मुंबई : मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी मागील वर्षी २१२ नवीन फंड प्रस्तुतींच्या (NFO) माध्यमातून तब्बल ६३ हजार ८५४ कोटी रुपयांची गुंतवणूक सरलेल्या २०२३ या वर्षभराच्या कालावधीत मिळवली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत या गुंतवणुकीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी २०२२ मध्ये २२८ ‘एनएफओ’च्या माध्यमातून ६२ हजार १८७ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली होती. त्याआधी २०२० मध्ये ही गुंतवणूक ५३ हजार ७०३ कोटी रुपये आणि २०२१ मध्ये ती सर्वाधिक ९९ हजार ७०४ कोटी रुपये होती.

हेही वाचा >>> सेन्सेक्स १२४० अंकांनी वधारला अन् ७१,९४१ वर बंद झाला, निफ्टीमध्ये ३८५ अंकांची उसळी

२०२३ या सरलेल्या वर्षी २१२ नवीन फंड ऑफरच्या माध्यमातून ६३ हजार ८५४ कोटी रुपयांचा ओघ आला आहे, असे ‘मॉर्निंगस्टार इंडिया’ने संकलित केलेली आकडेवारी सांगते. याबाबत ‘फायर्स रिसर्च’नेही अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, देशातील गुंतवणूक पद्धतीत बदल होत ती अधिकाधिक वित्तीय मालमत्तेकडे आकर्षित होताना दिसत आहे. क्रयशक्तीमध्ये झालेला बदल आणि जीवनमानाचा दर्जा उंचाविण्याची गरज यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व जाणले आहे. करोना संकटामुळे सर्वांनाच वित्तीय नियोजनाची गरज लक्षात आली आहे. अडचणीच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून मालमत्तेची निर्मिती करण्यावर भर दिला जात असून, त्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने गुंतवणूकदारांची वाटचाल सुरू आहे.

जोखीम घेण्याच्या क्षमतेत वाढ

मागील वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वाधिक ५७ नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक २२ हजार ४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे. याचबरोबर विविध उत्पादनांबाबत जागरूकता निर्माण झाल्याने किरकोळ गुंतवणूकदार जास्त जोखीम असलेल्या थीमॅटिक आणि सेक्टोरल फंडांकडे वळत आहेत. मागील वर्षी थीमॅटिक अथवा सेक्टोरल फंडांमध्ये १७ हजार ९४६ कोटी रुपयांचा ओघ दिसून आला, असे ‘फायर्स रिसर्च’च्या अहवालात म्हटले आहे.