मुंबई शेअर बाजार अर्थात यालाच भांडवली बाजारात बीएसई लिमिटेड नावानेदेखील ओळखले जाते. आधी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे नाव अधिक लोकप्रिय होते. १८५५ मध्ये मुंबईत एका वडाच्या झाडाखाली त्याची स्थापना झाली. प्रेमचंद रॉयचंद यांनी आपल्या चार मित्रांना सोबत घेऊन भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या बाजार मंचाची (स्टॉक एक्सचेंज) स्थापना केली. हळूहळू व्याप वाढल्यावर १८७५ मध्ये त्याचे एका संघटनेत किंवा कंपनीत रूपांतर झाले आणि त्याचे नाव होते ”द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन” झाले आणि नंतर त्याचे नाव झाले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात बीएससी लिमिटेड नावाने कंपनीचा समभाग सूचिबद्ध आहे.
आजच्या घडीला सुमारे ५,५०० कंपन्यांचे समभाग सूचिबद्ध आहेत. म्हणजे त्या वडाच्या झाडाचा आता वटवृक्ष झाला आहे. शिवाय, १३ फेब्रुवारी २०१७ मध्ये बीएसई लिमिटेड कंपनीचा समभाग राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईमध्ये सूचिबद्ध झाला आहे. बीएसई ही सरकारी कंपनी आहे असा बऱ्याच लोकांचा समज आहे, पण तसे नसून तिचे वेगवेगळे भागधारक आहेत. सरकार त्याचा हिस्सा आहे पण अप्रत्यक्षपणे जसे की, सरकारी मालकीच्या बँका किंवा इतर कंपन्या असलेल्या स्टेट बँक किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांची त्यात हिस्सेदारी आहे. बीएसई लिमिटेडचा समभाग शुक्रवारच्या सत्रात ६०८.५५ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. अर्थात ते विकत घ्यायचे किंवा नाही हे अर्थवृतान्तमधील इतर सदरातून आपल्याला समजेलच.
स्टॉक एक्सचेंज म्हणजे समभाग खरेदी आणि विक्रीचे ठिकाण, जे पूर्वी प्रत्यक्षपणे खरेदी किंवा विक्री व्हायची ज्याला खूप वेळ लागायचा आणि आता घरबसल्या डिमॅट खात्याच्या माध्यमातून होते. हल्ली तर ६ मायक्रोसेकंदात समभागांची खरेदी किंवा विक्री होते. स्टॉक एक्सचेंजशी संबंधित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा निर्देशांक. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा त्यावर कसा परिणाम झाला हे विश्लेषक बघतात. अर्थात हा तात्पुरता किंवा फार काही त्याचा द्योतक असेलच असे नाही, पण तरीही मोठ्या कालावधीमध्ये निश्चितच त्याचा परिणाम जाणवतो. बीएसईचा निर्देशांक २ जानेवारी १९८६ रोजी सुरू झाला. ज्याचा आधार १९७८-७९ चा होता. त्यावेळेला सुमारे ५६० अंशांवर असणारा निर्देशांक आज सुमारे ६३,२०० अंशांच्या पातळीवर आहे. ही मोठ्या कालावधीतील वाढ देशाच्या आर्थिक सुदृढतेचे द्योतकच आहे, असे मानता येईल. या निर्देशांकात आघाडीच्या ३० कंपन्यांचा समावेश आहे आणि त्या अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसाय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. जसे की, औषधे, रंग, माहिती तंत्रज्ञान, बँक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. करोना या महाभयंकर महासाथीचा जगभर संसर्ग झाल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम भांडवली बाजारावर उमटले. त्यामुळे २३ मार्च २०२० रोजी निर्देशांकात सगळ्यात मोठी पडझड नोंदवली गेली जी सुमारे ३,९३४ अंशांची होती आणि ७ एप्रिल २०२० ला सावरून त्यात २,४७६ अंशांची भर पडली. विश्वसनीयता हेच भांडवल घेऊन उभा राहिलेला हा स्टॉक एक्सचेंज गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. मुंबई शहराला आर्थिक राजधानीचा दर्जा देण्यात बीएसईचा सिंहाचा वाटा आहे.