‘बँक निफ्टी’ने केलेले आर्जव सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने मनावर घेतले आणि १९ ऑक्टोबर २०२१ चा ऐतिहासिक उच्चांक पार केला. आता ही तिन्ही भावंडे निरभ्र आकाशात स्वच्छंदपणे विहार करत असल्याने हे आनंदी, प्रसन्न वातावरणाने ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ असे वळण घ्यावे, अशी गुंतवणूकदार आशा करत आहेत. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ६२,८६८.५० / निफ्टी: १८,६९६.१०

आता चालू असलेल्या तेजीची पूर्वसंकल्पना ही १७ ऑक्टोबर २०२२ च्या ‘सुधारणा, शाश्वत की क्षीण स्वरूपाची’ या लेखातून दिली होती. आताच्या तेजीची मानसिकता विकसित करणाऱ्या त्या लेखातील वाक्य होते – ‘तेजीची कमान ही १७,००० च्या स्तरावर आधारलेली आहे आणि निफ्टी निर्देशांकावर १७,६०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू, वळणबिंदू’ (टर्निंग पॉइंट) असून निफ्टी निर्देशांक सातत्याने १७,६०० च्या वर १५ दिवस टिकल्यास ‘बाजारात मंदीचे दिवस संपून तेजीचे दिवस सुरू झाल्याची खूणगाठ मारावी.’ या वाक्याचे प्रत्यंतर निफ्टी निर्देशांक १७,००० वरून १८,८८७ पर्यंतच्या नितांतसुंदर तेजीच्या वाटचालीने दिले.

निफ्टी आता निरभ्र अशा तेजीच्या उच्चांकाच्या आकाशात विहार करत असल्याने, आता पुन्हा आपल्याला तेजीच्या नवख्या, अनोळखी प्रदेशातील वाटचालीसाठी ‘जीपीएस ट्रँकिंग’ प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने निफ्टी निर्देशांकावर १८,००० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ आहे. कसे ते जाणून घेऊ या.गेल्या वर्षी १९ ऑक्टोबरला निफ्टी निर्देशांकाने १८,६०४ चा उच्चांक मारल्यानंतर, गेले वर्षभर बाजार मंदीच्या गर्तेतच होता. मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक, ही निफ्टी निर्देशांकावर १८,००० पर्यंतच यायची जसे की, खालील काही उदाहरणे पाहा.

१९ ऑक्टोबर २०२१ ला १८,६०४ च्या उच्चांकानंतर, २० डिसेंबर २०२१ रोजी १६,४१० चा नीचांक. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर १८,३५० पर्यंत सुधारणा झाली पण ती क्षणिक ठरली. अगदी दुसऱ्या दिवशी निफ्टी निर्देशांक १८,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरला आणि तो १७,९३८ वर बंद झाला. या स्तरावरून जी घसरण सुरू झाली ती ८ मार्चला निफ्टीने १५,६७१ चा नीचांक नोंदवला. या स्तरावरून पुन्हा सुधारणा होत ४ एप्रिलला १८,११४ चा दिवसभरापुरता उच्चांक निर्देशांकाने नोंदवला. पुढच्या दिवशी पुन्हा निफ्टी निर्देशांक १७,९५७ (१८,००० च्या खाली) पातळीवर आला.

पुन्हा निफ्टी निर्देशांक १८,११४ वरून घसरत १७ जूनला १५,१८३ चा नीचांक, या स्तराचा आधार घेत पुन्हा निफ्टी निर्देशांकात सुधारणा होत गेली. पुढे निफ्टीने १५ सप्टेंबरला १८,०९६ उच्चांक नोंदवत त्या दिवशी १७,८७७ चा बंद भाव दिला. या वर्षभरातील उच्चांकाची दखल घेता निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,००० च्या स्तरावर टिकण्यास अपयशी ठरत होता. आता जेव्हा निफ्टी निर्देशांकाने १८,८८७ चा उच्चांक नोंदवल्यामुळे येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकावर १८,००० हा भविष्यकालीन भरभक्कम आधार असणार आहे. व आताच्या घडीला हलक्याफुलक्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाने १८,६०० ते १८,४०० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकात पुन्हा सुधारणा होऊन निफ्टी निर्देशांक १८,९०० ते १९,२०० पर्यंत झेपावेल.

