डेटा पॅटर्न्स (इंडिया) लिमिटेड (बीएसई कोड ५४३४२८)
प्रवर्तक : श्रीनिवासागोपालन रंगराजन
बाजारभाव: रु. १,६६७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : इलेक्ट्रॉनिक्स/ संरक्षण क्षेत्र
भरणा झालेले भागभांडवल : रु. १०.३८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ४५.७६
परदेशी गुंतवणूकदार २.३०बँक्स/ म्युच्युअल फंड्स/ सरकार ७.९०
इतर/ जनता ४४.०४पुस्तकी मूल्य: रु. ११४
दर्शनी मूल्य: रु. २/- गतवर्षीचा लाभांश: १७५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २५.१ किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७१.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड: ३३.४ डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २२ बीटा: १ बाजार भांडवल: रु. ९,३३४ कोटी (स्मॉल कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,५४० / ६०८
वर्ष १९९८ मध्ये स्थापन झालेली चेन्नईतील डेटा पॅटर्न (इंडिया) ही भारतातील एक संरक्षण आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स कंपनी असून ती स्वदेशी विकसित संरक्षण उत्पादने उद्योगासाठी तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. डेटा पॅटर्न संपूर्ण संरक्षण स्पेक्ट्रम आणि एरोस्पेस प्लॅटफॉर्म म्हणजे अंतराळ, जमीन आणि समुद्र यांना व्यापणाऱ्या क्षेत्राच्या तंत्रज्ञान विकसनांत कार्यप्रवण आहे. यात प्रोसेसर, पॉवर, रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि मायक्रोवेव्ह उपकरणे, एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसह रणनीतिक एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्सच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये डिझाइन क्षमता यांचा समावेश आहे.
उत्पादन पोर्टफोलिओ: रडार, अंडरवॉटर इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन्स/ इतर सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, ब्रह्मोस प्रोग्राम, एव्हीओनिक्स, छोटे उपग्रह, संरक्षण आणि एरोस्पेस सिस्टीमसाठी एटीई, कमर्शियल ऑफ-द-शेल्फ (कॉट्स) इ. कंपनीच्या उत्पादनांत समावेश होतो. कंपनी सध्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए), लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयूएच) आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र कार्यक्रम, अचूक दृष्टिकोन रडार आणि विविध संप्रेषणांसह भारतातील अनेक प्रतिष्ठित संरक्षण प्रकल्पांना महत्त्वपूर्ण उत्पादनांचा पुरवठा करते.
हेही वाचा – जिऱ्याला हिऱ्याची झळाळी, ४०,००० रुपयांचे शिखर सर
डेटा पॅटर्न ही भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीकडे सुमारे ८८८ कोटी रुपयांच्या ऑर्डर प्रलंबित होत्या.
कंपनीचा व्यवसाय मुख्यत्वे सरकारद्वारे हाती घेतलेले प्रकल्प आणि कार्यक्रम तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण आणि अवकाश संशोधन उपक्रम आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रासारख्या भारतातील प्रतिष्ठित संरक्षण प्रकल्पांना उत्पादनांचा पुरवठा यांसारख्या सरकारी संस्थांवर अवलंबून आहे.
डेटा पॅटर्नने गेल्या पाच वर्षांत सातत्याने भरीव महसूल वाढ केली आहे. डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ११२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३.३ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल २७२ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने नुकताच १,२८५ रुपये प्रति शेअर दराने सुमारे ५०० कोटींचा निधी क्यूआयपीद्वारे अर्थात संस्थागत गुंतवणूकदारांमार्फत उभा केला. याचा उपयोग खेळते भांडवल, नवीन उत्पादने तसेच कर्जफेडीसाठी कंपनीकडून करण्यात येणार आहे.
हेही वाचा – बाजारातील माणसं : मुकेश अंबानी.. विलीनीकरणातून विलगीकरणाकडे
जागतिक भू-राजकीय परिस्थिती आणि तांत्रिक प्रगतीमुळे पुढील काही वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण उद्योगांमध्ये लक्षणीय वाढ आणि गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. अनुभवी आणि सक्षम व्यवस्थापन असलेली डेटा पॅटर्न्स उच्च स्पर्धात्मक उद्योगात कार्यरत असून प्रतिस्पर्धी कंपन्यांचा बाजार हिस्सा ती मिळवू पाहत आहे. गुणवत्ता आणि नावीन्य यावर लक्ष केंद्रित करून कंपनीने आपली स्पर्धात्मक धार कायम ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत डेटा पॅटर्नचा शेअर जवळपास २० टक्क्यांनी वर गेला आहे. सध्या नव्या उच्चांकावर असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही प्रत्येक मंदीत जरूर खरेदी करावा.
** गेल्या वर्षी जून महिन्यात डेटा पॅटर्न्स (इंडिया) लिमिटेड याच स्तंभातून ७०७ रुपयांना सुचविला होता. ज्या वाचक गुंतवणूकदारांनी तो अजून ठेवला असेल त्यांची गुंतवणूक दुपटीहून अधिक झाली आहे. मात्र हा शेअर अजूनही राखून ठेवावा.**
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
(stocksandwealth@gmail.com)
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
…………………..