मुंबई: भारतीय चलन अर्थात रुपयाच्या विनिमय मूल्याने सलगपणे आठव्या सत्रात प्रति डॉलर नवीन सार्वकालिक नीचांकाची सोमवारी नोंद केली. शुक्रवारच्या बंद पातळीच्या तुलनेत आणखी चार पैशांच्या घसरणीसह त्याने ८५.८४ असा नवीन तळ गाठला.
एकीकडे जागतिक स्तरावर मजबूत बनत असलेली डॉलर, तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदारांनी देशांत गुंतविलेल्या भांडवलाची तीव्र स्वरूपात सुरू असलेली माघार याचा रुपयाच्या विनिमय मूल्यावर विपरित ताण पडत आहे. ही निरंतर सुरू असलेली घसरण पाहता, आयातदारांकडून डॉलरच्या संचयाचा कल वाढीला लागला असून, त्यातून रुपया आणखीच कमजोर होत चालला आहे. रिझर्व्ह बँकेकडून संभाव्य हस्तक्षेपामुळे रुपयातील मूल्य झड ही मर्यादित राखली गेली. अन्यथा डॉलरमागे ८६ च्या नीचांकापर्यंत रुपया वेगाने गडगडताना दिसला असता, असे चलन बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेत २० जानेवारीला सूत्रे हाती घेतली जातील, तोपर्यंत रुपया डॉलरमागे ८६ ची पातळी राखेल, असा रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न राहिल, असा व्यापाऱ्यांचा होरा आहे. ट्रम्प प्रशासनाच्या आर्थिक धोरणांबाबत जोपर्यंत चित्र सुस्पष्ट होत नाही, तोवर डॉलरच्या मजबुतीचा क्रमही सुरू राहण्याचे कयास आहेत.