शिंपल्यातील मोती

गेले एक वर्ष मंदीच्या विळख्यात अडकलेले क्षेत्र म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्र. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाचे चढे दर, चलन विनिमय दरात सशक्त डॉलरपुढे कमकुवत झालेला रुपया, महागाई आटोक्यात व्याजदर वाढ होय. जगभरात चलनात असलेला अतिरिक्त पैसा शोषून घेण्याचा मार्ग म्हणजे कर्ज महाग करून, व्याज वाढवण्याच्या धोरणांमुळे उद्योगधंदयांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागते, उद्योगधंदे विस्ताराएैवजी ‘जैसे थे’ आणि काटकसरीचे धोरण अवलंबायला लागतात, ज्याचा थेट परिणाम ‘संगणक व माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्रावरील खर्चातील कपातीवर जगभरातून व्हायला लागला.

मग आता अशी काय ‘जादूची कांडी’ फिरली की एखाददुसरी कंपनी न निवडता ‘संगणक व माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्रालाच ‘शिंपल्यातील मोती’ म्हणून निवडले? यासाठी रशिया-युक्रेन युद्धबंदी झाली का? जगभरातील उद्योगधंदे, व्यापारउदीमातील मरगळ झटकून सर्वत्र आपल्या बाजारासारखा उत्साह संचारला की काय? नाही, वास्तव बरोबर उलट आहे. इंग्लंडने सरकारी पातळीवर मंदी जाहीर केलेली आहे. किंबहुना संपूर्ण युरोप ‘आर्थिक धुक्याच्या’ चादरीत लपेटला गेला आहे. त्यात ‘संगणक, माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्राचे मुख्य ग्राहक हेच देश आहेत हे सर्वज्ञात असून, हेच क्षेत्र निवडणे म्हणजे…‘शोले सिनेमातील बसंतीच्या मावशीकडे आपल्या मित्राचे स्थळ घेऊन गेलेला जय जसे मित्राच्या ‘गुणां’बद्दल जी स्तुतिसुमने उधळतो, तसे मी या क्षेत्राबद्दल उपहासाने लिहीत तर नाही ना? नाही, तसेही नाही.

आशा उद्याची, बुडत्याला काडीचा आधार ( रे इन टनल) या तत्त्वावर हे जग चालत असते. नुकतेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे- ‘फेड’चे मुख्य जेरोम पॉवेल यांचे विधान पाहा. भविष्यातील पतधोरणात कर्जावरील व्याज वाढण्याची गती संथ होणार आहे. यामुळे व्यापार-उदीमास चालना मिळण्याची शक्यता आहे.

आता हे क्षेत्र व त्यातील कंपन्या ज्यात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा ‘निफ्टी आयटी बीझ’ (३२.३७ रु.), इन्फोसिस (१,६३७ रु.), टीसीएस (३,४३९ रु.) पर्सिस्टंट सिस्टीम (४,३४५ रु.), एचसीएल टेक्नॉलॉजी (१,१३५ रु.), केपीआयटी टेक्नॉलॉजी (७१९ रु.),

???ॲफल???

इंडिया लिमिटेड (१,२३३ रु.) आणि या क्षेत्रातील इतर समभाग असतील. (वरील सर्व समभागांचे शुक्रवार २ डिसेंबरचे बंद भाव कंसात दिले आहेत) हे क्षेत्र व त्यातील कंपन्या या आगामी एक वर्षासाठी गुंतवणुकीसाठी विचारात घ्यावयाच्या असल्याने त्या आता नमूद करून त्याचा विस्तृत आढावा पुढील लेखांच्या शृंखलांमधून घेतला जाईल.

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ (टार्गेट प्राइस) या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market trends bank nifty sensex share and stock market nippon india mutual fund tmb 01