मुंबई : गेल्या स्वातंत्र्यदिनापासून विद्यमान आर्थिक वर्षातील १४ ऑगस्टपर्यंत म्हणजेच वर्षभराच्या कालावधीत प्रमुख निर्देशांकांनी २१ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २४ टक्क्यांचा भरीव परतावा दिला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
विद्यमान वर्षात म्हणजेच जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत सेन्सेक्सने केवळ ९.५ टक्के परतावा दिला आहे. तर त्यातुलनेत निफ्टीने ११ टक्क्यांपेक्षा थोडी अधिक वाढ दर्शवली आहे. १५ ऑगस्ट २०२३ आतापर्यंत बँक निफ्टी, सुमारे १३ टक्के वधारला आहे. मात्र विद्यमान कॅलेंडर वर्षात आजपर्यंत केवळ ३.१ टक्के परतावा दिला आहे.
हेही वाचा >>>घाऊक महागाईचा जुलैमध्ये २.०४ टक्क्यांचा तिमाही नीचांक
गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक वर्षभरात दुप्पट
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रिअल्टीने गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्टपासून या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत तब्बल ९४ टक्के असा बहूप्रसवा परतावा देऊन सर्वांना मागे टाकले. याचा अर्थ असा की जर एखाद्याने, १५ ऑगस्ट २०२३ रोजी त्याचे पैसे रिअल्टी निर्देशांकांमध्ये गुंतवले असतील, तर आतापर्यंत पैसे जवळपास दुप्पट झाले असतील. मात्र, निर्देशांकाने विद्यमान कॅलेंडर वर्षात आजपर्यंत ३० टक्के परतावा दिला. या शिवाय, निफ्टी रिअल्टीनंतर, निफ्टी ऑटोने गुंतवणूकदारांना सुमारे ६४ टक्के लाभ दिला.
निफ्टी मीडियाकडून निराशा
विशेष म्हणजे, निफ्टी मीडिया हा एकमेव क्षेत्रीय निर्देशांक होता, ज्याने गेल्या एका वर्षात १४ ऑगस्ट २०२३ पासून गुंतवणूकदारांचे मूल्य ९ टक्क्यांनी कमी केले. विद्यमान वर्षातही १७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
© The Indian Express (P) Ltd