अजय वाळिंबे

‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचवले जातात. हे सुचवलेले शेअर्स म्हणजे खरेदीची ‘टीप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचवलेल्या शेअरचादेखील विचार करावा. परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचवलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी पोर्टफोलियो म्हणजे काय? तो कसा करावा, शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत? असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आजवर मिळवत आहोत.

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

हेही वाचा >>> बाजारातील माणसं : संकटहर नायक… जेमी डिमन

शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असला तरीही त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. शेअर बाजार किंवा त्यासलग्न असे विषय आता सुदैवाने अभ्यासक्रमात समाविष्ट केले असले, तरीही शेअर बाजारात यशस्वी होण्याकरिता हा अभ्यास तितका सोपा किंवा पुरेसा नाही. त्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीची आणि शेअर बाजाराची आवड असणे तसेच त्यासाठी नियमित वेळ देणे हे दोन्ही आवश्यक आहे. शेअर बाजार म्हणजे झटपट आणि भरपूर पैसा हे काही अंशीच खरे आहे (अर्धसत्य). कारण प्रत्येक गुंतवणूक अचूक नसते तसेच गुंतवणुकीसाठी निवडलेल्या सगळ्याच कंपन्या बहुप्रसवा परतावा (मल्टीबॅगर) देणाऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही कितीही अभ्यास करून किंवा संशोधन करून एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असली तरीही तो शेअर तुम्हाला फायदा देईलच याची शाश्वती नाही. तुमच्या पोर्टफोलियोमधील २०-३० टक्के कंपन्यांनी तुम्हाला मोठा नफा दिला तरी ते पुरेसे आहे. पोर्टफोलियो करण्याचे मुख्य उद्दिष्टच नफ्या-तोट्याचे संतुलीकरण करणे असते. म्हणूनच एकावेळी एकाच कंपनीत किंवा एकाच क्षेत्रात सर्व गुंतवणूक करू नये.

सध्या शेअर बाजारात तेजीचा माहोल आहे आणि पुन्हा एकदा अनेक नवीन गुंतवणूकदार स्मॉल आणि मायक्रोकॅप कंपन्यांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. या धोक्याच्या पण आकर्षित काळात सामान्य गुंतवणूकदार सहसा कुठल्या चुका करतो आणि त्या कशा टाळता येतील ते अभ्यासता येईल.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांकडून सहसा होणाऱ्या चुका:

(१) नवीन गुंतवणूकदारांसाठी आयपीओ हा उत्तम पर्याय आहे

प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) म्हणजे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे पहिले पाऊल असे अनेक जण म्हणत असतात. यात किती तथ्य आहे ते मला माहीत नाही. मात्र अनेक नवीन गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करून सुरुवात करताना आणि नंतर तिथेच थांबताना मात्र मी पाहिले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आता मुक्त बाजारपेठेत कंपन्यांना आपले शेअर किती अधिमूल्याने विकायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बहुतांशी कंपन्या प्रचंड अधिमूल्याने आपले शेअर विक्रीला काढतात. मात्र काही गुंतवणूकदार मात्र तो शेअर आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या किमतीपेक्षा देखील त्याची किंमत कमी झाल्यावर पश्चात्ताप करत बसतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुख्य आयपीओद्वारे मिळणाऱ्या शेअरची संख्या ही केवळ १५,००० रुपयांपर्यंत मर्यादित राहते. त्यामुळे अनेकदा चांगल्या कंपन्यांचे शेअर आयपीओच्या माध्यमातून मिळाले तरीही फायदा मर्यादितच राहतो. मोठ्या अधिमूल्याने आयपीओ काढलेल्या किती कंपन्यांचे शेअर सध्या फायद्यात आहेत ते इथे तपासणे उद्बोधक ठरेल. रिलायन्स पॉवर, झोमॅटो, पेटीएम, कार ट्रेड, आदित्य बिर्ला सन लाइफ अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे नुकसानच केले आहे.

