सुमारे ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मुथूट माइक्रोफिन लिमिटेड ही मुथूट पापचन समूहाची प्रमुख उपकंपनी आहे. मुथूट पापचन हा आर्थिक सेवा, ऑटोमोटिव्ह, गृह निर्माण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, मौल्यवान धातू आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रांमध्ये उपस्थिती असलेला एक व्यावसायिक समूह आहे. या अंतर्गत समूहातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. भारतातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून महिला ग्राहकांना सूक्ष्म-कर्ज प्रदान करणे कंपनीचा प्रमुख व्यवसाय आणि उद्देश आहे. मुथूट मायक्रोफिन ही एकूण कर्ज वाटपाच्या बाबतीत भारतातील पाचव्या क्रमांकाची सूक्ष्म वित्त अर्थात मायक्रो फायनान्स कंपनी आहे. कंपनी दक्षिण भारतातील आघाडीची मायक्रो फायनान्स कंपनी असून एकूण कर्ज वाटपाच्या बाबतीत, केरळमधील सर्वात मोठी आणि तमिळनाडूमध्ये १६ टक्के बाजार हिस्सा असलेली महत्त्वाची कंपनी आहे.
कंपनीच्या कर्ज वितरणात प्रामुख्याने पुढील कर्ज साहाय्याचा समावेश होतो:
उपजीविकेच्या उपायांसाठी समूह कर्जे उदा. उत्पन्न देणारी कर्जे, प्रगती कर्जे आणि वैयक्तिक कर्ज. मोबाइल, सौर दिवे आणि घरगुती उपकरणांसाठी कर्जासह राहणीमान उंचावण्याचे उपाय. आरोग्य आणि स्वच्छतासंबधी (स्वच्छताविषयक सुविधा सुधारण्यासाठी) कर्ज. सुवर्ण कर्ज आणि मुथूट स्मॉल अँड ग्रोइंग बिझनेस (एमएसजीबी) कर्जाच्या स्वरुपात सुरक्षित कर्जे.
हेही वाचा – शेअर बाजारातील तेजीला पूर्णविराम की तूर्त स्वल्पविराम?
३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, कंपनीचे ३२ लाख सक्रिय ग्राहक असून, कंपनी आज भारतातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३३९ जिल्ह्यांमधील १,३४० शाखांमध्ये विस्तारली आहे. कंपनीने डिजिटल कलेक्शन इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करण्यासाठी, “महिला मित्र” नावाचे एक ॲप्लिकेशन सुरू केले आहे, जे क्यूआर कोड, संकेतस्थळ, एसएमएस आधारित लिंक्स आणि व्हॉइस-आधारित डिजिटल देयक पद्धती सुलभ करते. तसेच कंपनीने आपल्या सुमारे ४६० शाखांमध्ये डिजिटल हेल्थकेअर सुविधा हे ई-क्लिनिक रचना उभी केली आहे.
यंदाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत कंपनीचे एकूण कर्ज वितरण सुमारे १०,८६७ कोटी रुपये राहिले आहे. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू या त्यांच्या प्रमुख राज्यांमध्ये त्यांचा एकूण कर्ज पोर्टफोलिओ एकत्रितपणे त्यांच्या एकूण कर्जाच्या ५१.३६ टक्के होता. आता कंपनी उत्तर भारतावर लक्ष केंद्रित करत असून अलीकडच्या वर्षांत मुथूटच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात ७०७ शाखा आहेत. आगामी कालावधीतही कंपनीचा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि पंजाब या महत्त्वाच्या राज्यांमध्ये शाखा वाढवण्याचा मानस आहे.
गेल्याच महिन्यात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (आयपीओ) कंपनीने प्रतिसमभाग २९१ रुपयांनी समभागांची विक्री केली होती. सध्या हा शेअर आयपीओ किमतीपेक्षा कमी भावात उपलब्ध आहे. कंपनीचे डिसेंबर २०२३ साठीच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले की, तो अभ्यासून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
मुथूट माइक्रोफिन लिमिटेड (बीएसई कोड ५४४०५५)
प्रवर्तक: मुथूट पापचन समूह
बाजारभाव: रु. २३१/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: सूक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स)
भरणा झालेले भाग भांडवल: रु.१७०.४९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५५.४७
परदेशी गुंतवणूकदार २९.०४
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ३.१७
इतर/ जनता १२.३२
पुस्तकी मूल्य: रु. १७८
दर्शनी मूल्य: रु.१०/-
लाभांश:– %
प्रति समभाग उत्पन्न: रु. २०.९२
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२.४
ढोबळ/ नक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाण: २.३७ /०.३३
कॅपिटल ॲडीक्वसी गुणोत्तर: २०.५%
नेट इंट्रेस्ट मार्जिन: १२.३ %
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): ११.२३
बीटा : १
बाजार भांडवल: रु. ३९३८ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २८१/२४०
गुंतवणूक कालावधी : १२-१८ महिने
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.