‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर म्हणजे ‘खरेदीची टीप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचविलेल्या शेअरचादेखील विचार करावा; परंतु तो स्वतः अभ्यासून, असा यामागे विचार आहे. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचविलेले शेअर खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी निवडीचे निकष म्हणून दिलेल्या गुणोत्तरांखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी पोर्टफोलियो म्हणजे काय? तो कसा करावा, शेअर कसे निवडावेत किंवा शेअर निवडताना इतर कुठले निकष लावावेत असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोर्टफोलियो मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने पोर्टफोलियोसाठी शेअर निवडताना कंपन्यांचे ‘फंडामेंटल अनॅलिसिस’ करून मगच निर्णय घ्यावा लागतो. तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल अनॅलिसिस) हे मुख्यत्वे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उपयोगी पडते. कंपन्यांचे ‘फंडामेंटल अनॅलिसिस’ करताना अनेक सूत्रे तसेच गुणोत्तरांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये कंपनीच्या आतापर्यंतच्या कामगिरीखेरीज बदलत्या परिस्थितिनुसार पुढील कामगिरी कशी असेल याचाही अंदाज घ्यावा लागतो. ‘माझा पोर्टफोलियो’ या सदरात काही महत्त्वाची गुणोत्तरे सादर केली जातात, मात्र आपण इतरही काही महत्त्वाची गुणोत्तरे अभ्यासणार आहोत.

हेही वाचा – बाजारातील माणसं : के व्ही कामथ…संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग

मागच्या आठवड्यात आपण पुस्तकी मूल्य, किंमत पुस्तकी मूल्य-गुणोत्तर आणि प्रतिसमभाग उत्पन्न ही गुणोत्तरे अभ्यासली होती. आता पुढील काही महत्त्वाची गुणोत्तरे अभ्यासू:

प्राइस अर्निंग गुणोत्तर (पीई रेशो)

पीई गुणोत्तर: शेअरचा बाजार भाव/ प्रति समभाग उत्पन्न (market price/ EPS)

प्राइस अर्निंग गुणोत्तर हे गुणोत्तरांच्या श्रेणीतील सर्वाधिक वापरलेले आणि महत्त्वाचे गुणोत्तर आहे. या गुणोत्तरामुळे शेअर त्यांच्या कमाईच्या क्षमतेच्या तुलनेत महाग आहेत की स्वस्त आहेत हे कळते. कंपनीने आर्थिक कालावधीसाठी प्रति-समभाग आधारावर नोंदवलेल्या कमाईच्या (ईपीएस) तुलनेत वर्तमानकाळातील शेअरची किंमत म्हणून हे मोजले जाते. ज्या शेअरचा पीई जास्त तो शेअर महाग आणि ज्याचा पीई कमी तो स्वस्त असे हे गणित आहे. अर्थात पीई गुणोत्तराची तुलना त्याच क्षेत्रातील कंपन्यांशी करायला हवी, कारण प्रत्येक क्षेत्राचे सरासरी पीई गुणोत्तर वेगळे असते.

व्यवसायात कोणताही बदल न झाल्यास तुमच्या गुंतवणुकीची परतफेड करण्यासाठी शेअर किती वेळ लागेल याचा पीई गुणोत्तरात विचार केला जाऊ शकतो. प्रति शेअर २ रुपयांच्या कमाईस २० रुपये बाजारभाव असलेल्या शेअरचे पीई गुणोत्तर १० येईल, याचा अर्थ असा होतो की काहीही बदलले नाही तर तुमची गुंतवणूक १० वर्षांत वसूल होतील.

आता काही कंपन्यांचे प्राइस अर्निंग गुणोत्तर इतके जास्त का असते असा साहजिक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर जेंव्हा एखाद्या कंपनीची पुढील वर्षातील कामगिरी उत्तम असेल अशी अपेक्षा असते तेव्हा त्या कंपनीचा शेअर तेजीत येईल या अपेक्षेने त्याची खरेदी होते. साहजिकच वाढत्या मागणीमुळे भाव वाढतो आणि अर्थात त्याचा परिणाम वर्तमान काळातील पीई वाढण्यात होतो. तसेच कंपनीकडून चांगली कामगिरी अपेक्षित नसल्यास भाव खाली येतो. वर्तमानकाळातील कामगिरीशी हा पीई सुसंगत नसतो आणि भवितव्यातील अपेक्षित कामगिरीनुसार असतो. याला फॉरवर्ड पीई म्हणतात. फॉरवर्ड पीई शक्यतो एक वर्षापर्यंत गृहीत धरतात. पुढील १२ महिन्यांत प्रति शेअर अंदाजित कमाईनुसार प्रति शेअर किंमत विभाजित करून त्याची गणना केली जाते. ग्रोथ शेअर शक्यतो फॉरवर्ड पीईनुसार खरेदी केले जातात.

प्राइस अर्निंग ग्रोथ गुणोत्तर (पीईजी रेशो):

प्राइस अर्निंग गुणोत्तराबरोबरच हे गुणोत्तरही महत्त्वाचे आहे. या गुणोत्तरामुळे कंपनीची प्रगती आणि वाढीचा वेग (ग्रोथ) समजू शकतो. हे गुणोत्तर काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात :

प्राइस अर्निंग गुणोत्तर/ कमाईमध्ये अंदाजित वाढ
उदाहरणार्थ, २० चा पीई असलेला स्टॉक आणि पुढील वर्षी १० टक्क्यांच्या अंदाजित कमाई वाढीचे पीईजी गुणोत्तर

२०/१०= २ असेल.

तांत्रिकदृष्ट्या सांगायचे तर, पीईजी प्रमाण = १ असल्यास, याचा अर्थ आजच्या किमतींवरील समभागाचे मूल्य योग्य आहे. पीईजी गुणोत्तर >; १ असल्यास, हे सूचित करते की शेअरचे बाजारमूल्य जास्त आहे. पीईजी गुणोत्तर < १, हे सूचित करते की शेअरचे बाजारमूल्य कमी आहे.

हेही वाचा – ‘माझा पोर्टफोलियो’चा पहिला त्रैमासिक आढावा

कर्ज ते इक्विटी गुणोत्तर ( डेट-इक्विटी रेशो) :

दीर्घकालीन कर्ज/भरणा झालेले इक्विटी शेअर भांडवल, हे शक्यतो शून्य किंवा एकपेक्षा कमी असावे. उच्च कर्ज इक्विटी गुणोत्तर दर्शविते की, कंपनीकडे मोठ्या प्रमाणात कर्जे आहेत आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत येण्याचा धोका अधिक आहे. डेट-इक्विटी रेशो हे आजच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचे आहे. कारण या गुणोत्तराचा व्याज कव्हरेज रेशोवर आणि त्यामुळे निव्वळ कमाईवर परिणाम होतो. आर्थिक मंदीच्या काळात कुठल्याही व्यवसायाला सर्वाधिक फटका बसतो, कारण कमी नफा असूनही कंपन्यांना सातत्याने व्याज खर्च भरावा लागतो. १ पेक्षा जास्त कर्ज ते इक्विटी गुणोत्तर उच्च-जोखीम दर्शवते. अर्थात कंपनी कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यावरही हे गुणोत्तर अवलंबून असते. बँकिंग किंवा वित्तीय कंपन्यांना हा नियम लागू नाही, तसेच पायाभूत सुविधा, बांधकाम आणि जहाज/ हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये हे गुणोत्तर एकपेक्षा अधिक असू शकते.

  • अजय वाळिंबे
    Stocksandwealth@gmail.com
मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My portfolio how to select shares for portfolio ssb
Show comments