Share Market Crash : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं चित्र निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने २३ एप्रिल रोजी भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत देत आणखी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढले असून याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचंही पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजारात सुमारे १००० अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे सलग सात दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आहे.
भारतीय शेअर बाजारात गेले सात दिवस तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, आज शुक्रवारी (२५ एप्रिल) शेअर बाजाराच्या सलग सात दिवसांच्या तेजीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार निफ्टी २४,००० च्या खाली घसरला आहे, तर सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच बँकिंग शेअर्स आणि व्यापक बाजारपेठांमध्येही घसरण झाली आहे. सकाळी १०:०६ वाजेच्या सुमारास सेन्सेक्स ८८१.४९ अंकांनी किंवा १.१० टक्क्यांनी घसरून ७८,९१९.९४ वर आणि निफ्टी २८५.०५ अंकांनी घसरून किंवा १.१८ टक्क्यांनी घसरून २३,९६१.६५ वर बंद झाला.
तसेच ४३६ शेअर्स वधारल्याचंही पाहायला मिळालं, तर २७०२ शेअर्स घसरले आणि १०१ शेअर्स स्थिर राहिले. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक २.५ टक्क्यांनी घसरला. तसेच सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. तसेच बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि निफ्टी पीएसयू बँक यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी रोजी झालेल्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ७.५ लाख कोटींचा फटका बसला. या संदर्भातील वृत्त मनीकंट्रोलने दिलं आहे.
दरम्यान, मागील सत्रात निफ्टी ५० निर्देशांकाने एप्रिल मालिकेचा शेवट ६५५ अंकांच्या मजबूत वाढीसह राहिला. जो नीचांकी पातळीपासून २,५०० अंकांनी वाढला. तसेच मे महिन्याची मालिका शुक्रवारी सुरू होत आहे. ज्यामध्ये १,१५० कोटी शेअर्सचा ओपन इंटरेस्ट आहे, जो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १,१४५ कोटी शेअर्स होता.