म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सर्वोत्तम मानला गेलेला आणि लोकप्रिय ठरलेला मार्ग म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ होय. सरलेल्या डिसेंबर महिन्यात ४३.३२ लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत. जी त्या आधीच्या म्हणजेच नोव्हेंबर २०२३ महिन्याच्या तुलनेत ३१ टक्के अधिक आहे. तर त्याआधीच्या म्हणजेच डिसेंबर २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण ७३.५ टक्के अधिक राहिले आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) संकलित या आकडेवारीनुसार, जुलैपासून दर महिन्यात सरासरी ३० लाख खात्यांची भर पडली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत २.८५ कोटी एसआयपी खात्यांची नोंदणी झाली. जी आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील अनुक्रमे २.५१ कोटी आणि २.६१ कोटींहून अधिक राहिली आहे.

हेही वाचा… कोनस्टेलेक इंजिनीयर्सची ‘एनएसई इमर्ज’वर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्री; विस्तार कार्यक्रमासाठी २५ कोटी रुपयांचे भांडवल उभारणार

बाजार विश्लेषकांच्या मते, एसआयपी नोंदणीतील वाढ ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवरील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि विद्यमान वर्षात जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून संभाव्य व्याजदर कपातीची आशा आहे. देशातील काही राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने यश मिळविले आहे. शिवाय मे महिन्याच्या आसपासच्या होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा बहुमत मिळाल्यास स्थिर राजकीय नेतृत्व मिळण्याच्या आशेने निर्देशांक नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

बाजार नेहमीच उच्चांकावर असताना, एकरकमी गुंतवणुकीऐवजी एसआयपी करणे हा एक विवेकपूर्ण दृष्टिकोन आहे आणि शिवाय गुंतवणूकदारांमधील वाढती जागरूकता देखील म्युच्युअल फंडाकडे ओढा वाढण्याचे मुख्य कारण आहे.

हेही वाचा… ‘बजाज ऑटो’कडून प्रत्येकी १० हजार रुपयांना समभाग पुनर्खरेदी; एकंदर ४,००० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजूरी

एसआयपी हे संपत्तीनिर्मितीचा शाश्वत मार्ग आहे. तसेच, यंदा मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीमध्ये असलेल्या एसआयपी योजनांचे एनएव्ही वाढले आहेत. परिणामी गुंतवणूकदारांच्या परताव्यात मोठी वाढ झाली आहे, असे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक
दीपक जसानी यांनी व्यक्त केले.

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढते आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या मते, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या माध्यमातून करावयाची किमान गुंतवणूक मर्यादा २५० रुपयांवर आणण्याच्या प्रयत्नाने गुंतवणुकीला अधिक चालना मिळेल.

‘एसआयपी’ म्हणजे काय?

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे ‘एसआयपी’ ही म्युच्युअल फंडात नियमितपणे निश्चित रक्कम गुंतविण्याची पद्धत आहे. एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी महिन्यातून, तिमाहीतून अथवा सहामाहीतून एकदा विशिष्ट तारखेला गुंतवणूक केली जाऊ शकते. म्युच्युअल फंड योजनेत ‘एसआयपी’ म्हणजे दर महिन्याला नियमितपणे त्यावेळी असलेल्या ‘एनएव्ही’नुसार कमीत कमी २५० रुपये इतकी गुंतवणूक करता येते. या माध्यमातून अल्पशी परंतु नियमित गुंतवणूक केल्यास कालांतराने मोठ्या संपत्तीचा संचय होऊ शकतो.