हेही वाचा >>> माझा पोर्टफोलियो : रस्तेबांधणीतील सर्वंकष सामर्थ्य; जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड

(२) केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर शेअरमध्ये गुंतवणूक

मध्यंतरी एका कार्यक्रमादरम्यान मला माझा मित्र भेटला. तो मुद्दामहून आपल्या सुनेला घेऊन आला होता. तिला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन हवे होते. तिला शेअर बाजारात नक्की काय माहिती आहे, असा प्रश्न मी विचारला असता तिने मला तांत्रिक विश्लेषण येत असल्याचे सांगितले. केवळ ३-४ दिवसांच्या कार्यशाळेत जाऊन आणि काही हजार रुपये भरून तिने तो अभ्यास केला होता आणि त्याचे सॉफ्टवेअर विकत घेतले होते. बाकी कुठलीही माहिती नसताना केवळ तांत्रिक विश्लेषणावर शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. काही खासगी वाहिनीवर कोणीतरी तथाकथित तज्ज्ञ झटपट श्रीमंत होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणावर शेअर बाजारात डे ट्रेडिंग करायचा सल्ला देत असतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इतकी सोपी पद्धत असती तर सगळ्यांनीच ते सॉफ्टवेअर खरेदी करून का नाही श्रीमंत व्हायचं? आणि तो स्वतः हे सॉफ्टवेअर का विकतोय? असा प्रश्न उपस्थित होतो.

(३) कारण माझ्या ब्रोकरने ‘टीप’ दिली आहे

अनेकदा शेअर ब्रोकर ‘मार्केट टीप’ देत असतात. तुमचा ब्रोकर हा तुमचा कितीही जवळचा मित्र असला तरीही तो सांगतो त्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे तुमच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. शेवटी ब्रोकर किंवा सल्लागार हीदेखील तुमच्या-आमच्यासारखी माणसेच आहेत, हे लक्षात ठेवायला हवे.

(४) कंपनीचा तिमाहीतील नफा खूप वाढला आहे.

कंपनीचा आर्थिक अहवाल तसेच त्रैमासिक निष्कर्ष अभ्यासणे जरुरी आहे. परंतु केवळ एकाच निकालावर किंवा कंपनीचा एखाद्या तिमाहीतील आर्थिक निष्कर्ष, वृत्तपत्रांतील जाहिरात अभ्यासून त्यानुसार गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या कामगिरीत सातत्य असणे आवश्यक आहे. तसेच कधी कधी एखाद्या तिमाहीत कंपनीला चांगला फायदा होतो, याचा अर्थ कंपनीची कामगिरी सुधारली असे होत नाही. जाहिरातीतील आर्थिक निकष तपासण्याबरोबरच त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. त्याकरिता वार्षिक अहवाल तसेच लेखापरीक्षकाचे अहवाल वाचणेदेखील महत्त्वाचे आहे.

हेही वाचा >>> सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद, गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

(५) माझे गुंतवणूक-भांडवल परत मिळेपर्यंत मी हे शेअर विकणार नाही

आपला प्रत्येक निर्णय कायम अचूक असेल याची शाश्वती खरेतर कुणीच अगदी कुठलाही तज्ज्ञ देऊ शकत नाही. त्यामुळे एखादा शेअर खरेदी केल्यानंतर पडायला लागला तर लगेच विक्री करून तोटा कमी करावा. मात्र बहुतांशी सामान्य गुंतवणूकदार तो शेअर संपूर्ण पडताना बघतात, मात्र विक्री करत नाहीत. तो पुन्हा आपण घेतलेल्या किमतीतच विकण्याची जिद्द मनात ठेवून तो शेअर बाळगून ठेवतात. काही वेळा तो शेअर वर्षा-दीड वर्षात त्या किमतीला जातोही आणि गुंतवणूकदार तेव्हा विकतोही. मात्र त्या काळातील व्याजाचे झालेले नुकसान तो विसरून जातो.

