व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (बीएसई कोड ५३१२६६)
प्रवर्तक: व्हीएसटी समूह
बाजारभाव: रु. ३,५१४ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ट्रॅक्टर्स/ टिलर्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु.८.६४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५५.५८
परदेशी गुंतवणूकदार १.७६
बँकस्/ म्यूचुअल फंडस्/ सरकार १८.९७
इतर/ जनता २३.६९
पुस्तकी मूल्य: रु.९५४
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: २५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १०७
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १६.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १६
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ९६.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १५.९
बीटा : ०.५
बाजार भांडवल: रु. ५,४३२ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३,२०० / २,०२८
वर्ष १९६७ मध्ये स्थापन झालेली व्हीएसटी टिलर्स, दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध व्हीएसटी ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग आहे. मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड, जपान सोबत संयुक्त उपक्रम म्हणून सुरुवात झालेली व्हीएसटी टिलर्स आज भारतातील पॉवर टिलरची सर्वात मोठी उत्पादक आहे. भारतातील पॉवर टिलर अर्थात यांत्रिक नांगरामध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा ७१ टक्के आहे.
उत्पादन पोर्टफोलिओ
कंपनीचे बेंगळुरू, मलूर, म्हैसूर आणि होसूर येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून व्हीएसटी आज भारतातील पॉवर टिलर आणि फोर-व्हील ड्राइव्ह कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरची सर्वात मोठी उत्पादक आहे. पॉवर टिलर हलके आणि कॉम्पॅक्ट फार्म मशिनरी श्रेणीत मोडतात. हा प्रकार विशेषतः लहान आणि सीमांत शेतकर्यांसाठी फायदेशीर आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीने एकूण ३८,२४७ पॉवर टिलरची विक्री केली. कंपनीचे ६६० डीलर्सचे नेटवर्क आहे.
पाच दशकांपूर्वी सादर केलेला ‘व्हीएसटी शक्ती’ पॉवर टिलर (वॉकिंग ट्रॅक्टर) हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे. कंपनीच्या ‘फील्ड ट्रॅक’ या ब्रँड अंतर्गत युरोपियन युनियनच्या विविध बाजारपेठांमध्ये नवीनतम युरोपीय संघाच्या मानकांची पूर्तता करणारे ट्रॅक्टर देखील विकले जात आहेत. सुरुवातीला ‘व्हीएसटी मित्सुबिशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने आता ‘व्हीएसटी शक्ती’ या ब्रँड अंतर्गत कॉम्पॅक्ट आणि कृषी ट्रॅक्टर्सच्या श्रेणीसह आपला बाजार हिस्सा वाढवला आहे.
आणखी वाचा-बाजार-रंग : उदय बँकेतर वित्तीय संस्थांचा
कंपनी जगभरातील ४० हून अधिक देशांत ‘व्हीएसटी’ आणि ‘व्हीएसटी फील्डट्रॅक’ ब्रँड अंतर्गत कॉम्पॅक्ट आणि उच्च अश्वशक्ती असणारे ट्रॅक्टर निर्यात करते. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२३ मध्ये व्हीएसटीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण ८,३०० हून अधिक ट्रॅक्टर विकले आहेत. भारतातील कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्स विभागामध्ये व्हीएसटीचा ८ टक्के बाजार हिस्सा आहे.
कंपनी ऑटोमोटिव्ह तसेच ट्रॅक्टर उद्योगाला क्रँक शाफ्ट्स, एचपी सिलेंडर ब्लॉक्स, कनेक्टिंग रॉड्स, मुख्य कॅमशाफ्ट्स आणि ट्रान्समिशन इ. चा पुरवठा करते. या खेरीज कंपनीने तिच्या विस्तृत वितरण वाहिनीद्वारे सुट्या भागांचा पुरवठा सुरू केला आहे. सध्या, ते ट्रॅक्टर, टिलर, इतर लहान शेती मशिनरी आणि ऑटोमोटिव्ह वंगण श्रेणीचे सुटे भाग पुरवत आहे. हा व्यवसाय पूर्णपणे डिजिटल झाला असून वितरण नेटवर्कमध्ये ८५ वितरक, ६८७ डीलर्स आणि सुमारे ५,००० किरकोळ विक्रेते यांचा समावेश आहे. व्हीएसटीची युरोपमध्ये विशेषतः फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, पोर्तुगाल, पोलंड, रोमानिया, बल्गेरिया आणि इतर अनेक देशांमध्ये २५ हून अधिक वितरण केंद्रांसह लक्षणीय उपस्थिती आहे.
आणखी वाचा-‘या’ IPO मध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांची लागली रांग, तो उघडताच १०० टक्के प्रतिसाद
जून २०२३ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २४६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२.९९ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल २२८ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनी आपली एकूण वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर भर देत असून नवीन उत्पादन विकासावर आणि देशांतर्गत बाजारपेठेतील बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्ससाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवत आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या १० दिवसात हा शेअर साधारण ५०० रुपयांनी वाढला आहे. मात्र प्रत्येक मंदीत एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेली व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर तुमच्या पोर्टफोलियोमध्ये असायला हरकत नाही.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
Stocksandwealth@gmail.com
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.