प्रमोद पुराणिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत मुनोत हे एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर २०२१ सालच्या फेब्रुवारी महिन्यात स्थानापन्न झाले. या अगोदर डिसेंबर २००८ ते फेब्रुवारी २०२१ अशी १२ वर्षे आणि तीन महिने ते एसबीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी होते. आणि त्या अगोदर १ वर्ष २००७ ते २००८ मॅार्गन स्टॅनले या संस्थेचे कार्यकारी संचालक होते.

नवनीत मुनोत यांची बाजाराला ओळख १९९४ साली झाली. फेब्रुवारी १९९४ ते नोव्हेंबर २००७, अशी १३-१४ वर्षे बिर्ला ग्लोबल फायनान्स, बिर्ला सन लाइफ सिक्युरिटीज, बिर्ला सन लाइफ एएमसी या बिर्ला उद्योग समूहामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले. ज्या प्रमाणे विश्लेषक एखाद्या शेअर्सचा पाठपुरावा करत असतो, अगदी त्याप्रमाणे बाजाराला प्रभावित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा माग घेणे खूपच रंजक बाब आहे. त्याच रंजकतेतून मार्च १९९५ ते आजपावेतो या व्यक्ती अर्थात नवनीत मुनोत यांची प्रगतीची एक एक पायरी कशाप्रकारे सर केली याचे आम्ही साक्षीदार आहोत.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो- उत्पादनांत अनोखेपण, ग्राहकवर्गही नामांकित! : युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड

सर्वसाधारणपणे कोणत्याही म्युच्युअल फंडाकडे सर्वोच्च पदावर जाणारी व्यक्ती सुरुवातीला गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करीत असते. परंतु विक्री व विपणन या क्षेत्रात अगदी प्राथमिक अवस्थेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेले असे या क्षेत्रात सध्या कार्यरत असलेले दोनजण आहेत. एक नवनीत मुनोत व दुसरे बाला सुब्रमणियम या ज्येष्ठ-श्रेष्ठांचा यात समावेश होतो. दोघांचा विकास बिर्लामध्येच झाला. त्यांना श्रीयुत बॅाण्ड असे टोपण नाव होते. नवनीत मुनोत यांचा जन्म अजमेरपासून ६० किलोमीटरवर असलेल्या राजस्थानमधल्या बिजवर या गावी झाला. एम. कॅाम, सीए, सीएफसी, एआयए, एफआरएम् एवढी मोठी पदव्यांचा रांग त्याच्या नावासमोर आहे आणि या सगळ्या परीक्षा ते उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.

सुरुवातीला बिर्ला उद्योग समूहाची होल्डिंग कंपनी बिर्ला ग्रोथ फंड या कंपनीत त्यांनी काम केले. ही कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड नाही. उलट बिर्ला उद्योग समूहाने १९९४-९५ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, त्याची सज्जता या कंपनीतून झाली. तिच्या स्थापनेपासून मुनोत यांचा या क्षेत्राशी संबंध आला. मग सुरुवातीला कॅपिटल इंटरनॅशनल, त्यानंतर मग कॅनेडियन सन लाईफ यांच्याबरोबर बिर्ला समूहाने हातमिळवणी केली.

आणखी वाचा- मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंडाने आणला मिरे अ‍ॅसेट मल्टीकॅप फंड

या काळात बिर्ला उद्योग समूहाने प्रारंभी अलायन्स, त्यानंतर मग ॲपल अशा प्रकारे स्वतःच्या योजना असताना बाजारात उपलब्ध असलेले म्युच्युअल फंड खरेदी केले. बाजाराइतकीच जुनी संकल्पना लाभांश उत्पन्न दर किंवा परतावा या संकल्पनेवर आधारलेला फंड २००३ मध्ये आणला. ज्या ज्या म्युच्युअल फंडाकडे नवनीत मुनोत यांनी नोकरी केली, त्या त्या फंडामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

एचडीएफसी हे वर्षानुवर्षे प्रशांत जैन यांचा म्युच्युअल फंड घराणे म्हणून ओळखले जायचे. नवनीत मुनोत एचडीएफसीकडे आल्यानंतर सुरुवातीचा काही कालावधी दिल्यानंतर आणि प्रशांत जैन निवृत्त झाल्यावर नवनीत मुनोत यांच्या कार्याचा आलेख उंचावत गेला. त्या दरम्यानच्या कालावधीत एचडीएफसी म्युच्युअल फंडाला चढ-उतार सहन करावे लागले. गुंतवणूकदारांपर्यंत योजना पोहचवण्याचे कार्य वितरक करीत असतो. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड यांच्यातील वितरक हा दुवा कधीच नष्ट होणार नाही. नवनीत मुनोत यांना याची जाणीव आहे. जेव्हा एसबी्आय म्युच्युअल फंड प्रथम क्रमांकावर पोहोचला तेव्हा त्या फंडाला ‘तो राजहंस एक’ या ओळीचा अर्थ समजला. स्टेट बँकेच्या शाखांनी फंडाच्या वाढीसाठी प्रयत्न केले. बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा हेदेखील एसबीआय म्युच्युअल फंडाकडून स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पोहचले असल्याचा देखील या फंड घराण्याला फायदा झाला.

आणखी वाचा-बाजारातील माणसं : मावळत्या दिनकरा- प्रशांत जैन

प्रथम क्रमांकावर कोणी राहायचे यांची स्पर्धा पुढील काळात तीव्र होत जाणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या ताज्या विलीनीकरणामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाला प्रगतीचा वेग वाढवता येईल. नवनीत मुनोत यांनी एका मागोमाग एक नवनवीन योजना आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु अजुनही जुन्या योजनांसमोर नवीन योजना विशेषतः इंडेक्स फंड हे हत्तीसमोर ससा असे चित्र आहे. निर्देशांकांवर बेतलेले हे फंड अजूनही भारतात लोकप्रिय नाहीत हे कटू सत्य आहे. आव्हाने भरपूर आहेत, परंतु सेनापती रणांगणावर खेळलेला सैनिक आहे. त्यामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंड पुन्हा वेगाने वाढू लागेल असे नि:संशय वाटते.

pramodpuranik5@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Managing director and chief executive officer of hdfc asset management company navneet munot print eco news mrj