मिळाले होते. बुधवारी बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक उघडले. सकाळी १०:३० वाजेपर्यंत सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला होता, तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,००० अंकांच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर बाजारात जबरदस्त तेजी आली असून, सध्या दोन्ही निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत.
दरम्यान गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स २,२९०.२१ अंकांनी किंवा २.९१ टक्क्यांनी, तर निफ्टी ६६७.४५ अंकांनी किंवा २.८१ टक्क्यांनी घसरला आहे.