प्रमोद पुराणिक
महाराष्ट्रात शेअर बाज़ार आहे, परंतु शेअर बाजारात महाराष्ट्रीयन माणूस नाही, असे पूर्वी म्हटले जायचे. सुरुवात कधी झाली सांगणे अवघड आहे, पण हळूहळू हे समीकरण बदलताना दिसून येऊ लागले. १९७३ च्या फेरा कायद्यामुळे बाजारात शेअर्सचा पुरवठा हळूहळू वाढू लागला. कोका कोला व आयबीएम या दोन बहुराष्ट्रीय कंपन्या त्यासमयी देशांत व्यवसाय करीत होत्या. भारतात चांगला व्यवसाय विस्तारला असताना या कंपन्यांनी भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. देशातील भांडवली बाजारात आपले समभाग सूचिबद्ध करणे हे त्यांना मान्य नव्हते. परंतु अनेक कंपन्यांनी हे धोरण मान्य केले. त्यांच्या शेअर्सची विक्री केली यामुळे जनसामान्यांमध्ये बाजारात गुंतवणुकीचे आकर्षण निर्माण झाले.
गुंतवणूकयोग्य वातावरण निर्माण झाल्याने १९७७ साली रिलायन्स इंडस्ट्रीज, मे १९७८ मध्ये एचडीएफसी लिमिटेड आणि त्यानंतर १९८० ला त्यावेळेची टेल्को आताची टाटा मोटर्स आणि तिचे सात वर्ष मुदतीचे दोन टप्प्यात परिवर्तनीय कर्जरोखे विक्रीसाठी बाजारात आले. विजेचे उत्पादन व वितरण व्यवसायात असलेल्या तीन टाटा पॅावर कंपन्यांनी एकाच वेळेस आपले समभाग दर्शनी किमतीस विक्रीस आणले. अशी आणखी खूप उदाहरणे देता येतील. जागेच्या मर्यादेमुळे काही कंपन्यांचाच, तोही धावता उल्लेख केला.
वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी या काळातसुद्धा अनेक प्रवर्तक आले आणि परागंदा झाले आणि संपलेसुद्धा. १९८५ ला तर लिजिंग कपन्यांचे पेव फुटले होते. नावे कमी पडली म्हणून बजरंग लिजिंग या नावानेसुद्धा कंपनी बाजारात आली होती. दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांतून मोठ्या संख्येने नवीन भागधारक निर्माण होण्यास मदत झाली. महाराष्ट्रात त्या दिशेने जाणिवा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नही झाले. या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे काम त्या समयी नाशिक गुंतवणूकदार संस्था आणि जनलक्ष्मी सहकारी बँक या दोन संस्थांनी सक्रियपणे केले.
भागधारक निर्माण झाले, समभागांची खरेदी विक्री करण्यासाठी उप-दलाल वर्ग निर्माण झाला. १९८२ ला पुणे शेअर बाजार सुरू झाला. पुण्याचे उप-दलाल हे त्यामुळे शेअर दलाल झाले. १९८५ ला अहमदनगरला ‘शेअर डीलर असोसिएशन’ स्थापन झाली. १९९२ ला नाशिक गुंतवणूकदार संघटनेने सहकारी तत्त्वावर शेअर बाजार सुरू केला. सायंकाळी ७:३० ते ८:३० असे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालायचे. १९९३ ला नाशिक शेअर ब्रोकर असोसिएशनने सकाळी मुंबई शेअर बाजार सुरू होण्याअगोदर एका तासाचे व्यवहार सुरू केले. विशाखापट्टणम या ठिकाणी अशा प्रकारे बाजार चालत होता. नाशिक शेअर ब्रोकर असोसिएशनचे पदाधिकारी बाजार कसा चालतो याची पाहणी करण्यासाठी तेथे जाऊन आले.
प्रथम राष्ट्रीय शेअर बाजाराची एनएसडीएल ही संस्था आणि पुढे मुंबई शेअर बाजाराची सीडीएसएल अशा दोन डिपॉझिटरी उभ्या राहिल्या. या दोन संस्थांमुळे शेअर सर्टिफिकेट, ट्रान्सफर फॅार्म, सह्या जुळणे या कटकटीदेखील बंद झाल्या. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बाजार घराघरांत पोहचला. नवीन भागधारक यातून वाढत गेले. परंतु तरीही हे कार्य अव्याहत चालू राहणार आहे. या कथेतला आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे कंपन्यांचे भागधारक वाढविण्याचे प्रयत्न आणि या प्रयत्नात आलेले त्यांचे अनुभव. १९७३/७४ ला किर्लोस्कर ट्रॅक्टर लिमिटेड या किर्लोस्कर उद्योग समूहातील कंपनीने प्रथम नाशिक येथे सातपूरला पायलट प्रकल्प सुरू केला. नंतर एकलहरा नाशिकरोड येथे मोठा प्रकल्प सुरू केला. कंपनीच्या शेअर्सची विक्री सुरू झाली. नाशिक परिसरातला आणि किर्लोस्कर उद्योगसमूहातील प्रकल्प होता म्हणून अर्ज केले. परंतु अर्जदारांचे आर्थिक नुकसान झाले. १९८० ला मेल्ट्रॉन सेमिकंडक्टर या कंपनीने प्रकल्प सुरू केला. पुन्हा या कंपनीतसुद्धा नवीन भागधारकांना फटका बसला.
काही वर्षानंतर दातार स्विचगिअर लिमिटेड या कंपनीनेही निराशा केली. तिच्या भागधारकांना खूप चढ-उतार बघावे लागले. परफेक्ट सर्कल, गॅब्रियल आणि एशिया ऑटोमोटिव्ह या आनंद उद्योग समूहातील कंपन्या, यापैकी सध्या फक्त गॅब्रियलचे भागधारक आनंदी आहेत. पोफळे यांच्या फेमकेअरने खूप चढ-उतार दाखवले, परंतु आता तिचे डाबरमध्ये विलीनीकरण झाल्याने नाशिकचे भागधारक खूश आहेत. बॅगची निर्मिती करणाऱ्या व्हीआयपी या कंपनीचे भागधारक खूश आहेत. ठक्कर डेव्हलपर्सनी बाजारातील समभाग नोंदणी रद्द केली. अशोका बिल्डकॅान, करडा कन्स्ट्रक्शन, बेदमुथा वायर्स या कंपन्या बाजारात सूचिबद्ध झाल्या. या अगोदर प्रवर्तक भांडवल बाजाराची मदत कंपन्यांच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकते यावर विश्वास ठेवत नव्हते. अनेक कंपन्यांची यासंबंधाने उदाहरणे देता येतील. त्यांचे यश-अपयश हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आता कंपन्यांच्या प्रवर्तकांसाठी बाजार हा विषय गरजेचा आहे, हा त्यांच्या विचारसरणीत झालेला महत्त्वाचा बदल आश्वासक आहे.
pramodpuranik5@gmail.com