भारतीय बाजाराने बुधवारी प्रथमच ऐतिहासिक ४ ट्रिलियन डॉलर बाजार मूल्याचा टप्पा गाठला आहे. सध्या फक्त तीन देश ४ ट्रिलियन डॉलर प्लस mcap क्लबमध्ये आहेत, त्या देशांमध्ये अमेरिका, चीन आणि जपान यांचा समावेश आहे. हाँगकाँग देखील या क्लबचा एक भाग आहे. या बाजारांमध्ये मुख्य योगदान इतर ठिकाणच्या कंपन्यांकडून येते, प्रामुख्याने चीनच्या बाजारपेठेत बाहेरील कंपन्यांचे मोठे योगदान आहे. BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार मूल्य सध्या ३३३ ट्रिलियन रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर आहे, ज्याचे रुपांतर ४ ट्रिलियन डॉलरमध्ये झाले आहे.
अंदाजे ४८ ट्रिलियन डॉलर बाजारमूल्यासह यूएस हे जगातील सर्वात मोठे इक्विटी बाजार आहे. त्यानंतर चीन (९.७ ट्रिलियन डॉलर) आणि जपान (६ ट्रिलियन डॉलर) आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत भारताच्या बाजार मूल्यामध्ये सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चीनच्या बाजार मूल्यात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. टॉप १० बाजार मूल्यातील क्लबमध्ये अमेरिका ही सर्वात मोठी एकमेव बाजारपेठ आहे, जी भारतापेक्षा १७ टक्क्यांनी वेगाने वाढली आहे. या वर्षी एकत्रित जागतिक बाजार भांडवल १० टक्क्यांनी वाढून १०६ ट्रिलियन डॉलर झाले आहे.
हेही वाचाः IREDA Listing: IREDA चा बाजारात दमदार प्रवेश, पदार्पणातच ५६ टक्के रिटर्न
मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये वाढ
यंदा एमकॅपमध्ये झालेली वाढ व्यापक बाजारपेठेतील मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांच्या वाढीमुळे झाली आहे. टॉप १०० च्या बाहेरील स्टॉक्स आता देशाच्या बाजार मूल्यात ४० टक्के योगदान देतात, जे या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ३५ टक्क्यांवरून वाढले आहेत. १ एप्रिलपासून भारताच्या एमकॅपमध्ये २७ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, टॉप १०० कंपन्यांचे एमकॅप १७ टक्क्यांनी वाढून १९५ ट्रिलियन रुपये झाले आहे, तर टॉप १०० च्या बाहेरील कंपन्यांचे बाजार मूल्य ४६ टक्क्यांनी वाढून १३३ ट्रिलियन रुपये झाले आहे.
हेही वाचाः अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
‘भारत हा एक मोठा शेअर बाजार’
“जागतिक समभागांशी भारताच्या परताव्याचा परस्परसंबंध सातत्याने घसरत चालला आहे आणि तो इतिहासाच्या तुलनेत कमी आहे, असंही मॉर्गन स्टॅनले इंडियाचे MD आणि संशोधन प्रमुख रिधम देसाई म्हणाले. जागतिक संदर्भात भांडवलीकरणाच्या दृष्टीने भारत हा एक मोठा शेअर बाजार आहे आणि जागतिक इक्विटी बाजाराच्या ट्रेंडपासून पूर्णपणे विचलित होऊ शकत नाही. “सॉफ्ट ग्लोबल मार्केट्स संपूर्ण परतावा मर्यादित करू शकतात.