लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : पर्यटनाशी संबंधित सेवा देणारे संकेतस्थळ असणाऱ्या ‘इक्सिगो’ची प्रवर्तक असलेल्या ‘ली ट्रॅव्हन्यूज टेक्नॉलॉजी’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या १० जूनपासून सुरू होत आहे. पुढील तीन दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. यासाठी कंपनीने ८८ रुपये ते ९३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ७४० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. आयपीओ-पूर्व सुकाणू गुंतवणूकदार ७ जूनला कंपनीच्या समभागांसाठी बोली लावू शकणार आहेत.
विद्यमान भागधारक आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (ओएफएस) ६.६६ कोटी समभागांची विक्री करणार आहेत. ज्या माध्यमातून त्यांना ६२० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. तर १२० कोटी मूल्याच्या नवीन समभागांची विक्री कंपनीकडून करण्यात येईल. ‘ओएफएस’च्या माध्यमातून सैफ पार्टनर्स इंडिया लिमिटेड, पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट, मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, प्लॅसिड होल्डिंग्स, कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप, मॅडिसन इंडिया कॅपिटल एचसी, आलोक बाजपेयी आणि रजनीश कुमार समभाग विक्री करणार आहेत.
हेही वाचा >>>अदानी समूहाला पडझडीत ४.०७ लाख कोटींची झळ
नवीन समभाग विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपैकी ४५ कोटी रुपयांची रक्कम कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी वापरली जाईल आणि २६ कोटी रुपये तंत्रज्ञान तसेच डेटा सायन्स, क्लाउड आणि सर्व्हर होस्टिंग, कृत्रिम प्रज्ञेवरील (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या सहभागासाठी गुंतवणूक करण्यासाठी वापरले जातील. आयपीओच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या समभागांपैकी ७५ टक्के समभाग हे पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी तर १५ टक्के समभाग गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. गुंतवणूकदार किमान १६१ समभागांसाठी आणि तिच्या पटीत आयपीओसाठी बोली लावू शकतील.
आलोक बाजपेयी आणि रजनीश कुमार यांनी २००७ मध्ये या कंपनीची उभारणी केली होती. ली ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी हे देशातील आघाडीचे ऑनलाइन ‘ट्रॅव्हल ॲग्रीगेटर’ आहे. कंपनी प्रवाशांना त्यांच्या रेल्वे, हवाई, बस प्रवास आणि हॉटेल्स निवासासह, सहलींचे नियोजन, आरक्षण आणि व्यवस्थापनास मदत करते. मार्च २०२३ अखेर आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ५१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आधीच्या आर्थिक वर्षात ३८५ कोटी रुपये होते.