बाजारातील अदृश्य खेळाडू म्हणजेच संवेदनशील निर्देशांक, ज्याचे कूळ आणि मूळ आपण मागील आठवड्यात जाणून घेतले. आता हा निर्देशांक स्वत:ही नाचतो आणि त्याच्या तालावर इतरांनाही कसे नाचवतो ते पाहूया.
निर्देशांकाच्या आकडेवारीचे मूल्यमापन करताना, शुक्रवार १९ मे या दिवशीची आकडेवारी विचारात घेतली गेली आहे. या दिवशी (बीएसई) बाजार मूल्यांकन २७६.६ लाख कोटी रुपये होते. तर त्याच वेळी, त्याच्या संवेदनशील निर्देशांकाचे बाजार मूल्यांकन या दिवशी १२१.२ लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ हे प्रमाण फक्त ४३.८ टक्के आहे. म्हणून निर्देशांक बाजाराचे प्रतिनिधित्व करत नाही, असे म्हणावेसे वाटते. १९ एप्रिल २०२३ ला निर्देशांकाची वार्षिक वाढ फक्त ३ टक्के होती, तर १८ मे २०२३ ला वार्षिक वाढ १६ टक्क्यांवर गेली, असे का होते? याचा विचार करताना निर्देशांकाच्या संघात एकूण ३० खेळाडू आहेत, हे लक्षात घ्या. यातील काही खेळाडूंची कामगिरी या दिवशी खूप चांगली होती, काही खेळाडूंची समाधानकारक होती, तर काही खेळाडूंची कामगिरी अत्यंत रद्दी होती. निवड समितीची चुकीची निवड, कप्तान योग्य की अयोग्य यावर क्रिकेट संघाचे यश – अपयश अवलंबून असते, तसेच निर्देशांकाचे यश – अपयश त्यात सामील ३० शेअर्सवर अवलंबून असते. निवडक काही खेळाडूंची कामगिरी चांगली झाल्याने निर्देशांकाचा खेळ सरस ठरत असतो. सध्या त्यात आयटीसीची वार्षिक वाढ ५२ टक्के, इंडसइंड बँक ४४ टक्के, एसबीआय २९ टक्के, तर साधारण कामगिरी एशियन पेंट्स फक्त १ टक्का ,पॅावरग्रिड २ टक्के. याउलट रद्दी कामगिरी विप्रो उणे १४ टक्के, इन्फोसिस उणे ११ टक्के, टाटा स्टीलमध्ये ६.८ टक्के घसरण, टेक महिंद्र ३.३ टक्के घसरण तर रिलायन्स इंडस्ट्रीजची कामगिरी १.५ टक्का घसरणीची आहे. यामुळे संवेदनशील निर्देशांक योग्य भांडवलवृद्धी दाखवत नाही.
या ठिकाणी निवड समितीचे निर्णय चुकलेले आहेत. जर देशाचे सकल उत्पादन वाढ टक्केवारी अधिक चलनवाढ टक्केवारी या दोहोंची बेरीज करून किमान तेवढी माफक भांडवलवृद्धी निर्देशांकाने दाखवावी अशी माफक अपेक्षा आहे. तेवढी पूर्ण केली गेली नाही तर हे चित्र योग्य नाही म्हणायला हवे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा विचारात घेतला जातो. परंतु निर्देशांकात शेती व्यवसायाला प्रतिनिधित्वच नाही. जर महिंद्राच्या ट्रॅक्टरची विक्री वाढली तर अप्रत्यक्षरीत्या शेतीचा विचार झाला असे म्हणावे लागेल. सध्याच्या निर्देशांकात खत उत्पादन करणारी एकही कंपनी नाही. आयटीसी हा अपवाद वगळता हाॅटेल व्यवसायाला प्रतिनिधित्व नाही. निर्यातवाढ जहाज उद्योग दाखवितो. एके काळी जीई शिपिंग या शेअरचा निर्देशांकात समावेश होता पण आता नाही. पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्र म्हणून निर्देशांकात फक्त लार्सन ॲण्ड टुब्रो आहे. सिमेंट उत्पादन करणारा शेअरही खूप उशिराने सामावला गेला. (अल्ट्राटेकचा समावेश निफ्टी निर्देशांकात होता, परंतु मुबंई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात नव्हता, तो उशिराने झाला.) एकुणात, संवेदनशील निर्देशांक म्हणायचे पण गुंतवणूकदारांच्या संवेदना निवड समितीला केव्हा समजतील? काही नवीन क्षेत्रांचा समावेश करायचा असेल तर काही खेळाडूंची हकालपट्टी करावी लागेल. बजाज फायनान्स, एचसीएल टेक्नॅालॅाजी, इंडसइंड बॅंक, नेस्ले, पॅावर ग्रिड, टेक महिंद्र, टायटन या खेळाडूंऐवजी नवीन खेळाडू यावेत. विमा व्यवसाय निफ्टी निर्देशांकात आहे, पण मुंबई संवेदनशील निर्देशांकात तो अप्रत्यक्षरीत्या बजाज फिनसर्व्ह म्हणून आहे.
माॅर्गन स्टॅन्लेमुळे, १ सप्टेंबर २००३ पासून ‘उपलब्ध बाजार मूल्यांकन’ ही संकल्पना आपल्याकडे अस्तित्वात आली. पण आपल्याकडे अजूनसुद्धा उपलब्ध मूल्यांकन योग्य नाही. सुरुवात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपासून व्हायला हवी. परंतु एका वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी या संकल्पनेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला नि त्यामुळे बाजार खाली आला. त्यानंतर सेबीच्या एका माजी अध्यक्षांनी या संकल्पनेचा पाठपुरावा केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही आणि नंतर ते निवृत्तही झाले. वॉरेन बफे अमेरिकेत ॲक्सिडेंटल पेट्रेलियमच्या महिला अध्यक्षांना अगदी सहजपणे तुमच्या कंपनीचे १० टक्के शेअर्स आम्ही खरेदी केले हे सांगतो हा खरा उपलब्ध बाजार मूल्यांकनाचा अर्थ.
हेही वाचा – माझा पोर्टफोलिओ : ‘एमडीएफ’च्या उभरत्या बाजारपेठेसाठी दावेदारी
सर्वात शेवटी एक वेगळीच आकडेवारी मांडून हा विषय थांबवणे इष्ट ठरेल. निर्देशांकाच्या एकूण ३० शेअर्सपैकी १ रुपया दर्शनी किंमत असलेले १० शेअर्स आहेत, २ रुपये दर्शनी किंमत ८ शेअर्स, तर ५ रुपये किंमत असलेले ६ शेअर्स आणि १० रुपये दर्शनी किंमत असलेले ६ शेअर्स असे एकूण ३० शेअर्स आहेत. सरकारने फतवा काढून सर्व कंपन्यांचे दर्शनी किमतीचे मूल्य १ रुपया करावे. त्यामुळे या बाजारात शेअर्स विभाजन हा प्रकार एकदाचा संपुष्टात येईल आणि बाजाराचे मूल्यांकन आणखी वाढेल.
pramodpuranik5@gmail.com