IREDA Listing: ज्या गुंतवणूकदारांनी IREDA च्या IPO मध्ये पैसे गुंतवले, त्यांना मोठा नफा मिळाला आहे. IREDA चे शेअर्स ३२ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ५० रुपयांवर सूचीबद्ध आहेत आणि ते थेट ५६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह सूचिबद्ध झाले आहेत. NSE वर सूचिबद्ध झाल्यापासून IREDA समभागांनी लिस्टिंग नफा दिला आहे.
सूचिबद्ध झाल्यापासून प्रत्येक शेअरवर प्रचंड नफा मिळाला
IREDA च्या IPO मध्ये शेअरची किंमत ३२ रुपये होती आणि लिस्टिंग ५० रुपये झाली. याचा सरळ अर्थ असा आहे की, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८ रुपये तत्काळ उत्पन्न मिळाले आणि यामुळे गुंतवणूकदारांना आनंद झाला. IREDA NSE आणि BSE दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर ५० रुपयांवर सूचीबद्ध आहे.
हेही वाचाः अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
विशेष म्हणजे IREDA ची भागविक्री २३ नोव्हेंबरला बंद झाली होती. गुरुवारी दिवसअखेर किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये सुमारे ७.७२ पट भरणा झाला होता. याचबरोबर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गवारींमध्ये अनुक्रमे २४.१६ पट आणि १०४.५७ पटीने अधिक भरणा झाला होता. आयआरईडीए ही अक्षय्य ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली भारत सरकारची पूर्ण मालकीची कंपनी आहे. ताज्या इश्यूमधून मिळालेली रक्कम कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पुढील कर्ज देण्यासाठी त्याचा भांडवली आधार वाढवण्यासाठी वापरला जाणार आहे.
आयआरईडीए ही भारतातील सर्वात मोठी हरित वित्तपुरवठा करणारी बँकेतर वित्तीय कंपनी आहे. २३ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेला ४७,२०६.६६ कोटी रुपयांचा विविध गुंतवणूक पोर्टफोलिओ आहे. आयआरईडीएची फंड-आधारित उत्पादने असून ती दीर्घ-मुदतीची, मध्यम-मुदतीची आणि अल्प-मुदतीची कर्जे, टॉप-अप कर्जे, ब्रिज लोन, टेकओव्हर फायनान्सिंग, भविष्यातील कॅशफ्लोसाठी सुरक्षित कर्जे देते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तिचा महसूल २१.७५ टक्क्यांनी वाढून ३,४८१.९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एका वर्षापूर्वी२,८५९.९० कोटी होता.