लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडूनही निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी सलग सहाव्या सत्रात तेजीची दौड कायम राखत उच्चांकी पातळीवर झेप घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १४१.३४ अंशांची वाढ नोंदवत ७७,४७८.९३ अंशांच्या सर्वोच्च शिखरावर गुरुवारचे व्यवहार संपविले. दिवसभरात सेन्सेक्स ३०५.५ अंशांनी वाढून ७७,६४३.०९ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५१ अंशांची भर पडली आणि तो २३,५६७ या ताज्या उच्चांकावर स्थिरावला. सत्रात त्याने १०८ अंशांची कमाई करत २३,६२४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
हेही वाचा >>>‘एनव्हिडिया’ जगातील सर्वात मौल्यवान कंपनी; ॲपल, मायक्रोसॉफ्टही पिछाडीवर
गुरुवारच्या सत्रात मोठ्या अस्थिरतेचा सामना करूनदेखील, देशांतर्गत बाजाराने दिवसाचा समारोप सकारात्मक पातळीवर केला. नजीकच्या काळात, आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि मान्सूनच्या प्रगतीवर बाजाराचे लक्ष केंद्रित होणे अपेक्षित आहे. जागतिक आघाडीवर, अमेरिकी रोख्यांच्या परतावा दरातील घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदाराचे पाय पुन्हा भारताकडे वळले आहेत. अलीकडच्या काही सत्रांत मजबूत राहिलेला परदेशी गुंतवणुकीचा ओघ, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने काही धान्यांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्यामुळे त्याचेदेखील सकारात्मक पडसाद बाजारावर दिसून आले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. त्याउलट, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, एनटीपीसी, विप्रो, स्टेट बँक आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी ७,९०८.३६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
रुपयाच्या मूल्याचा विक्रमी नीचांक
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी घसरून गुरुवारी ८३.६२ या विक्रमी नीचांकी पातळीवर स्थिरावला. देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजाराने उच्चांकी शिखर गाठले असले तरी पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे खनिज तेलाच्या वाढत्या किमतीने रुपयाला कमकुवत केले आहे. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८३.४३ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८३.४२ ही उच्चांकी तर ८३.६८ या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १ पैशांनी घसरून ८३.४४ वर स्थिरावला होता, यापूर्वी, विद्यमान २०२४ सालात १६ एप्रिलला डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याने ८३.६१ ही नीचांकी पातळी गाठली होती.
सेन्सेक्स ७७,४७८.९३ १४१.३४ (०.१८%)
निफ्टी २३,५६७ ५१ (०.२२%)
डॉलर ८३.६१ १७
तेल ८५.२१ ०.१६