मुंबई: ग्राहकोपयोगी बहुविध व्यवसायांत कार्यरत समूह आयटीसी लिमिटेडमधून हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणांतून, स्वतंत्र कंपनीत रूपांतरित झालेल्या आयटीसी हॉटेल्स लिमिटेडचे समभाग येत्या २९ जानेवारीला शेअर बाजारात सूचीबद्ध होतील.

आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीतील विलगीकरण हे १ जानेवारी २०२५ पासून लागू झाले. नवीन कंपनीचे समभाग मिळविण्यासाठी पात्रता म्हणून ६ जानेवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच या तारखेला किंवा त्याआधीपासून आयटीसीचे भागधारक म्हणून पुस्तकी नोंद असलेल्यांना नवीन कंपनीचे समभाग मिळविता आले. आयटीसीच्या भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १० समभागांमागे आयटीसी हॉटेल्सचा एक समभाग दिला गेला आहे. असे १२५.११ कोटी समभाग पात्र भागधारकांची डिमॅट खात्यांत जमाही केले गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सोमवारच्या परिपत्रकानुसार, आयटीसी हॉटेल्सचे समभाग हे २९ जानेवारी २०२५ ला सूचीबद्ध केले जातील आणि त्या समभागांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास त्या दिवसापासून परवानगी दिली जाईल. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) या समभागांना अशी मुभा दिली आहे.

सरलेल्या ६ जानेवारी रोजी, बीएसई आणि एनएसई अशा दोन्ही शेअर बाजारांत सकाळी ठरावीक कालावधीसाठी आयटीसी हॉटेल्सच्या समभागासाठी किंमत निर्धारणासाठी विशेष सत्र सोमवारी योजण्यात आले होतो. दोन्ही बाजारात अनुक्रमे २६ रुपये आणि २७ रुपये असे त्याचे प्रारंभिक मूल्य निर्धारीत केले गेले होते. प्रत्यक्षात लिस्टिंगनंतर या शेअर्सचे अधिमूल्य खूप अधिक असण्याची आणि तीन अंकी संख्या ते सहज पार करेल, असा अनेक दलाली पेढ्यांचा होरा आहे.  

विलगीकरण योजनेनुसार, आयटीसीच्या भागधारकांची आयटीसी हॉटेल्समध्ये १०० टक्के, म्हणजे सुमारे ६० टक्के थेट आणि आयटीसीमधील त्यांच्या भागधारणेद्वारे सुमारे ४० टक्के मालकी राहिल. आयटीसी समूहाकडून विविध सहा नाममुद्रांखाली देशभरात १३ हजारांहून अधिक खोल्या असलेल्या १४० हॉटेल मालमत्ता सध्या चालविल्या जात आहेत. या सर्व मालमत्ता नवीन आयटीसी हॉटेल्स या कंपनीच्या आधिपत्याखाली येतील. पुढील ४ ते ५ वर्षांत खोल्यांची संख्या १८ हजारांवर आणि एकूण हॉटेल मालमत्ता २०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे.



मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itc hotels limited shares listed on the stock exchange print eco news amy