अजय वाळिंबे
चेन्नईस्थित अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी असून, ती देशांतर्गत मध्यम आणि अवजड वाणिज्य वाहन उत्पादनात दीर्घकाळ आहे. कंपनीचे नाव “अशोक लेलँड’ ही कंपनीची एक दमदार नाममुद्रा असून कंपनीचे देशभरात वितरण आणि सेवा जाळे उभे केले आहे. कंपनीचे भारताखेरीज ५०हून अधिक देशांमध्ये अस्तित्व असल्याने अशोक लेलँड एक जागतिक पातळीवर वाणिज्य वापराच्या वाहन निर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. कंपनी मध्यम आणि अवजड वाणिज्य वाहनांच्या विभागात भारतातील वाणिज्य वाहनांची दुसरी सर्वात मोठी उत्पादक, जगातील आठव्या क्रमांकाची बस उत्पादक आणि जागतिक स्तरावर ट्रक निर्मिती करणारी पंधरावी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनी संपूर्ण भारतातील ड्रायव्हर प्रशिक्षण संस्थांचे व्यवस्थापन करते, स्थापनेपासून त्यांनी अठरा लाखांहून जास्त चालकांना प्रशिक्षण दिले आहे. कंपनीचे भारतामध्ये ७ उत्पादन प्रकल्प असून श्रीलंका, बांगलादेश तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील उत्पादन प्रकल्प आहेत.
कंपनीची ट्रक विभागातील विक्री (संरक्षण वाहने वगळून) मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या दोन वर्षांत कंपनीने ईकॉमर्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरी ऍप्लिकेशन्समधील पर्यायी इंधनाच्या मागणीला चालना देण्यासाठी ट्रक विभागातील सीएनजी मॉडेल्ससह त्याचे उत्पादन पोर्टफोलिओ वाढवले आहे. उच्च हॉर्सपॉवर मायनिंग टिपर आणि सरफेस टिपर यांसारख्या उत्पादनातील सुधारणांनी कंपनीला बांधकाम आणि खाण उद्योगात आपली उपस्थिती मजबूत करण्यास मदत केली आहे. बस आणि ट्रक विभागामध्ये कंपनीचा २७ टक्के बाजार हिस्सा आहे.
संरक्षण क्षेत्रासाठी कंपनी बुलेटप्रूफ वाहने आणि किट्ससह पूर्णपणे बिल्ट-अप युनिट्सचा पुरवठा करते. भारतीय सैन्याच्या आपत्कालीन खरेदीअंतर्गत विक्रमी वेळेत ७००हून अधिक रुग्णवाहिकांची मागणी पूर्ण केली. कंपनी सध्या हलकी वाहने, सुपर स्टॅलियन प्लॅटफॉर्मवरील नवीन ऍप्लिकेशन्स आणि निर्यात बाजारासाठी विशिष्ट उत्पादनांमध्ये आपला पोर्टफोलिओ वाढवत आहे.
व्यावसायिक वाहन उद्योगात, अशोक लेलँडकडे ५२,८६३ टच पॉइंट्स असलेले सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारे वितरण आणि सेवा जाळे आहे. ज्यात १,७४८ एक्सक्लुझिव्ह टच पॉइंट्स आणि लेपार्ट्ससाठी ११,२०७ आउटलेट समाविष्ट आहेत. कंपनीकडे आता सर्व प्रमुख महामार्गांवर दर ७५ किलोमीटर अंतरावर एक सेवा केंद्र आहे, ज्यामुळे ग्राहकांना ४ तासांच्या आत पोहोचण्याचे आणि त्यांना ४८ तासांत पुन्हा रस्त्यावर आणण्याचे “अशोक लेलँड क्विक रिस्पॉन्स” वचन पाळता येते.” कंपनीचा फाऊंड्री विभाग मुख्यत्वे सिलेंडर ब्लॉक, हेड आणि ट्रॅक्टर हाऊसिंगच्या उत्पादन विभागांमध्ये ऑटोमोटिव्ह उद्योगाची पूर्तता करतो.
अशोक लेलँडच्या उपकंपनी स्विच मोबिलिटीने अभियांत्रिकी कौशल्य, उत्कृष्ट नवकल्पक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित केले आहे आणि जागतिक स्तरावर अतुलनीय उत्पादनाची निवड दिली आहे, ज्याचा उद्देश शून्य कार्बन उत्सर्जन वाहतुकीकडे वळविण्याचा आहे. मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या उलाढालीत तब्बल ५९ टक्के वाढ होऊन ती ४१,६७३ कोटींवर पोहोचली आहे. तर गेल्या वर्षी तोट्यात असलेल्या या कंपनीने यंदा १,२१५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. मार्च २०२३ अखेरच सरलेल्या तिमाहीचे आर्थिक निकालही गेल्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने १३,२०३ कोटी (३३ टक्के वाढ) रुपयांच्या उलाढालीवर ७१७ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळविला आहे. तो गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १५५ टक्क्यांनी अधिक आहे.
कंपनीची संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच अर्थसंकल्पात जाहीर झालेले व्हेईकल स्क्रॅप धोरण, अनुभवी प्रवर्तक आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड यामुळे आगामी कालावधीत देखील कंपनी उत्तम कामगिरीचा आलेख कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. कंपनी आपला कर्जबोजा देखील कमी करेल अशी अपेक्षा आहे. सध्या १४५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटतो. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्यप्प्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
माझा पोर्टफोलियो
अशोक लेलँड लिमिटेड (बीएसई कोड ५००४७७)
प्रवर्तक: हिंदुजा समूह
बाजारभाव: रु. १४६ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: वाणिज्य वाहने
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २९३.६१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५१.५३
परदेशी गुंतवणूकदार १४.८५
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २२.२२
इतर/ जनता ११.४०
पुस्तकी मूल्य: रु.२९.१० /-
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: १०० %
प्रति समभाग उत्पन्न: रु. ४.२३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३५.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७९.१
डेट इक्विटी गुणोत्तर: ३.६४
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २.०६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई):१२.१
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. ४२९५१ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १६९/१२६
Stocksandwealth@gmail.com