डॉ. आशीष थत्ते
भारत वर्ष १९५० मध्ये जेव्हा प्रजासत्ताक झाला, तेव्हाचा पहिला अर्थसंकल्प स्मरणीय होता. दोनशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीनंतर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कठीण काळानंतर देशाने फाळणी आणि युद्धाचे घाव सोसून या ऐतिहासिक अर्थसंकल्पानंतरच आर्थिक सुधारणांना गती दिली.
स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री असणाऱ्या जॉन मथाई यांनी सर चेट्टी यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्रालयाची सूत्रे आपल्या हाती घेतली. पंचवार्षिक नियोजनाचा पाया रचणारा भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प, पहिल्या लोकनियुक्त सरकारचे अर्थमंत्री जॉन मथाई यांनी २८ फेब्रुवारी १९५० रोजी सादर केला. मद्रास विद्यापीठातून पदवी घेऊन आणि तिथेच प्राध्यापक म्हणून काम केलेल्या जॉन मथाई यांचा अर्थशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. पुढे जाऊन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ऑक्सफर्ड सारख्या प्रतिथयश विद्यापीठांमधूनही शिक्षण घेतले. भारताचे रेल्वे आणि अर्थमंत्री होण्याच्या व्यतिरिक्त जॉन मथाई यांनी टाटा समूहातील कंपन्यांमध्ये संचालक म्हणून देखील काम बघितले. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान मथाई यांनाच जातो. त्यावेळच्या केरळ, बॉम्बे आणि मद्रास विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया?
योजना आयोग यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांनी राजीनामा दिला असे नमूद केले जाते. खरेतर योजना आयोगाच्या निर्मितीची संकल्पना त्यांच्या अर्थसंकल्पातून पुढे आली होती. मात्र तरीही त्याचा वाढता प्रभाव मथाई यांना अस्वस्थ करत होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मथाई यांचा राजीनामा दोनदा फेटाळून लावला.
मथाई यांनी आपल्या जीवनाचा सगळ्यात कंटाळवाणा भाग म्हणजे केंद्रीय मंत्री असणे असे म्हटले होते. कारण कामाच्या धबडग्यात सामान्य वाचन करायला देखील वेळ मिळत नव्हता. त्यात रेल्वेमंत्री असताना विरोधकांकडून त्यांना विशेष लक्ष्य केले जायचे. कारण दिल्ली ते मद्रास धावणारी ग्रँड ट्रंक एक्सप्रेस ही त्यासाठी विशेष कारणीभूत होती. प्रेमभंग झालेला तरुण रेल्वे ट्रॅकवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेसची वाट बघत शेवटी भुकेने प्राण सोडायचा असे विरोधक त्यांना म्हणायचे. तरुणपणी टाटा समूहाची शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे मथाई यांना लंडनला शिकायला जायची संधी मिळाली नाही. नंतर खूप वर्षांनी टाटा समूहाचे संचालक झाल्यानंतर जेआरडी टाटा त्यांना गमतीने म्हणत की, तुम्ही तयार असाल तर अजूनही शिष्यवृत्तीसाठी तुमची शिफारस करू. त्यांच्या पहिल्या जिंकलेल्या केसची कहाणी देखील रंजक होती. वरिष्ठ वकिलांनी आधीच पैसे घेतल्यामुळे त्यांना काहीच मिळाले नाही, नंतर जेव्हा आरोपी त्यांना येऊन भेटले तेव्हा त्यांनी कामाचा मोबदला म्हणून त्यांना चक्क केळ्याचा घड भेट म्हणून दिला. २ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचे निधन झाले. इतर अनेक पदव्या आणि पुरस्कारांच्या व्यतिरिक्त त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मविभूषण देऊन गौरवले होते.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत /
ashishpthatte@gmail.com
@AshishThatte