डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या निवडणूक रोखे आणि ‘पीएम केअर फंड’बद्दल समाजमाध्मयमांतून चर्चा होताना दिसते. चर्चेचा रोख अर्थातच सरकारच्या कथित आर्थिक घोटाळ्यावर असतो. या चर्चेचा परिपाक काहीही असो किंवा ४ जूनला कुणीही जिंको आर्थिक घोटाळ्यामुळे सरकार पडले असे जगात फार कमी वेळेला झाले असावे. कधी कधी भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा यामध्ये फरक करणे कठीण होते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बरीच सरकारे पडतात पण आर्थिक घोटाळ्यामुळे सरकार पडले असे घडले ते मागील दशकात दक्षिणपूर्व आशिया खंडात आणि देशाचे नाव होते मलेशिया. तसा हा देश आपल्याला ओळखीचा आहे. कारण पर्यटनासाठी उत्तम देश आहे आणि माझासुद्धा अगदी आवडीचा देश. या देशाने अल्पावधीत केलेली प्रगती थक्क करणारी आहे. वर्ष २००९ मध्ये आलेल्या नजीब रझाक सरकारने एक स्वतंत्र निधी बनवण्याची घोषणा केली. हा निधी देशाच्या वाढत्या गरजांना पूर्ण करणारा असेल असे सांगितले गेले. नजीब यांनी सरकारची हमी देऊन मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. त्याचे नाव त्यांनी १ एमडीबी म्हणजे ‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ असे ठेवले. सरकारची हमी असल्यामुळे त्यातील गुंतवणूकदार मोठे होते आणि त्यांच्याकडून मोठा निधी घेण्यात आला. त्यात आखातातील राजे आणि त्यांचे कुटुंबीय गुंतवणूक करतील अशीसुद्धा सोय करण्यात आली. यात अजून दोन माणसांचा महत्त्वाचा सहभाग होता, तो म्हणजेच नजीब यांचा सावत्र मुलगा रिझा अझीझ आणि त्याचा मित्र जो लो जो या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता.

फंडाची स्थापना झाल्यापासून जो लो त्याचा मुख्य सल्लागार होता. पैसे गोळा करणे आणि त्याचा विनिमय करणे हे त्याचे काम होते. मलेशियाच्या पंतप्रधानांचा तो अगदी खास होता. कारण त्यांची पत्नी रॉसमा मन्सूर हिला अत्यंत महागड्या भेटवस्तू तो नेहमीच पोहोचवायचा. फंड सुरू झाल्यानंतर त्यातील काही पैसे गुंतवायचे म्हणून त्याने सुमारे ७० कोटी डॉलर स्वत:च्या खात्यावर वळवले अर्थातच शेल कंपन्यांच्या मार्फत आणि तो अचानक श्रीमंत झाला. मग काय श्रीमंत मनोरंजनावर पैसे खर्च करणे हे त्याचे रोजचेच काम झाले. त्यात जो लो आणि रिझा अझीझ यांनी चक्क एक हॉलीवूडचा चित्रपट निर्माण करायचे ठरवले. या चित्रपटाचे नाव होते ‘द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ म्हणजे आर्थिक घोटाळ्याचा चित्रपट. याचे विडंबन बघा की, या चित्रपटाचा पैसासुद्धा एका आर्थिक घोटाळ्यातूनच आला होता. या निर्मात्या कंपनीचा मालक रिझा अझीझ होता आणि चित्रपटाचा मुख्य नायक लिओनार्दो डिकॅप्रिओ याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतरच्या भाषणात त्याने जो लोचे आभारसुद्धा मानले. पण खरेतर इथेच काहीतरी शिजल्याचा वास आता लोकांना यायला लागला होता. कारण मलेशियाच्या पंतप्रधान पुत्राकडे एवढा पैसा आला कुठून असा सूर उमटू लागला होता. यात मलेशिया आणि त्याचा विकास राहिला बाजूलाच पण अधिक पैसे कमावण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज असल्याचे भासवण्यात आले आणि आता या घोटाळ्याची व्याप्ती अधिकच खोल होणार होती. अर्थात ते बघू पुढील भागात.           

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysian development ruin scam election bonds pm care fund print eco news amy
Show comments