प्रमोद पुराणिक
आगामी २०२४ च्या १ जानेवारीला चार्ली मुंगेर १०० वर्षाचा होईल. चित्रपट सृष्टीत सलीम-जावेद अशी जोडी होती, तर सिनेसंगीत क्षेत्रात शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी अशा अनेक जोड्या होत्या. अमेरिकी भांडवल बाजारात मात्र वॉरेन-मुंगेर ही जोडी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. वॅारेन बफेवर अमेरिकेत प्रचंड मोठ्या संख्येने पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मात्र त्यांचा जोडीदार चार्ली मुंगेरवर तुलनेने कमी पुस्तके आहेत. म्हणून चार्लीची थोडक्यात ओळख करून देणे आवश्यक वाटते.
“चार्ली जर नसता तर आज जो वॅारेन आहे, तो वॉरेन तसा दिसला नसता,” असे जेव्हा वॉरेन बफे स्वतः लिहितो तेव्हा चार्लीबद्दल आणखी कुतूहल निर्माण होते. दरवर्षीच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सभेत आलेल्या प्रश्नांना कोणताही कागद हातात न घेता, हातात कोकची बाटली घेऊन वॉरेन उत्तर देणार आणि उत्तर दिल्यानंतर चार्लीकडे बघून ‘आणखी काही सांगायचे आहे का?’ असा प्रश्न विचारणार. त्यावर ‘माझ्याकडे अधिक भर घालावी असे काही नाही’ असे चार्ली म्हणणार. “वॉरेन तरुण वाटावा म्हणून त्याने मला बरोबर घेतलेले आहे, बाकी कोणतेही कारण नाही,” अशी वॉरेनला चार्ली कोपरखळी मारणार. असा ही खेळीमेळी वर्षानुवर्षे चालू आहे, अनेकांनी अनुभवली आहे. वॉरेन बफेचे वय वर्षे ९४ आणि चार्ली वय वर्षे ९९. असे हे दोन चिरतरुण म्हातारे बाजारात सत्ता गाजवत आहेत.
आणखी वाचा-बाजारातील माणसं – ‘हमारा बजाज’ राहुल बजाज
१९५३ ला चार्लीचा घटस्फोट झाला. १९५६ मध्ये दुसरे लग्न झाले. त्याला एकूण ८ मुले आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या या व्यक्तीने १९६१ ला प्रॉपर्टी डेव्हलपमेंट हा व्यवसाय सुरू केला. १९६४ ला तो बंद केला. वॉरेनचे कुटुंब आणि चार्लीचे कुटुंब त्याच्या कुटुंबीयातल्या एका सामाईक नातेवाईकांमुळे जेवणाकरता एकत्र आले. दोघांच्या तारा जुळल्या आणि वर्षानुवर्षे दोघे बरोबर आहेत, इतक्या सोप्या वाक्यात आणि अगदी थोडक्यात सांगता येईल असे हे नाते आहे. मूळात एकत्र कसे आले त्यापेक्षाही एकत्र आल्यानंतर काय काय केले हा इतिहास प्रचंड मोठा आहे. वॉरेनने सांगितले म्हणून जग ऐकेल, परंतु चार्ली ते ऐकेलच असे नाही, असे वॉरेन स्वतःच म्हणतो. पण तरीसुद्धा दोघे कोणत्याही महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर फक्त फोनवर एकमेकांशी काही बोलतात आणि दोघांचा निर्णय पक्का होतो.
एक पद्धत किंवा एक विचारसरणी यशस्वी झाली की पुन्हा पुन्हा तीच पद्धत वापरली जाते. परंतु काही वेळा प्रगतीमध्ये यश हाच मोठा शत्रू असतो. म्हणून चार्ली जेव्हा वॉरेनला सांगतो की, ज्या संकल्पनेवर तुम्हाला यश मिळाले आहे, ज्यावर तुम्ही प्रेम करता अशा संकल्पना नष्ट करा आणि नव्या संकल्पनेचा विचार करा, हे आपल्या पचनी पडत नाही. स्वतःच्या चुका मान्य करा. या चुकांपासून नवीन शिकण्याची तयारी ठेवा. रडत बसू नका, असे चार्ली सांगतो. चार्ली आणि वॉरेन दोघे एकत्र येण्याअगोदर चार्लीने काही नुकसान सहन केले. वॉरेनने गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी घेतलेला पैसा परत केला. आणि त्यानंतर दोघे एकत्र आले ते आजतागायत बरोबर आहेत. वॉरेनचा जो गुरु होता त्याच्या विचारसरणीचा पगडा वॉरेनवर वर्षानुवर्षे कायम होता. अशावेळेस चार्लीमुळे वॉरेनने काही जुन्या संकल्पना मागे टाकल्या.
आणखी वाचा-भारत-कॅनडा तणावाचे बाजारात पडसाद
चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे दोघांच्या स्वभावात खूप वेगळेपण आहे. वॉरेनला प्रकाश झोतात राहणे आवडते. चार्लीला मासे पकडणे आवडते तर वॉरेनला अजिबात नाही. मोठमोठ्या कंपन्या बर्कशायर हॅथवेने खरेदी केल्या. ज्यांच्या कंपन्या खरेदी केल्या, त्यांच्यावरच व्यवस्थापनाची जबाबदारी कायम ठेवली. त्याच्या व्यवसायाचा मोबदला म्हणून बर्कशायर हॅथवेचे शेअर्स दिले. अशाप्रकारे बर्कशायर हॅथवे मोठी होत गेली, असा हा इतिहास आहे. या दोघांची विचारसरणी भारतीय गुंतवणूकदारांना मान्य होईलच असे अजिबात नाही. या दोघांचे अनुकरण करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये, पण तरीसुद्धा बाजारात व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच.