अजय वाळिंबे
टारसन्स प्रॉडक्ट्स लिमिटेड (बीएसई कोड ५४३३९९)
प्रवर्तक : संजीव सेहगल
बाजारभाव : रु. ७३०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : लॅबवेअर, वैद्यकीय उपकरणे
भरणा झालेले भागभांडवल : रु. १०.६४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४७.३१
परदेशी गुंतवणूकदार ९.९०
बँक/ म्यु. फंड/ सरकार ८.१३
इतर/ जनता १४.६६
पुस्तकी मूल्य : रु. १०० /-
दर्शनी मूल्य : रु.२/-
लाभांश : –%
प्रति समभाग उत्पन्न : रु. १७.४२
पी/ई गुणोत्तर : ४१.८
समग्र पी/ई गुणोत्तर : २६.३
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.१२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४२.५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ३५.३
बीटा : ०.७
बाजार भांडवल : रु. ३,८७९ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : ९१४/५३९
गेल्याच वर्षात ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली टारसन्स प्रॉडक्ट्स लिमिटेड ही प्रयोग शाळेतील उपकरणे उत्पादित करणारी कंपनी वाचकांना माहिती असेल. टारसन्स प्रॉडक्ट्स लिमिटेड ही एक नामांकित लॅबवेअर कंपनी असून ती संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, विविध प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेंच-टॉप उपकरणांसह ‘उपभोग्य वस्तू’, ‘पुन: वापरण्यायोग्य’ यांच्या डिझाईनिंग, विकास, उत्पादन आणि विपणनामध्ये कार्यरत आहे. कंपनीची उत्पादने मुख्यत्वे फार्मास्युटिकल कंपन्या, कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन, डायग्नोस्टिक कंपन्या आणि हॉस्पिटल्स इ. व्यवसायात वापरली जातात. ३६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली टारसन्स ही भारतातील पहिल्या तीन लॅबवेअर उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे आणि भारतातील लॅबवेअर मार्केटमध्ये तिचा बाजारहिस्सा जवळपास १२ टक्के आहे.कंपनीचा वैविध्यपूर्ण ३००हून अधिक उत्पादन पोर्टफोलिओ असून त्यात पिपेट टिप्स, पेट्री डिश, सेंट्रीफ्यूज ट्यूब्स, क्रायोव्हियल्स, ट्रान्सफर पिपेट्स, बाटल्या, कारबॉय, मोजण्याचे सिलिंडर, डेसिकेटर्स, मिनी कूलर, क्रायोबॉक्स आणि टेस्ट ट्यूब रॅक इ. चा समावेश होतो.
यांतील काही उत्पादने उदा. बाटल्या, कारबॉय, बीकर, मोजण्याचे सिलिंडर आणि ट्यूब रॅक पुन्हा वापरता येण्याजोगे असल्या तरीही ‘यूज अँड थ्रो’ श्रेणीत सेंट्रीफ्यूज वेअर, क्रायोजेनिक वेअर, लिक्विड हाताळणी, पीसीआर उपभोग्य वस्तू आणि पेट्री डिश, ट्रान्सफर पिपेट्स इ. उत्पादंनांचा समावेश होतो. या वस्तूंचा कंपनीच्या एकूण महसुलात जवळपास ६२ टक्के वाटा असून त्यामुळे कंपनीसाठी नियमित व्यवसाय होतो.
कंपनीचे पाच उत्पादन प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये असून एकूण उत्पादन महसुलातील ८६.३२ टक्के हिस्सा तिच्या धुलागढ आणि जंगलपूर येथील उत्पादन युनिट्सने दिला आहे. कंपनीच्या उत्पादन सुविधा आधुनिक स्वयंचलित समर्थन प्रणालींनी सुसज्ज असल्याने कंपनीला गुणवत्ता राखण्यात, उत्पादकता वाढविण्यात आणि खर्च कमी करण्यात मदत करतात.टारसन्स विविध क्षेत्रांतील ग्राहकांच्या विविध श्रेणींची पूर्तता करते ज्यात संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, फार्मास्युटिकल कंपन्या, निदान कंपन्या आणि रुग्णालये यांचा समावेश होतो. कंपंनीच्या ग्राहकांमध्ये सिन्जेन इंटरनॅशनल, एनझेन बायो-सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मेट्रोपोलीस लॅब, लाल पॅथ लॅब, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज इ. नामांकित ग्राहकांचा समावेश होतो. कंपनी आपल्या वितरकांमार्फत संपूर्ण भारतात आपल्या उत्पादनांचे वितरण करते. कंपनीकडे १८६ सक्रिय वितरकांचे विक्री आणि वितरण नेटवर्क आहे, ज्यामध्ये देशांतर्गत बाजारात १४१ सक्रिय वितरक आणि विदेशी बाजारपेठेतील ४५ वितरकांचा समावेश आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले असून विकसित आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील ४०हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने ती निर्यात करते.
कंपनीची दुसऱ्या तिमाहीची कामगिरी फारशी चांगली नाही. कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत ७१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ७६ कोटी), ६.३ टक्क्यांच्या घसरणीसह २१.४६ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत २५ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. मात्र भारतीय बाजारपेठेतील वाढत्या लॅब्स, रुग्णालये आणि कंपनीने बाजारात आणलेली नवीन उत्पादन श्रेणी याची सकारात्मक फळे आगामी कालावधीत दिसू लागतील. त्यामुळे यंदा तसेच २०२३-२४ मध्ये कंपनीची प्रगतीची घोडदौड वाढेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रॅंड आणि विस्तृत उत्पादन श्रेणी असलेली टारसन्स एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते.
सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
stocksandwealth@gmail.com