एप्रिल १९, १९५७. मुकेश अंबानी यांचा हा जन्मदिवस. वयाच्या २५ व्या वर्षी धीरूभाईंनी मुकेशवर पाताळगंगा प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी टाकली. फक्त १८ महिन्यांतच मुकेशने हा ८० कोटी रुपयांचा प्रकल्प संपूर्ण उभारणी करून सुरू करून दाखविला. वडिलांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. ‘बाप से बेटा सवाई’ या उक्तीप्रमाणे मुकेशने रिलायन्सबाबत एवढे महत्त्वाचे निर्णय घेतले की, कालपर्यंत कंपन्यांचे विलीनीकरण करून मोठी होत जाणारी रिलायन्स आता विलगीकरण करून उद्योग समूहाला नवधुमाऱ्यांसह मोठे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या सुदैवाने रिलायन्सचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे आणि रिलायन्समधून लवकरच ‘रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’सारखे अनेक उपांग मूळ धरून फोफावत असल्याचे येणारा काळ दाखवून देईल.
धीरूभाईंनी सुरू केलेली कंपनी ८ मे १९७३ ला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बनली. पुढे सार्वजनिकरीत्या शेअर्सची विक्री करून, २३ जानेवारी १९७८ ला रिलायन्सच्या शेअर्सची बाजारात नोंदणी झाली. बाजारातील या नोंदणीला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून हे वर्षे अतिशय महत्त्वाचे आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक नवीन सुरुवात आहे. हे विलगीकरण यशस्वी झाले की रिलायन्स रिटेलचे विलगीकरण कधी होणार याकडे बाजाराचे लक्ष लागेल.
हेही वाचा – ‘माझा पोर्टफोलियो’ : पोर्टफोलियोसाठी शेअरची निवड कशी करावी?
इतर कंपन्या आणि रिलायन्स यामधील फरक कोणता? तर महत्त्वाकांक्षा, दूरदर्शी नेतृत्व आणि विचारपूर्वक घेतले गेलेले आर्थिक निर्णय. आज जरी रिलायन्स अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असली तरी उगाचच एकामागोमाग एक असे व्यवसाय या कंपनीने सुरुवातीला कधीच केले नाहीत. कापड उद्योगात नेतृत्व करीत असताना क्षेत्रबदल म्हणून जे प्रकल्प सुरू केले त्याला ‘बॅकवर्ड इन्टीग्रेशन’ असे म्हटले जाते. मात्र त्यानंतर रिफायनरीज, पेट्रोकेमिकल्स, तेल आणि वायू उत्खनन असे एकामागोमाग एक मोठमोठे प्रकल्प तिने यशस्वीरीत्या उभारले. ज्या वेळेस या प्रकल्पातून प्रचंड मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलासाठी पैसा निर्माण होऊ लागला तेव्हा मग इतर उद्योगांकडे लक्ष देण्यास तिने सुरुवात केली असे म्हणता येईल. राजकीय पाठिंब्याने उद्योग वाढतात हा भ्रम आहे, तसे जर असते तर बिर्ला, बजाज हेसुद्धा महात्मा गांधींचे निकटवर्तीय होते!
दोन भावांमध्ये जेव्हा कौटुंबिक कलह सुरू झाला तेव्हा सुरुवातीला अनिल अंबानी यांच्याकडे ज्या उद्योगांना ‘सनराईज इंडस्ट्रीज’ म्हटले जाते असे नवे उद्योग आले. तुलनेने मुकेश यांच्या वाट्याला ‘सनसेट इंडस्ट्रीज’ आल्या असे त्या काळात म्हटले जायचे. परंतु अनिलच्या कंपन्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. रिलायन्स पॉवरबद्दल बोलायलाच नको एवढा फटका गुंतवणूकदारांना बसला. ४५० रुपयांचा शेअर आपल्याला मिळाला की आपण ९०० रुपयाला विकू, असा विचार करणाऱ्या भाबड्या गुंतवणूकदारांनी तो ९०० रुपयाला का आणि कोण घेणार याचा विचार केला नाही, असो!
या काळात कस लागतो तो कौटुंबिक संबंधाचा. मोठा भाऊ म्हणून मुकेशने प्रचंड संयम दाखविला. वर्तमानपत्रात उगाचच मोठमोठ्या जाहिराती दिल्या नाहीत. दोघांमध्ये, ते एकमेकांच्या व्यवसायात शिरकाव करणार नाहीत, यासाठी केला गेलेला ५ वर्षांचा करार कालावधी पूर्ण होऊ दिला आणि मार्च २०११ मध्ये डीई शॉ समूहाशी हातमिळवणी केली. पुढे तपभराने, म्हणजे २०२३ मध्ये काय करायचे याचे पूर्वनियोजन त्यांनी त्यावेळीच केलेले होते, हे आता आपल्याला लक्षात येते.
हेही वाचा – बाजार-रंग : भेटीगाठी, व्यापार आणि ऊर्जेची ऊब!
बाजारात कंपन्यांचा अभ्यास करताना फक्त ताळेबंदाचा अभ्यास महत्त्वाचा नसतो, तर कंपन्यांचे ताळेबंद ज्यांच्या कर्तृत्वामुळे बनतात किंवा बिघडतात त्या कंपन्या चालविणाऱ्या व्यक्तींचासुद्धा अभ्यास करावा लागतो. प्रत्येकी १,२५७ रुपये किमतीला तीन वर्षांपूर्वी रिलायन्सच्या हक्कभागांची (राइट्स शेअर्स) विक्री जेव्हा झाली, तेव्हा अनेकाचे अंदाज चुकले. करोनामुळे प्रतिसाद मिळणार नाही, शेअर्सचा भाव नंतर ७५० रुपयांपर्यंत खाली येईल असा विचार करून हक्कभाग विक्रीसाठी अर्ज न करता, त्यापासून दूर धुरंधर आसपासही होते. त्यांना आता नव्या कंपनीचे शेअर्स दर्शनी किमतीत मिळणार नाहीत आणि आपण या मुकेश अंबानी यांनी दिलेल्या भेटीचा स्वीकार केला नाही याचे आता त्यांना दु:ख होत असेल.
(लेखाचा उत्तरार्ध पुढील सोमवारी)