आधीची अनियमितता कमी होती म्हणून की काय तपासकर्त्यांनी ज्या कारणासाठी बाजारातून गुंतवणूक उभारली त्या कारणालाच सरळ हात घातला. विदा केंद्रे (डेटा सेंटर) उभारणी केल्याची माहिती जी कंपनीने दिली होती, तपासकर्ते चक्क त्या ठिकाणीच जाऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी विजेची बिले तपासली. गोव्यातील केंद्रावर नोव्हेंबरमध्ये अवघे ६ युनिट तर डिसेंबरमध्ये २,४५० युनिट खर्च झाल्याचे दिसले. सावंतवाडी येथे तर दोन्हीही महिने मिळून फक्त १० युनिट खर्च झाले होते. त्या आधी कंपनीने इथे कधी ३१ तर कधी १२५ कर्मचारी काम करत असल्याची माहिती दिली होती. अर्थातच ती दिशाभूल करणारी असल्याचे तपासात आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासकर्त्यांनी कंपनीचे आर्थिक गुन्हे देखील उघडकीस आणले. बीएम ट्रेडर्स या उद्योगाला ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये कंपनीने तब्बल १८ कोटी तर आपल्याच इतर कंपन्यांना ५ कोटींपेक्षा जास्त पैसे पाठवले. कंपनीचे प्रवर्तक साबळे यांनी ११९ कोटी रुपये वर्ष २०२२ ते २०२४ मध्ये बीएम ट्रेडर्सला हस्तांतरित केले. बीएम ट्रेडर्स हे चक्क फळे व भाजीपाला विकणारे घाऊक विक्रेते होते आणि त्यांची मागील वर्षातील उलाढाल फक्त ६७ लाख रुपयांच्या आसपास होती.

हेही वाचा…बाजाराचा तंत्र-कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!

आर्थिक बाबतीत आपण विश्वास ठेवतो ते लेखापरीक्षित ताळेबंदावर. पण इथे तर कुंपणच शेत खात होते. कंपनीच्या विक्रीत ३५ कोटींवरून वाढ होत ती २०२३ मध्ये थेट ३८३ कोटींवर पोहोचली होती आणि त्यामुळे नफासुद्धा ८ कोटींवरून ८२ कोटींवर पोहोचला होता. यातील सगळ्यात जास्तीची विक्री (३२६ कोटी) अँटेलफोन नावाच्या कंपनीला झाली होती. जिच्या संकेतस्थळाची माहिती घेतल्यास फारशी माहिती मिळत नसल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले. नंतर या कंपनीच्या पत्त्याची माहिती घेता असेही उघडकीस आले की, हा पत्ता पनामा पेपर्सच्या कित्येक कंपन्यांशी साधर्म्य साधणारा होता. कंपनीने आपल्या ताळेबंदात ३२६ कोटी रुपयांच्या विक्रीतून २६६ कोटी रुपये मिळाल्याचे दाखवले. मात्र प्रत्यक्षात बँकेच्या खात्यात काहीच आले नव्हते. म्हणजे हे सगळे खरेतर काल्पनिकच होते. असेच काही करेज क्लोथिंग नावाच्या कंपनीबद्दल सुद्धा केले गेले. अजूनही काही कंपन्यांच्या बाबतीत असेच घोटाळे उघडकीस आणले होते. कंपनीच्या वेळोवेळीच्या घोषणा देखील अशाच दिशाभूल करणाऱ्या होत्या हे सिद्ध केले गेले.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो – घराच्या नेटकेपणाची जागतिक नाममुद्रा

त्यातच कंपनीचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे यांनी आपले काही समभाग विकून मालकी हक्क कमी केल्याचे दिसत होते आणि त्यातून नफा कमावला जो सुमारे १२२ कोटी होता. भांडवली बाजार नियामक सेबीने अखेर आपल्या आदेशात हर्षवर्धन साबळे यांना २१ दिवसांची मुदत देऊन आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे आणि ऑडिट फर्म ए के कोच्चर यांच्या कथित सहभागाचीसुद्धा चौकशी करायचे आदेश पारित केले आहेत. अंतिम आदेश येण्यापूर्वी अजून काही दिवस वाट बघावी लागेल असे दिसते. जसपाल भट्टी यांच्या कार्यक्रमासारखीच कार्यपद्धती होती असे दिसते. कुठलेही उत्पादन किंवा सेवा नाही किंवा असल्यास अगदी नगण्य, निर्यातीचे किंवा परदेशी भागीदारीचे खोटे दावे, गुंतवणूकदारांच्या भावनांशी खेळ करून भाव वाढवणे आणि अखेरीस वाढीव भावात आपला हिस्सा विकून नफा कमावणे. म्हणूनच दूरदृष्टी असणारे जसपाल भट्टी झिंदाबाद!