(६) लार्ज कॅप कंपन्यांमधील गुंतवणूक सुरक्षित असते

लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. मात्र असा एक मोठा गैरसमज बहुतांशी गुंतवणूकदार आणि सल्लागारांचा आहे. निफ्टी किंवा सेन्सेक्समधील गुंतवणूक म्हणजे उत्तम आणि सुरक्षित असे नाही. अशा कंपन्यादेखील मोठा तोटा आणि पर्यायाने तुमचे नुकसान करू शकतात. सध्या काही बँक आणि दूरसंचार क्षेत्रातील शेअरच्या बाबतीत हे उदाहरण सार्थ ठरेल.

(७) उत्तम शेअर कायम राखून ठेवावे.

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञान या साऱ्याचा परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर आणि भवितव्यावर होतच असतो. कुठलेही उत्पादन सातत्याने कायम फायद्याचे किंवा उपयोगी ठरू शकत नाही. कोडॅक, नोकिया, ओर्के, हिंदुस्तान मोटर्स, प्रीमियर, एचएमटी, निर्लोन अशी काही उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच. काळानुसार बदल आवश्यक असतो. त्यामुळेच आपल्या पोर्टफोलिओचा वेळोवेळी आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

(८) कमी बाजार भावात उपलब्ध असलेला स्वस्त शेअर अधिक फायदेशीर

अनेक गुंतवणूकदार एखादा शेअर केवळ १० रुपयांच्या आत उपलब्ध आहे म्हणून विकत घेताना दिसतात. आज ना उद्या तो शेअर दुप्पट-तिप्पट होईल या आशेवर केलेली ही खरेदी नंतर तुमच्या भांडवलासहित रसातळाला जाताना दिसते. एखादा शेअर कमी किमतीत उपलब्ध आहे, याचा अर्थ तो स्वस्त आहे असे मुळीच नाही. ९० टक्के पडलेला शेअर अजून किती खाली जाणार? असा प्रश्न हे स्वतःला विचारतात आणि समाधान करून घेतात. मात्र आपण खड्ड्यात पैसे गुंतवत आहोत हे यांच्या ध्यानीमनीही नसते.

(९) मी ‘या’ कंपनीच्या शेअरबद्दल चॅनलवर किंवा वृत्तपत्रात वाचलं आहे.

बिझनेस चॅनेलवर अनेक चर्चा होत असतात. त्यावर शेअर खरेदी करण्याचे सल्ले दिले जातात. तांत्रिक विश्लेषण केले जाते आणि प्रत्येक तज्ज्ञ स्वतःची मते मांडत असतो. एक जाणकार गुंतवणूकदार होण्याकरिता हे महत्त्वाचे असले तरीही अशा चॅनेलवर सांगितले म्हणजे पूर्व दिशा आणि खरेच असते असे नाही. स्वतःचा अभ्यास आणि विश्लेषण हवेच.

(१०) खरेदी केलेल्या शेअरचे भाव खाली आल्यावर सरासरी करणे

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळी गुंतवणुकीचा निर्णय बरोबर असतोच असे नाही. अनेकदा आपण खरेदी केलेला शेअर हळूहळू खाली येऊ लागतो आणि अशावेळी स्टॉपलॉस करण्याऐवजी चूक मान्य न करता पडणारा शेअर खरेदी करू लागतो. खरे तर प्रत्येक गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि लक्ष्य त्याच वेळी निश्चित करायला हवे. असा निर्णय चुकला असे लक्षात येताच होणारे नुकसान थांबवण्यासाठी तो शेअरप्रसंगी नुकसान पदरात पडून विकायला हवा. अर्थात तुम्हाला तुमची गुंतवणूक योग्य आहे याचा आत्मविश्वास असेल तर मात्र सरासरी करायला हरकत नाही. ते फायद्याचे ठरू शकते. तेजी-मंदीच्या कलावधीत असे घडू शकते तेव्हा मात्र संयम हवा. त्यामुळे ऐकावे जनाचे, मात्र गुंतवणुकीचा निर्णय स्वतः अभ्यास करून मगच घेणे हिताचे आहे.

Stocksandwealth@gmail.com

Story img Loader