प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारातल्या माणसांना नाचवणारा एक अदृश्य खेळाडू बाजारात असतो तो म्हणजे मुंबई बाजाराचा संवेदनशील निर्देशांक. बाजाराला त्याच्या तालावर नाचविणाऱ्या या निर्देशांकाचे कूळ व मूळ जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे.

मुंबई शेअर बाजार सुरू झाला ९ जुलै १८७५ ला, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी; परंतु त्या बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाची सुरुवात त्यानंतर खूप उशिराने झाली. १९७८-७९ हे आधारभूत वर्ष विचारात घेऊन तेव्हाचे बाजार मूल्यांकन १०० असे मानून निर्देशांक प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. हा निर्देशांक नव्हता त्या वेळेस काय होते या प्रश्नाला एमबीए फायनान्सच्या विद्यार्थांकडूनदेखील उत्तर मिळत नाही. वेगवेगळ्या शेअर बाजारात त्या त्या शेअर बाजाराचे नेतृत्व करणारे काही शेअर्स होते. मुंबई शेअर बाजाराचे नेतृत्व वर्षानुवर्षे सुरुवातीला टाटा डिफर्डकडे होते. त्यानंतर टाटा ऑर्डिनरी, मग पुढे सेन्च्युरी असे प्रत्येक वेळेस नेतृत्व करणारे शेअर्स बदलत गेले. कलकत्त्याच्या शेअर बाजारात फक्त मोटर शब्द उच्चारला की, तो सटोडिया हिंदुस्तान मोटर या कंपनीबद्दल बोलतोय हे लक्षात यायचे.

त्या वेळचे, म्हणजे १९८५ साली भारतीय युनिट ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले एम. जे. फेरवानी यांनी भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक संस्थाच्या गुंतवणुका आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या वेळेच्या डीएसपी मेरिल लिंच यांच्या सहकार्याने इंडिया इक्विटी फंड आणण्यात आला. परदेशी गुंतवणूकदारांना भारताच्या शेअर बाजाराची माहिती देण्यासाठी तसेच पैसे कमावण्यासाठी या ठिकाणी भरपूर संधी आहेत हे स्पष्ट करण्यासाठी बाजार मूल्यांकन आणि बाजार मूल्यांकनाचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाशी असलेले गुणोत्तर यावर भर देण्यात आला. त्या वेळेस परदेशी गुंतवणूकदारांनी प्रश्न विचारला की, जर आमच्याकडे बाजाराचे मोजमाप करण्यासाठी डाऊ जोन्स ३० हा निर्देशांक आहे, तर मग तुमच्याकडे असा निर्देशांक का नाही आणि त्यानंतर मग अशा प्रकारचा निर्देशांक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. नंतर मग बीएसई ३० हा निर्देशांक अस्तित्वात आला. त्या वेळच्या निर्देशांकातील ३० शेअर्सपैकी सध्या फक्त ७ शेअर्सना या निर्देशांकातील आपले स्थान सांभाळता आले आहे. ते शेअर्स म्हणजे – १) युनिलिव्हर २) आयटीसी ३) रिलायन्स ४) टाटा मोटर ५) टाटा स्टील ६) लार्सन ॲण्ड टुब्रो ७) महिंद्रा. यात पुन्हा काही शेअर्स अल्पकाळासाठी बाहेर गेले होते. उदाहरण म्हणजे, २००४ ला लार्सन चार महिने बाहेर होता; परंतु तरीसुद्धा या शेअर्सचे महत्त्व कमी होत नाही .

बाजार मूल्यांकन आणि या मूल्यांकनाचे देशाच्या सकल उत्पादनाशी असले गुणोत्तर विचारात घेतले तर आजसुद्धा मागील पाच वर्षांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे
आर्थिक वर्ष प्रमाण
३१ मार्च २०१९ ८०%
३१ मार्च २०२० ५७%
३१ मार्च २०२१ १०३%
३१ मार्च २०२२ ११२%
३१ मार्च २०२३ ९५%

बाजारात आधीही निर्देशांक होते, त्याचीही माहिती असायला हवी-

१) आरबीआय इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटीज प्राइसेस

१९४९ पासून रिझर्व्ह बँक हा निर्देशांक मापून प्रकाशित करते

२) फायनान्शियल एक्स्प्रेस सीरिज इंडेक्स नंबर

वर्ष १९५९ हे आधारभूत वर्ष आणि या वर्षाचा निर्देशांक १०० याप्रमाणे वेगवेगळ्या शेअर बाजारातले ५२ शेअर विचारात घेऊन हा निर्देशांक काढला जात होता. त्यात नंतर अहमदाबाद, दिल्ली या शेअर बाजारातले काही शेअर्स विचारात घेऊन १५७ शेअर्सचा हा निर्देशांक होता. या निर्देशांकात वेळोवेळी आधारभूत वर्ष बदलले गेले. अशाच प्रकारे ‘इकाॅनाॅमिक टाइम्स’ हे वर्तमानपत्रसुद्धा निर्देशांक प्रसिद्ध करायचे; परंतु या काळात कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे हे सर्व निर्देशांक फारसे लोकप्रिय नव्हते. १९७३ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘फेरा’ कायदा आणला, परदेशी कंपन्यांचे शेअर्स बाजारात नोंदणीसाठी आले. त्यामुळे भागधारकांची संख्या देशात वाढली आणि म्हणून १९८५ ला बीएसईचे बाजार मूल्यांकन फक्त २५ हजार कोटी रुपये होते ते आता २६० लाख कोटी रुपये झाले आहे.

निर्देशांकात १९८६ सालात प्रारंभाला सामील ३० शेअरची यादी-

१) एसीसी २) बल्लारपूर इंडस्ट्रीज ३) भारत फोर्ज ४) बॉम्बे डाइंग ५) सिएट ६) सेंच्युरी टेक्स्टाइल ७) ग्रासिम ८) ग्रेट ईस्टर्न शिपिंग ९) ग्लॅक्सो १०) गुजरात स्टेट फर्टिलायझर ११) हिंदुस्तान ॲल्युमिनियम १२) हिंदुस्तान लिव्हर १३) हिंदुस्तान मोटर्स १४) इंडियन हाॅटेल्स १५) इंडियन ऑरगॅनिक्स १६) इंडियन रेयॅान १७) आयटीसी १८) किर्लोस्कर कमिन्स १९) लार्सन ॲण्ड टुब्रो २०) महिंद्रा ॲण्ड महिंद्रा २१) मुकुंद आर्यन २२) नेस्ले २३) फिलिप्स २४) प्रीमियर ऑटो २५) रिलायन्स इंडस्ट्रीज २६) सिमेन्स २७) टाटा मोटर्स २८) टाटा पॅावर २९) टाटा स्टील ३०) व्होल्टास

बाजारातील हा अदृश्य खेळाडू स्वत:ही नाचतो आणि इतरांनाही नाचवतो.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invisible players in the market sensitive indices print eco news mrj
Show comments