सुधीर जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील दमदार खरेदीने सरल्या सप्ताहात पहिल्याच दिवशी बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी नवशिखर गाठले. सप्ताहात आलेल्या अनेक सकारात्मक बातम्यांमुळे बाजाराने दररोज नवे विक्रम केले. चीनमधील जनक्षोभाच्या रेट्यामुळे करोनावरील निर्बंधांत थोडी सवलत देण्यात आली. त्यामुळे चीन या महत्त्वाच्या देशात उत्पादन घट होणार नसल्याचा निष्कर्ष बाजाराने काढला. बुधवारी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी तेथील व्याजदरातील वाढीचा वेग डिसेंबर महिन्यापासूनच कमी होण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे अमेरिकी बाजाराने मोठी झेप घेतली. भारतात नोव्हेंबर महिन्याचे प्रवासी वाहन विक्रीचे आणि जीएसटी संकलनाचे आकडे समाधानकारक आले. खनिज तेल व डॉलरचे मूल्य घसरले. या सर्वांचा परिणाम बाजारात उत्साहाचे वातावरण टिकून राहण्यात झाला. शेवटच्या दिवशी शुक्रवारी मात्र थोडी नफावसुली पाहायला मिळाली. तरीही बाजाराचे प्रमुख निर्देशांक साप्ताहिक तुलनेत एक टक्क्याच्या कमाईसह बंद झाले.

आदित्य बिर्ला फॅशन : ही कंपनी अनेक प्रसिद्ध नाममु्द्रांच्या तयार कपड्यांची निर्मिती व विक्री करते. तसेच पॅंटलून्स या कपडे व गृहसजावटीच्या विक्री दालनांवर तिची मालकी आहे. गेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक तुलनेत ४९ टक्के वाढ झाली व कंपनीने पुन्हा करोनापूर्व काळापेक्षा जास्त प्रगती साधली. उत्पादन क्षमता वाढवायचे व जाहिरात खर्च वाढल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले. पण येणाऱ्या काळात ते भरून निघेल. कंपनीने रिबॉक या प्रसिद्ध व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. आणखीही अशा काही योजना कंपनीकडे आहेत. कंपनी ई-कॉमर्सद्वारेदेखील ग्राहक संख्या वाढवीत आहे. घरातून काम करणाऱ्यांसाठी आरामदायी कपड्यांची मालिका कंपनीने सादर केली आहे. सध्याची समभागांची ३१६ ची पातळी पुढील दोन ते तीन वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगली आहे.

कॅम्पस ॲक्टिव्हवेअर : आदिदास, पुमा, नाईकी अशा परदेशी नाममुद्रांचा उच्च दर्जा व किमती अशी ओळख असलेल्या, खेळाला पूरक अशा बुटांच्या व्यवसायात कंपनीचा दबदबा आहे. या व्यवसायात गेल्या १५ वर्षांत सामील झालेल्या कॅम्पसने जनसामान्यांना परवडेल व लुभावेल अशा उत्पादनांची मालिका सादर केली आहे. कंपनीच्या उत्पादनांना भरघोस मागणी मिळत आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत वाढलेली जागरूकता वाढवणे, क्रीडा व्यक्तिमत्त्वांचा आणि क्रीडा स्पर्धांचा वाढता प्रभाव, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि सुट्ट्यांसाठी कॅज्युअल पोशाखांना वाढती पसंती यामुळे या उद्योगास चांगले दिवस आहेत. सप्टेंबरअखेर तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १६ टक्के वाढ झाली ज्यामध्ये किंमत वाढीपेक्षा वस्तूंच्या विक्रीचा जास्त प्रभाव होता. नफ्यावर मात्र परिणाम झाला होता जो आता कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यावर पूर्वपदावर येईल. त्यामुळे सध्या या समभागात ४५० रुपयांपर्यंत झालेली घसरण खरेदीची संधी देत आहे.

एबीबी : वीज व ऊर्जा वापर सुलभ व पर्यावरणपूरक करण्यासाठी विविध उत्पादने सादर करणारी ही एक जागतिक कीर्तीची कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत विद्युतीकरण, स्वयंचलित औद्योगिक उत्पादन पद्धती, व रोबोटिक तंत्रावर आधारित उत्पादनांचा समावेश आहे. सप्टेंबरअखेर कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात १९ टक्के तर नफ्यात ४० टक्के वाढ झाली होती. कंपनीला मिळालेल्या नव्या कंत्राटांमध्ये ४० टक्क्यांची घसघशीत वाढ झाली होती. भारतामध्ये औद्योगिकीकरण, वीज निर्मिती, डाटा सेंटर्स, रेल्वे, मेट्रो अशा पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या भांडवली खर्चाच्या योजना साकारत आहेत. यामध्ये एबीबीसारख्या कंपन्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या तीन हजार रुपयांच्या पातळीला कंपनीचे समभाग मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक आहेत.

वेस्टलाइफ फूडवर्ल्ड : मॅकडोनाल्ड्स या जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री साखळीची पश्चिम व दक्षिण भारतातील प्रतिनिधी असलेली ही कंपनी आहे. पदार्थांमध्ये भारतीय जनतेला अनुकूल बदल कंपनी करत आहे. सध्याची ३२६ दालनांची संख्या पुढील वर्षात ६३० पर्यंत वाढविण्याचा कंपनीचा इरादा आहे. आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे कंपनीचा व्यवसाय जोरात चालेल. भारतात सेवनसिद्ध पदार्थ व तत्पर सेवा हॉटेल्सचा व्यवसाय २३ टक्क्यांच्या सरासरीने वाढणार आहे. विक्रीमागील वर्षाच्या १,५०० कोटींवरून ४,००० कोटींवर नेण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. गेल्या जूनमध्ये ४५०-४६० च्या पट्ट्यात सुचविलेला हा समभाग आता ७०० च्या घरात असला तरी अजूनही गुंतवणुकीची संधी आहे.

एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंगने भारताच्या आर्थिक विकासाचा दर जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ७ टक्क्यांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी भारतात मंदीची शक्यता फारशी नसल्याचे म्हटले आहे. व्याजदर वाढत असले तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीने गेले सहा महिने सतत तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. पीएमआय निर्देशांक ५५ च्या पुढे आहे. जीएसटी संकलन दर महिना दीड लाखाच्या घरात होत आहे. बाजारातील बरेचसे संकेत सकारात्मक असल्यामुळे व अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरु झाली असल्यामुळे बाजारात उत्साह वाढला आहे. त्याला परदेशी गुंतवणूकदारांची साथ लाभत आहे. निफ्टीचे आता नव्या १९,००० च्या उच्चांकाकडे डोळे लागले आहेत. या सप्ताहातील गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण अशा घटना बाजाराला दिशा देणाऱ्या ठरतील.

सुधीर जोशी
sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market indices new highs first day of week strong buying reliance industries and information technology companies tmb 01